फोंडा : राज्यातील डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आरोग्य खात्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. फोंडा तालुक्यात तर या रुग्णांचा आकडा चाळीशीकडे पोचला आहे. तर बेतोडा-दत्तगड भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गोव्याचा शहरी भाग वगळता गोव्याच्या अनेक भागात कचरा समस्या जैसे थे असल्याचं नागरिकांचे मत आहे. अशा कचऱ्यात साठणाऱ्या पाण्यामूळे डेंग्यू वाढीला लागत असल्याचे ही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. (Shocking: Forty dengue patients in Fonda )
गेल्या दोन महिन्यांपासून फोंडा तालुक्यात 38 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा चाळीशीच्या पार जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी फोंडा आरोग्य खात्यातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. फोंडा पालिकेच्या सहकार्याने शहर तसेच इतर भागात या उपाययोजना प्रभावी करण्यासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष तसेच पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली.
फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू तापाचे रुग्ण विविध ठिकाणी सापडत आहेत. विशेषतः बेतोडा-दत्तगड भागात ही संख्या मोठी असून फोंडा शहर व पालिका क्षेत्रात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. फोंडा शहरातील सांताक्रुझ तसेच कुर्टी पंचायत क्षेत्रातील नागझर-कुर्टी बाबल्याखळी व अन्य ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी मिळून हा आकडा 38 वर पोचला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने विविध ठिकाणी फॉगिंग, स्वच्छता मोहीम तसेच जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर व फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांनी नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांची फोंडा पालिका कार्यालयात भेट घेऊन शहर परिसरातील डेंग्यू रुग्णांचा आकडा आणि स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. येत्या शुक्रवारी सकाळी पालिका प्रभागातील सर्व नगरसेवकांसमवेत एक खास बैठक घेऊन डेंग्यूचा फैलाव वाढू नये यासाठी प्रभावी उपाययोजना घेण्याबाबत निर्णय झाला.
फोंडा तालुक्यातील काही गाडे, टपऱ्या व घरांवर पावसाळ्यात आच्छादनासाठी प्लास्टिक वापरण्यात येते. ते वाऱ्याने उडून जाऊ नये यासाठी टाकाऊ टायरांचा वापर करण्यात येतो. असे कित्येक टायर छतावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी भाडेकरू ठेवलेल्या छोट्या बिऱ्हाडांच्या छतांवरही असे टाकाऊ टायर आहेत. त्यात पाणी साचून डासांची पैदास वाढत आहे. शिवाय बागायतींमधील करवंट्या, पोई आदींमध्येही पाणी साचत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. डेंग्यूसाठी हे खुले आमंत्रणच ठरत आहे.
राज्यातील कचरा प्रश्न डेंग्यू वाढीस जबाबदार आहे ?
गोवा राज्यातील कचरा प्रश्नावरुन विधानसभेत कित्येकवेळा आरोप - प्रत्यारोप झाले आहेत. मात्र गोव्यातील कचऱ्याचा प्रश्न समूळ नष्ट झाला आहे. असं म्हणता येत नाही. कारण शहरी भाग वगळता गोव्याच्या अनेक भागात कचरा समस्या जैसे थे असल्याचं नागरिकांचे मत आहे. अशा कचऱ्यात साठणाऱ्या पाण्यामूळे डेंग्यू वाढीला लागत असल्याचे ही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामूळे डेंग्यू रुग्णांची चाळीशीत कचरा समस्या ही मूळ आहे. असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.