भजनातील गायनकला, सहगायक अन् साथी 
गोवा

गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजनातील गायनकला, सहगायक अन् साथी

सुदेश आर्लेकर

भजनातील गायनातून प्रासादिकता दिसली पाहिजे. त्यासाठी गायकाने स्वत:चा आवाज सुधारण्यासाठी नियमितपणे सराव करणे गरजेचे आहे. याला गोमंतकीय बोली भाषेत ‘स्वत:चा आवाज तापवणे’ असेही म्हणतात. यासंदर्भात खबरदारी घेतली नाही तर गळा गंजून जातो अथवा गळ्यात बुरशी/ शेवाळे निर्माण होते, असे विनोदाने म्हटले जाते. मध्य सप्तकात गायन केल्यानंतर तेच स्वर घेऊन मंद्र सप्तकात आणि नंतर तार सप्तकातही गायन करावे. एखाद्या लहान मुलाला जसे आपण अलगद हातांत धरतो तद्वत प्रत्येक स्वराचे गायन अलगदपणे, हळुवारपणे, नाजुकतेने करावे लागते.

एखाद्या अभंगाच्या मुख्य गायकाला तसेच त्या गायकाला साथ करताना सहगायकांनी तसेच साथीदारांनी पाळावयाची काही बंधने आहेत. उदाहरणार्थ, मु्ख्य गायकाने अभंग गाताना राग बदलला नाही तर सहगायकांनीही राग बदलू नये. मुख्य गायकाने राग बदलला तर केवळ त्या दुसऱ्या रागातच सहगायकांनी गायन करावे, अथवा स्वरविस्तार करावा, ताना घ्याव्यात. भलत्याच रागात प्रवेश करू नये. तसेच त्या अभंगाचा मुख्य गायक जेवढ्या उंच स्वरापर्यंत गेलेला असेल त्या स्वरापर्यंतच सहगायकांनी जावे. अतिहुशारपणा करण्याचा अथवा स्वत:चे कौशल्य दाखवण्याचा उपद्व्याप करण्याचे स्वातंत्र्य सहगायकांना नाही. सहगायकांनी त्या अभंगाच्या मूळ गायकापेक्षा अधिक वरच्या स्वरापर्यंत जाऊच नये. तसे केल्यास तो मुख्य गायकावर केलेला कुरघोडीचा प्रयत्न ठरेल. आपण सहगायक अथवा गायनाचे साथीदार आहोत, याचे भान अशा कलाकारांनी सदैव ठेवावे.

भजन गायकांनी पाळायचा महत्त्वाचा नियम-संकेत म्हणजे, काव्यरचनांचे गायन मुळानुसार करावे. भजन कलाकारांनी श्लोक, अभंग, गजर, गौळणी, आरत्या, भक्तिगीते इत्यादी काव्यरचनांचे गायन मुळाबरहुकूम असावे. ‘मुळाबरहुकूम’ म्हणजे मुळानुसार. अर्थांत त्या काव्यरचनांत कोणताही बदल न करता गायन करावे. मूळ काव्यात व्याकरणविषयक चुका असल्या तरी अथवा ते व्याकरण सध्या कालबाह्य झाले असले तरी ते शब्द जसेच्या तसेच उच्चारावेत. जुन्या काळातील तो शब्द विद्यमान काळात चुकीचा असला तरी अथवा तो शब्द विद्यमान प्रमाण भाषेत नसला तरीदेखील तो शब्द जशाचा तसाच वापरावा. उदाहरणार्थ, ‘‘पाऊले चालती सत्संगाची वाट’ असे शब्द मूळ काव्यात आहेत. तथापि, विद्यमान प्रमाण भाषेत आम्ही ‘पाऊले’ या शब्दाऐवजी ‘पावले’ असा शब्द वापरत असतो. परंतु, त्या जुन्या काव्याचे गायन करताना ‘पाऊले’ असाच उच्चार करावा. तसेच, त्याचे लेखनही ‘पाऊले’ असेच करावे. त्या व्याकरणिक चुका आहेत म्हणून त्या शब्दांबाबत दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न अथवा ‘अतिशहाणपणा’ कुणीही भजन कलाकाराने करूच नये. शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घाबाबतही याच तत्त्वाचे पालन करावे; परंतु, काही प्रसंगी संबंधित ऱ्हस्व-दीर्घ लेखन मूळ काव्यानुसार आहे की नाही, हे कुणीही जाणकार पुराव्यानिशी पटवू शकत नाही, तेव्हा कलाकाराला ऱ्हस्व-दीर्घाबाबत थोडी मोकळीक घ्यायला हरकत नाही. अशा प्रसंगी अखेरचा पर्याय म्हणून संबंधित शब्दांचे ऱ्हस्व-दीर्घ लेखन शुद्धलेखनविषयक विद्यमान प्रमाण नियमांनुसार करणे सोइस्कर ठरेल. परंतु, त्यानंतर मात्र जाणकाराकडून जाणून घेण्याचा सतत प्रयत्न संबंधित कलाकाराने करावा. मराठीतील शब्दांचा उच्चार हा बहुतांश वेळी ऱ्हस्व-दीर्घ लेखनावर अवलंबून असतो असा बहुतेक लोकांचा गैरसमज आहे; तथापि, वस्तुत: मराठी शब्दांचा उच्चार पूर्णत: लेखनावर अवलंबून नाही. याचे कारण म्हणजे, आधी भाषा असते व नंतर त्या शब्दांचे लिहिणे असते. भाषा म्हणजे बोलणे (बोली भाषा). बोली भाषेनंतर प्रमाण भाषा ठरवली जाते. कोणत्याही भाषेत बोलणे अगोदर सुरू होते व त्यानंतरच त्याचे लेखन होते.

