Goa to Mahakumbh Mela train
पणजी : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात जगभरातून भाविक दाखल होत आहेत. गोवेकरांनाही या कुंभमेळ्यात सहभागी होता यावं, यासाठी गोवा सरकारकडू विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आलीय. "गोव्यातून कुंभमेळ्यात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यास गाड्यांची संख्या आणखी वाढविली जाईल," असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी (०६ फेब्रवारी) सांगितलं.
प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी करमळी रेल्वे स्थानकातून प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी एक विशेष ट्रेन रवाना झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, आमदार राजेश फळदेसाई आणि रेल्वे अधिकारी आशा शेट्टी उपस्थित होते.
पहिल्या ट्रेनमधून १२०० लोक गोव्यातून महाकुंभमेळ्यासाठी गेले आहेत. आता १३ आणि २१ तारखेला पुन्हा विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यास रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाईल. गोव्यातील लोकांना महाकुंभाचा अनुभव घेता यावा, यासाठी ही ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
गोव्याहून प्रयागराजला जाणारी पहिली ट्रेन ८ तारखेला पोहोचेल. भाविक संगमात पवित्र स्नान करतील आणि ९ तारखेला परत येतील. आतापर्यंत तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यासाठी प्रत्येक मतदारसंघातून टीम लीडर नियुक्त करण्यात आले आहेत. गोव्यातील ४ हजार भाविक महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती, सुभाष फळदेसाई यांनी दिली.