सपना सामंत
वाळपई : शाळेत मुलांसाठी अभ्यासाबरोबर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र सुट्टी ती सुट्टी असते. त्यामुळे मुलांना खरी मज्जा ही सुट्टीच्या दिवसांत मिळते. परीक्षा संपली की उन्हाळी सुट्टी सुरू होते. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी विविध उपक्रम, शिबिरे राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा उद्देश असतो.
मुलांना आता उन्हाळी सुट्टी पडलेली आहे. सत्तरीतही अशा अनेक शाळा आहेत, ज्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदोदीत प्रयत्नरत असतात. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान गरजेचे नसते तर त्या पलीकडे जाऊन मुलांसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे याचा विचार बहुतांश शाळा करतात. अशा उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उन्हाळी शिबिरासारखे उपक्रम सुरू केल्यास मुलांना फावल्या वेळेत वेगळे ज्ञान प्राप्त होत असते.
उन्हाळी शिबिरांचे अनेक फायदे आहेत. चित्रकला, नाटक, विविध कला, खेळ, आगीशिवाय अन्न शिजवणे, नृत्य, संगीत तसेच विविध मजेदार क्रियाकलाप या शिबिरांतून मुलांना शिकविल्या जातात. त्यामुळे मुलांच्या ज्ञान भर पडतेच शिवाय त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.
विवेकानंद शिशुसंस्कार केंद्रात ‘बाल गणेशा’ सिनेमा
केरी-सत्तरी येथील स्वामी विवेकानंद स्मृती संघ संचालित विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद शिशुसंस्कार केंद्रात संगीत आणि नृत्याचा दिवस रंगला. चार दिवशीय उन्हाळी शिबिर घेण्यात आले. सुरूवातीला विद्यार्थ्यांकडून ध्यानधारणा करून घेण्यात आली. त्यानंतर विविध गीते शिकविण्यात आली. शेवटी ‘बाल गणेशा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. शिक्षिका संगीता झोरे, विनंती गावस, अनिशा उसगावे, पूजा शेटकर यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. यासाठी विवेकानंद विद्यामंदिराचे शिक्षक अर्जुन गावकर यांचे सहकार्य लाभले. चार दिवस चाललेल्या या शिबिरात योग, विविध मैदानी खेळ, चित्रकला, क्राफ्ट, नृत्य, संगीत, प्रार्थना, दोरीवरून चढणे आदी प्रकार मुलांना शिकविण्यात आले.
वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देणारी सिडबॉल कार्यशाळा
विवेकानंद शिशुसंस्कार केंद्रात आर्ट आणि क्राफ्टचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. थंब प्रिंटिंग डिझाईन, भेंडीपासून विविध नमुन्यांची चित्रे, हात आणि पायाच्या ठश्यांपासून चित्रे, कागदापासून फुले बनविणे आदी कला विद्यार्थ्यांना शिकविण्यात आल्या. तसेच विवेकानंद ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांसाठी ‘वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन’चा संदेश देणारी सिडबॉल बनविण्याची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाप्रति संवेदनशील बनविणे हा मुख्य उद्देश होता.
दरम्यान, वाळपई येथील डॉ. के. ब. हेडगेवार शाळेतही छंद शिबिर घेण्यात आले. तुळशीदास काणेकर व आसना नाईक यांनी विद्यार्थ्यांना योगासने व विविध कला प्रकार शिकविले. सावर्डे-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात ‘बालसंगम’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नटरंग डान्स क्लासेसतर्फे समृद्धी नर्सरीतर्फे (पर्ये) उन्हाळी शिबिर 16 ते 21 एप्रिलपर्यंत सकाळी 8.30 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.