भजनात स्वराविष्कारापेक्षा शब्दोच्चाराला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे उच्चार व्यवस्थित करणे क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ, ‘नम:’ या शब्दाचा उच्चार ‘नम’, ‘नमा’ असा न करता ‘नमह’ असा करावा. यासंदर्भात मराठी व संस्कृत भाषेचे व्याकरणविषयक ज्ञान असल्यास अधिक चांगले. तात्पर्य, आचार व विचारांबरोबरच भजन कलाकारांचा उच्चारही सुव्यवस्थित असला तर ‘सोन्याहूनही पिवळे’ ठरेल. अर्थांत, भजन क्षेत्रात त्या कलाकाराची ती जमेची बाजू ठरेल.

भजनात काही वेळा प्रशंगानुसार मूळ काव्यात थोडाफार बदल करायला हरकत नाही; पण, त्याबाबत अर्थहानी होऊ देता कामा नये. कारण, भजनात गाणाऱ्याची ईश्वराप्रतिची भावना महत्त्वाची आहे. भावार्थ जपणे क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ, आपण जर ‘श्रीसातेरी’ या देवतेसमोर भजन करीत असाल तर तिथे देवीचा श्लोक म्हणणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे, ‘‘सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’’ हा श्लोक म्हणताना ‘‘शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’’ ऐवजी ‘‘शरण्ये सातेरी माते नारायणी नमोस्तुते’’ असा प्रसंगानुसार पूरक बदल करण्याची मुभा/मोकळीक भजन कलाकाराला 
आहे.

तसेच, मूळ काव्यात शब्द नसतानाही वातावरणनिर्मितीसाठी ‘ओ’, ‘हो’ ‘अहो’ यांसारखे शब्द गायकाने अंतर्भूत करायला हरकत नाही. श्लोकांमध्ये शक्यतो अशा स्वरूपाचा शाब्दिक बदल करण्याचा प्रयत्न क़रू नये. अभंग, गौळणी, गजर इत्यादींच्या बाबतींत असे करायला मुळीच हरकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गौळणीत ‘‘गेला गेला हरी हा रुसून’’ एवढेच शब्द असले तरी त्या वाक्यांशाच्या शेवटी ‘‘अहो’’ हा शब्द वापरायला हरकत नाही. कारण, असे करून आपण कुणाला तरी मुद्दामहून सांगत असल्याचा भास होतो आणि त्यामुळे ते गायन अधिक प्रभावी होते. असे असले तरी अंतर्भूत केलेले नवीन शब्द मूळ काव्याला पूरकच असावेत. मूळ काव्याबाबत अर्थहानी होऊ देता कामा नये.

अभंगगायनात अर्थांत भजनात संगीतशास्त्रापेक्षा भक्ती अर्वाधिक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत गायक कलाकार महेश काळे यांनी गोव्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भात बोलताना सांगितले होते, की ‘‘अभंगगायनात संगीतशास्त्राची भूमिका दुय्यम स्वरूपाची आहे.

भंगगायनात स्पष्ट शब्दोच्चार व अभंगातील भावना यांनाच जास्त महत्त्व आहे.’’ वेळेच्या बंधनामुळे भजन स्पर्धांत शक्यतो छोटेखानी अभंग सादर करावेत. भजन स्पर्धांवेळी सादरीकरणासाठी खूप कमी अवधी उपलब्ध असतो. त्यामुळे, शक्यतो छोटे-सुटसुटीत अभंग सादर करणे व्यवहार्य ठरेल. अशा प्रसंगी अगदी कमी चरणांचे/कडव्यांचे छोटेखानी अभंग सादर करणे सोइस्कर ठरेल.

भजनातील एखादा अभंग संगीतबद्ध करण्यासाठी कोणताही राग वापरता येतो. फक्त त्या अभंगाचा भावार्थ व रागाची प्रकृती यांचा ताळमेळ बसला पाहिजे. अर्थांत त्या संगीतरचना शब्दार्थाला अनुरूप असाव्यात. प्रत्येक रागाची विशिष्ट प्रकृती असते. त्यामुळे अभंगांसाठी रागदारीचा यथोचित वापर करावा. उदाहरणार्थ, एखाद्या अभंगात ईशप्रेम व्यक्त झालेले असेल तर त्यासाठी एखाद्या भक्तिरसप्रधान रागाचे उपयोजन करणे सयुक्तिक ठरेल.

एखाद्या भजन कार्यक्रमात पुन्हा पुन्हा तेच तेच राग शक्यतो वापरू नयेत. अर्थांत रागांची पुनरुक्ती प्रकर्षाने टाळावी. एखाद्या अभंगात मध्येच अल्पसा अन्य राग वापरला तरीसुद्धा तो राग पुढच्या अभंगात शक्यतो वापरू नये. कारण, भारतीय रागदार संगीतात आजघडीस किमान चारशे राग-रागिण्या प्रचलित आहेत. त्यांच्यापैकी अन्य कोणत्याही रागाचा वापर करता येईल. तेच ते राग पुन्हा पुन्हा वापरल्यास रसिकांना वाटेल, की या भजन कलाकारांना या रागांच्या पलीकडे आणखी काहीच माहीत नाही. तेच ते राग ऐकून रसिकांनाही कंटाळा येत असतो, ही बाब ध्यानात ठेवायलाच हवी.

‘आवर्तन’/‘आवृत्ती’ म्हणजे ‘परत परत येणे’. गायकाने आवर्तन घेताना अभंगाची ए्खादी ओळ पुन्हा पुन्हा घोळवली जाते. त्यामुळे, त्या कृतीला आवर्तन म्हणतात. सहकारी गायक कलाकारांनी ‘आवर्तन’ घेताना आलाप, ताना गाण्यास सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचे ‘पालुपद’ निदान एकदा तरी गावे व त्यानंतरच स्वरविस्तार करावा. उदाहरणार्थ, ‘अवघे गरजे पंढरपूर। चालला नामाचा गजर।।’ या अभंगाच्या शेवटच्या कडव्यावेळी आवर्तन घ्यावयाचे झाल्यास, ‘देव दिसे ठायीं ठायींऽऽऽ’ ही ओळ पुन्हा पुन्हा येत असते. त्यामुळे, त्या ओळीला ‘पालुपद’ असे म्हणतात. अभंगाचे ध्रुपद आणि अभंगाचे पालुपद यांत फरक आहे. पालुपद हे फक्त आवर्तनावेळीच येते आणि सर्वांनी आवर्तने घेतल्यानंतर त्या अभंगाचा मु्ख्य गायक अभंगाचा तो चरण पूर्णत: गाऊन अभंगाचे धृपद म्हणत असतो. 

अभंगगायकाने आवर्तन घेतेवेळी स्वरविस्तार करीत असताना मध्येच एखादा स्वर अचानक दाबून धरला तर ते गाणे ऐकणाऱ्यांच्या कानांना मोहित करते. उदाहरणार्थ, ‘शंकरा’ रागावेळी स्वरविस्तार करताना पुढीलप्रमाणे ‘सा’ स्वरावरून अचानक खाली येऊन ‘प’ हा स्वर गायिला तर त्यात रंजकता येऊ शकते.

अभंगावेळी केली जाणारी तानबाजी नेहमीच प्रमाणबद्ध असावी. तानांचा अतिवापर करू नये. तसेच, ती तानबाजी अभंगाला पूरक/अनुरूप असावी. अर्थांत त्या ताना अभंगाच्या भावार्थाशी मिळत्याजुळत्या असल्या पाहिजेत. एखादा शिंपी कपड्यांची शिलाई करताना ती वस्त्रप्रावरणे ‘ठिगळे’ (कपयाळे/तुकडे) वाटू नये, याची खबरदारी घ्यावी लागते, तशीच नैसर्गिकता अभंगातील तानबाजीचा वापर करताना आली पाहिजे. कृत्रिमता टाळून नैसर्गिकता आणणे हे गायकाचे कर्तव्य आहे. आवर्तन घेतेवेळी गायकाने पखवाजवादन व टाळवादन यांच्या बाबतीत काही मांत्रांच्या वेळी वजन घेतले तर ते भजन उठावदार दिसते, याचेही भान गायकाने ठेवायलाच हवे.
अभंगाचा मुख्य गायक व सहगायकांनी आवर्तन घेतेवेळी स्वत:च्या देहबोलीच्या साहाय्याने भावनदर्शन केल्यास संगीताच्या दृष्टीने ते सादरीकरण अधिक उठावदार होत असते. त्यामुळे, रसिकजन मनापासून त्या कार्यक्रमात समरसही होत असतात. उदाहरणार्थ, एखादा गायक गाताना व टाळ वाजवत असतानाही देहबोलीचा यथायोग्य वापर करून व विविध हावभावांनिशी पखवाजवर प्रत्येक वेळी ‘सम’ दाखवू शकतो. त्यामुळे लयबद्ध भजन सादरीकरण होण्यास मदत होत असते.

भजन कलाकारांनी भजन गाताना रागदारी/शास्त्रीय संगीतातील कलाकारांप्रमाणे हावभाव कदापि करू नये. उदाहरणार्थ, एका हाताचे बोट कानांत घालणे, हात उंच करून गायन करणे, ताना घेतेवेळी हाता थरथरत असल्याप्रमाणे हावभाव करणे, आपण एखाद्या मजबूत फळाच्या साली सोलत असल्याप्रमाणे हाताचे चाळे करणे इत्यादी प्रकार भजन गायन करताना कलाकारांनी करूच नये. रागदारी गायनात तसे करायला मुभा आहे. भजनात नव्हे. भजन कलाकार शांत प्रकृतीचे दिसले पाहिजेत. अर्थांत, भजनात भावदर्शन महत्त्वाचे आहे. भजनातून मुख्यत: भक्तिरस प्रकर्षाने दिसला पाहिजे. त्याचबरोबर, करूण रसही त्यात ओतप्रोत भरलेला असावा.

अभंगाचे गायन करणाऱ्याने शक्यतो डोळे बंद न करता सादरीकरण करावे. उदाहरणार्थ, ‘नामपर अभंगा’चे सादरीकरण करताना डोळे बंद करून गायन केले तर प्रसन्नता निर्माण होणार नाही. नाममहिमा गाताना सर्वत्र प्रसन्नता दिसलीच पाहिजे. तथापि, एखाद्या वेळी मनाची घालमेल व्यक्त करणारे अभंग, आर्तता, व्याकुळता, दु:ख इत्यादी भाव व्यक्त करणारे अभंग सादर करताना मध्ये मध्ये डोळ मिटून गायला हरकत नाही. तसे केल्यास ते सादरीकरण भावार्थानुसार प्रभावीही होऊ शकते.

अभंगाचे गायन करताना गायकाने मध्ये मध्ये क्षणभर थांबल्यास ते गायन रसिकांच्या कानांना गोड वाटते. इंग्रजीत या प्रकाराला ‘पॉज’ असे संबोधले जाते. काही वेळा सलगपणे गाणे बरे वाटते, तर काही वेळा अशा अल्पशा थांबण्याने गाणे कानांना गोड वाटते. गायक सरावाने, अनुभाने अशा गोष्टी शिकू शकतो. एरवी आपल्या दैनंदिन जीवनातही जेवढा एखादा वक्ता भाषण करताना मध्ये मध्ये ‘पॉज’ (अल्पविराम’ घेतो/ क्षणभर थांबतो) तेव्हा ते वर्क्तृत्व अधिक उठावदार होते, हे तर आपणांस माहीत असेलच. भजन क्षेत्रालाही अगदी हेच तत्त्व लागू पडते. पण, या शैलीचा अतिवापरही टाळला नाही तर ते रसिकजनांच्या दृष्टीने कंटाळवाणे होऊ शकते, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT