डिचोली: ‘सिंगल यूज’ प्लास्टिक प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही, डिचोली बाजारात या पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे आढळून येत आहे. एकंदरीत बाजारातील दृष्य पाहता ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय फसल्यातच जमा आहे. या प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांचे आयतेच फावत आहे.
दीड वर्षांपूर्वी ‘सिंगल युज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बंदी लागू झाल्यानंतर सुरवातीचा महिना-दीड महिनाभर ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले होते. अधूनमधून पालिका आणि प्रशासकीय यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे विक्रेत्यांनी धसका घेतला होता. ‘स्वच्छ आणि सुंदर’ अशी ओळख असलेले डिचोली (Bicholim) शहर अजूनही प्लास्टिकच्या विळख्यात आहे. ‘शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर आता कोणती पावले उचलतात. त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
बाजारात फळ-भाजी किंवा मासळी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक स्वतः पिशव्या घेऊन येत नाहीत. तेव्हा त्यांना पिशव्या द्याव्या लागतात. महागड्या पिशव्या देणे परवडत नाही. त्यामुळे सिंगल यूज पिशव्या वापरणे भाग पडते, असे बाजारातील एका भाजी विक्रेतीचे म्हणणे आहे.
प्रशासकीय अधिकारी फक्त किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करतात. कारवाई करताना अन्य विक्रेते आणि दुकानदारांना त्याची कल्पना येते. ते सावध होऊन कारवाई टाळण्यासाठी अधिकारी येईपर्यंत ते व्यवस्थित बंदोबस्त करतात. प्लास्टिक बंदीच्या नावाखाली विक्रेते आणि दुकानदार यांच्यावरच कारवाई का? सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर आणि ग्राहकांवर (Customers) कारवाई झालीच तर बंदीचा निर्णय यशस्वी होऊ शकतो. असे जागृत नागरिकांचे मत आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात मामलेदार आणि पोलिसांच्या मदतीने पालिकेने बाजारात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवताना काही विक्रेत्यांकडून ‘सिंगल युज’ प्लास्टिक पिशव्या जप्त करुन दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस या पिशव्या बाजारातून गायब झाल्या होत्या. आता पुन्हा या पिशव्यांचा सर्रासपणे वापर होत असल्याचे आढळून येत आहे. ‘सिंगल युज’ प्लास्टिक बंदी निर्णयाचे तर तीनतेरा वाजले आहेत. हळूहळू कारवाई मंदावली आणि पुन्हा सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या बाजारात दिसू लागल्या आहेत. फळ-भाजी, मासळी आदी विक्रेत्यांकडे या पिशव्या पुन्हा उपलब्ध होत आहेत. ‘बंदी घाला, नाहीतर दंड द्या’ आम्हाला त्याचे काही पडलेलेच नाही. अशाच रुबाबात विक्रेते ‘सिंगल यूज’ प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास वापरताना दिसतात. दुसऱ्या बाजूने या पिशव्या विकणारे घाऊक विक्रेते योग्य ती दक्षता घेऊन पद्धतशीरपणे या पिशव्या बाजारातील विक्रेत्यांपर्यंत पोचवतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.