PM Narendra Modi DAinik Gomantak
गोवा

काँग्रेसमुक्त देश करण्याचे धोरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले एकूण 9 (स्वतःसह) मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले.

दैनिक गोमन्तक

गोवा: देश काँग्रेसमुक्त करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केले असले तरी काल त्यांच्याच उपस्थितीत येथे गोव्यात काँग्रेसयुक्त भाजप सरकार स्थापन झाल्याचे पाहण्याचे दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आले. याचे कारण काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले एकूण 9 (स्वतःसह) मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले. मात्र त्यातील एक मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वगळता अन्य आठही मंत्री झालेल्यांचा प्रवास काँग्रेस मधून सुरू झाला होता. भाजप बदलू लागला आहे याचे हे उदाहरण म्हणायचे का? ∙∙∙

सुदिनबाब ‘सब्र करो’

मगोचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी राजकारणात आपले वेगळे वलय निर्माण केल्याने त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होईल, अशी चर्चा गेले काही दिवस जोरदार चर्चा होती. परंतु आजच्या शपथविधी सोहळ्यात केवळ नऊजणांनीच शपथ घेतली. त्यात ते नसल्याने मगो कार्यकर्ते नाराज झाले असले तरी पुढे मगोला एकतरी मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. मात्र ते मंत्रिपद ढवळीकर यांना मिळणार की मांद्रेतून प्रथमच निवडून आलेले मगोचे जीत आरोलकर यांना हे मात्र गुलदस्त्यातच आहे. फोंडा तालुक्याला तीन मंत्रिपदे दिल्याने चौथे मंत्रिपद सुदिनरावांना कसे द्यायचे हा भाजपसमोर तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे कदाचित सुदिनरावांना मंत्रिपद मिळणार नसले तरी मगो पक्षाला म्हणून जीत आरोलकर हे मंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात. त्यामुळे तूर्तास तरी सुदिनबाब ‘सब्र करो’ अशी भाजपात चर्चा आहे. ∙∙∙

खारवी समाजाला प्रतिनिधीत्व कुठे?

भाजप सरकारमधील मंत्रिमंडळात कुणाला कसे आणि कोणत्या निकषावर घेतले आहे कळायला काही मार्ग नाही. प्रदेशनिहाय तालुकानिहाय की समाजनिहाय मंत्रीपदी पहिल्या टप्प्यातील आमदारांची निवड झाली की झुकते माप देण्यात आले. याबाबत जोरदार चर्चा आहे. वास्तविक मोठ्या संख्येतील समाजाला प्रतिनिधीत्व द्यायला हवे होते. तर मग क्षत्रिय मराठा अर्थातच खारवी समाजाचे काय? सताधारी भाजपमध्ये या समाजाचा एकच आमदार निळकंठ हळर्णकर आहे. मंत्री पदाचा अनुभव आहे. काँग्रेसमधून फुटून आल्यानंतर गेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही अन आतातर भाजपला प्रतिकूल स्थिती असतानाही निळकंठराव निवडून आले त्यामुळे त्यांना मंत्रिपद नको का द्यायला, असे या समाजाचे लोकच बोलत आहेत. ∙∙∙

याचसाठी केला होता अट्टाहास!

काणकोणमधील रमेश सरांनी 2017 मधील अनुभवावरून शहाणे होऊन यावेळी चांगलीच फिल्डींग लावून धरली होती व त्यांना सर्व भागात मिळालेली मते पहाता त्यांनी संघटनात्मक पातळीवर बजावलेली उत्तम कामगिरी दिसून आली. ते तब्बल तीन हजार मतांची आघाडी मिळवते झाले; पण त्या सर्वांचे फलित काय तर सभापतीपद. प्रचंड धडपड करून त्यांना विजयाप्रत नेणारे त्यांचे कार्यकर्ते त्यामुळे नाराज होणे स्वाभाविक असून, ते याचसाठी केला होता अट्टाहास ही पंक्ती आळविताना कार्यकर्ते आढळतात. ∙∙∙

सावंत यांचे भाग्य

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ‘ॲक्सिडेंटल सीएम’ असे म्हटले जाते. मात्र, चुरशीच्या शर्यतीत ते 2019 मध्ये मुख्यमंत्री बनले आणि पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय मिळवला. या शिवाय तिसऱ्यांदा भाजप सत्तेत आला. सोमवारचा शपथविधी सोहळाही ‘न भूतो’ असा होता. कारण या सोहळ्याला पंतप्रधानांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहिले होते. हे सारे भाग्याचेच मानले जाते. त्यामुळे सावंत यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याची चर्चा आज शपथविधी सोहळ्यात रंगली होती. सावंत यांनी प्रचारादरम्यान घेतलेले कष्ट याची दखल केंद्राने घेऊन त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ घातल्याने त्यांचा ऊर आणखीच भरून आला आहे. पुढील पाच वर्षे ते त्याच वेगाने कार्यरत राहतील, असे त्यांच्या कार्यावरून दिसते. ∙∙∙

कांदोळकर पुढे, ज्योशुआ मागे!

मागची विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेल्या ‘कांदोळकर’ आडनावाच्या तीन प्रमुख व्यक्ती बार्देश तालुक्यात आहेत. तृणमूल काँग्रेसतर्फे हळदोणेतून निवडणूक लढवलेले किरण कांदोळकर व थिवीतून निवडणूक लढवलेल्या त्यांच्याच पत्नी कविता कांदोळकर तसेच म्हापशात काँग्रेसतर्फे निवडणूक लढवलेले सुधीर कांदोळकर यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी किरण कांदोळकर व त्यांच्या पत्नी समाजकार्याच्या बाबतीत सध्या तरी अज्ञातवासातच गेल्यासारखी परिस्थिती हळदोणे व थिवी मतदारसंघात आहे. त्यामुळे ही पती-पत्नी यापुढे निवडणूक लढवणार की नाही याबाबत त्यांच्या समर्थकांना साशंकता वाटत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने, म्हापशातील काँग्रेसचे नेते सुधीर कांदोळकर पराभूत झाले असले तरी त्याबाबत फारसे कोणतेही टेन्शन न घेता अगदी मनसोक्तपणे सार्वजनिक कार्यक्रमांत अगदी उत्साहाने आणि अगदी हसतमुखाने सहभागी होत सामाजिक उपक्रमांतही यथायोग योगदान देत आहेत. आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यापेक्षाही जास्त संख्येने ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित असतात, अशी निदान म्हापशात तरी परिस्थिती आहे. ∙∙∙

रवी नाईक यांची हिंदी

माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे मुरब्बी राजकारणी आणि आपल्या विनोदी शैलीने समोरच्यांना खेचून खेळवून सोडण्यात माहीर आहेत. बऱ्याचवेळेला ते हिंदीचा वापर करत समोरच्यांवर छाप टाकण्याचा प्रयत्न करतात. फोंड्यात जास्त असलेल्या मुस्लिम मतदारांचा हा परिणाम असावा. याशिवाय ते कधी कोणता निर्णय घेतील, हे सांगणेही अवघड आहे. सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी चक्क राष्ट्रभाषेतून शपथ घेतली. मात्र, अयोग्य उच्चार आणि सततच्या अडखळण्यामुळे ‘समोरा खाया और चाय पिया’ या त्यांच्या अलिकडे गाजलेल्या शब्दफेकीची सर्वत्र चर्चा होती. हिंदीतून शपथ घेताना ते जरी अडखळे असले तरी मोदींची नजर आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न तरी नव्हे ना? असा प्रश्न उपस्थितांमधून होत होता. ∙∙∙

सोनसोडोची साडेसाती

गोव्याच्या व्यापारी राजधानीतील सोनसोडो प्रकरण हे मारुतीच्या शेपडीसारखे लांबलचक आहे. सरकार कोणाचेही असो वा नगरपालिका कोणाच्याही ताब्यात असो, सोनसोडो प्रश्न काही सुटत नाही तेथील कचरा. राशींना लागलेल्या आगीचा धूर शमतो न शमतो तोच तेथील कचरा प्रकल्पाची भिंत कोसळली आहे. सदर प्रकल्पांतून फोमेंतोने अंग काढून घेतल्यास आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. पण, तेथे पर्यायी व्यवस्था झालेली नाही तर केवळ ओला कचरा नेऊन साठविला जात आहे. त्यातून ही घटना घडली आहे व त्याचे कुणालाच काही पडून गेलेले नाही हेच स्पष्ट होत आहे. ∙∙∙

इतकी गुप्तता का?

भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आणि मातब्बर नेते पराभूत झाल्यानंतर मंत्रिमंडळ शपथविधीसाठी तब्बल 18 दिवसांचा अवधी घेण्यात आला आणि शपथविधी सोहळ्याच्या अगोदर केवळ अर्धा तास मंत्रिपदाची माहिती देण्यात आली. ही इतकी गुप्तता मंत्रिपदाच्या बाबतीत का घेण्यात आली होती, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात नवीन काहीच नव्हते. सारे माजी मंत्रीच तर आहेत तसेच मंत्रिपदाच्या बाबतीत विभाग, जात यापूर्वीची कामगिरी असे मुद्दे विचारात घेतले जात आहेत असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात फोंड्यात तीन मंत्रिपदे देण्यात आली तर तीन ख्रिश्चन उमेदवारांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यामुळे वरचे निकष फोल ठरतात. मग या गुप्ततेत दडलं होतं तरी काय? ∙∙∙

शिगमा संपला, कवित्व बाकी

शिमगा संपला, कवित्व बाकी ही म्हण दैनंदिन व्यवहारात सर्रास वापरली जाते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेल्यांना तिचा अधिक प्रत्यय निदान सासष्टीतील अनेक मतदारसंघात आता येत आहे. बहुतेक ठिकाणी उमेदवारांनी नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी प्रचारावेळी मिळेल ते मार्ग अनुसरले, शिवराळ भाषा वापरली, एकमेकांची उणी-दुणी काढली. नंतर निकाल जाहीर झाले कोणीतरी निवडून आला पण हे कार्यकर्ते जेव्हा समोर येतात त्यावेळी त्यांची कुचंबणा होताना दिसते. शिगमा संपला तरी कवित्व बाकी राहिले म्हणतात ते असे. ∙∙∙

युती असफल तरीही लाभ

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दोन प्रमुख अशा युती काँग्रेस व गोवा फॉरवर्ड तसेच मगो व तृणमूल काँग्रेस या पक्षांदरम्यान झाल्या होत्या. पण, या युतींचा लाभ कोणत्याच पक्षाला झाला नाही हे मतमोजणी अखेर दिसून आले व संबंधित पक्षही आता ते मान्य करत आहेत. पण मुद्दा तो नाही युती फसली तरी मगोच्या सुदिनरावांचे मंत्रिपद पक्के आहे. फॉरवर्डच्या विजयबाबांबाबतही अशीच चर्चा असून दुसऱ्या टप्प्यात ते मंत्री झाले तर या विधानाला पुष्टीच मिळाल्यासारखे होणार आहे. ∙∙∙

सर परतणार का?

माजी मुख्यमंत्री आणि मांद्रेतून भाजप विरोधात निवडणूक लढवलेले लक्ष्मीकांत पार्सेकर सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यांना खास निमंत्रण दिल्याची माहिती आहे त्यामुळे ते भाजपात परततील अशी चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळे मांद्रेतील भाजपच्या उमेदवाराला दणका बसला हेही तितकेच खरे. मात्र, भाजपा रुजवण्यात आणि वाढवण्यात पार्सेकरसरांचा मोठा वाटा आहे. शिवाय ते भाजपचे एकेकाळचे विश्वासू नेते राहिले आहेत. त्यामुळे ते परत भाजपात परतणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. ∙∙∙

सासष्टीची पाटी कोरीच!

‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ म्हणतात त्याचा अनुभव सध्या साष्टीकार घेत आहेत. नऊ जणांच्या मंत्रिमंडळात दोतोर प्रमोदने सासष्टीला प्रतिनिधीत्व दिले नाही. राज्यात सगळ्यात जास्त मतदारसंघ असलेला तालुका सासष्टी. राज्यात सगळ्यात अधिक कॅपिटल इनकम असलेला तालुका सासष्टी. राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात सक्रिय असलेला मतदारसंघ सासष्टी; मात्र सासष्ठी गावाच्या या तालुक्याला सरकारात स्थान नाही. याचे कारण काय तर बदला. सासष्टीकर कमळाला स्वीकारीत नाही ना? मग आम्ही सासष्टीला का स्वीकारणार हाच संदेश कदाचित भाजपाने सासष्टीला दिला असावा. आता सासष्टीकर म्हणायला लागले आहेत करायला गेलो एक आणि झाले भलतेच. ∙∙∙

केपेने संधी गमावली!

‘करायला गेलो एक झाले भलतेच’, असा अनुभव कदाचित केपेकर घेत असावेत. अनेक वर्षांनी केपेकरांना उपमुख्यमंत्री निवडण्याची संधी होती; मात्र केपेकरांनी ही संधी गमावली. जर केपेच्या मतदारांनी आपल्या भावनांना लगाम घातला असता व रागावर थोडा ताबा ठेवला असता तर भले केपेकरांचेच झाले असते. आता पुन्हा एकदा पाच वर्षे विरोधीपक्षाचा आमदार निवडल्यामुळे केपेकरांना विकासासाठी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित. यावर एका बुजुर्गाने सोशल मीडियावर छान भाष्य केले आहे - ‘बाबू हरला हे केवळ बाबूचेच नुकसान नाही तर नुकसान अधिक झाले आहे केपेकरांचे’. ∙∙∙

मराठ्यांचा बोलबाला!

मराठ्यांच्या हातात राजकारण जाऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. आपने भंडारी कार्ड खेळले. काँग्रेसने कामत यांना पुढे केले. तृणमूल व मगो युतीने ढवळीकरांना पुढे केले; मात्र यशस्वी ठरला मराठ्यांच्या तुरूपाचा एक्का. चाळीस पैकी सहा हिंदू व तीन ख्रिस्ती मिळून नऊ आमदार बनले आता मंत्रिमंडळातील प्रथम दोन मंत्री मराठा. एकूण काय आता पुढील पाच वर्षे राज्यात ‘शिवशाही’ रुजणार म्हणायची तर! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT