पणजी : भंडारी समाजाच्या अपेक्षेप्रमाणे ‘आप’ने भंडारी समाजाला मुख्यमंत्रिपद (Chief Minister's post) बहाल करण्याची घोषणा केली आहे. मात्र, समाजातच दुहीचे राजकारण सुरू झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय बनला आहे. भंडारी समाजाला मुख्यमंत्रिपद हवे. मात्र, त्यांच्यात समाजातील नेतृत्वावरून वादंग निर्माण झाले आहे. त्यात संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक (Ashok Naik) यांना समाजातून विरोध आहे. त्यावर सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, असे आपचे नेते सांगत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री (Chief Minister of Delhi) तथा आपचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भंडारी समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लागलीच दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister of Delhi) मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी गोव्याचा आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असेल अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. विरोधकांनी आप समाजांमध्ये फूट पाडत असल्याचा डंका सुरू केला असतानाच भंडारी समाजातील काहींनी या निर्णयाला हरकत घेतल्याने या विषय राज्यभर चर्चेचा बनला आहे.
दरम्यान, काही युवकांनी या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. समाजात उभी फूट पडल्याची चर्चा रंगात आहे, पण प्रत्यक्षात त्या सगळ्यांनाच आपल्या समाजातील मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते. केवळ संघटनेतील वादामुळे याबाबत समाजात बंडाळी माजविण्याचे काम काही आपमतलबी लोकांनी चालविला आहे ते योग्य नाही, असे आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. भंडारी समाजाच्या कांही नेत्यांनाही हा निर्णय योग्य वाटतो, पण संघटनेच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्यामुळे त्यांचा कंडू दुखावला गेला असल्याचे मत संघटनेतील पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. एकंदर मुख्यमंत्रिपद हवे आहे, पण संघटनेवर आक्षेप असल्याचे दिसते. यावर योग्य तोडगा काढण्यासाठी आम आदमी पक्ष सरसावला आहे.
मिशन युनायटेड गोवा हा आपचा हेतू आहे. त्यासाठी प्रत्येक समाजाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही पक्षाकडून करीत आहोत. इतर पक्षांनी जाती-धर्मात फूट पाडली आहे, पण आप भंडारी समाजाला न्याय देण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. हा केवळ श्रेयवादाचा मुद्दा आहे. आप योग्य व्यक्तीची निवड करेल.
- वाल्मिकी नाईक उपाध्यक्ष आप
समाजाच्या नावावर मोठे झोलेल्या काहीजणांना पोटशूळ होणे साहजिक होते. संघटना समाजाच्या उन्नत्तीसाठी झटत आहे. विरोधकांना आतापासूनच सावलीची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी आरोप चालविले आहेत. आम्हांला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. समाज आमच्या पाठिशी आहे. विशेषतः 60 वर्षानंतर एखादा पक्ष समाजाला सन्मान देतो, ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. माझी कुवत विचारण्यापेक्षा विरोधकांनी त्यांची लायकी लक्षात घ्यावी. संघटनेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. अद्याप आमचे उमेदवार ठरलेले नाहीत.
- अशोक नाईक, अध्यक्ष भंडारी समाज
भंडारी समाजातून अध्यक्ष कोण होणार याबाबत सगळ्यांना उत्सूकता असली, तरी त्याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत कोणत्याच पक्षाने अशी घोषणा केली नव्हती. ती आपने केली आहे. त्यामुळे भंडारी समाजाने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. काही स्वार्थी लोक विरोध करीत असतील, तर हे दुर्दैव आहे. आपला जाती-धर्माचे राजकारण करायचे नाही, पण एखाद्या मागास समाजाला न्याय देण्यात काय चूक आहे?
- ॲड. अमित पालेकर, आप नेते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.