मडगाव: पेड, वार्का येथील वाळूची टेकडी खोदून मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. ही खोदलेली टेकडी पूर्ववत करण्यासाठी अधिकारी व पंचायत मंडळाने प्रयत्न चालवले आहेत. वार्का पंचायत मंडळ, गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटी, कोस्टल रेग्युलेशन झोन विभाग आणि जलस्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या टेकडीची पाहणी केली.
जवळच्या खाडीतील पाणी समुद्रात वाहून जाण्यासाठी वाळूच्या टेकडीचा काही भाग बेकायदा खोदण्यात आला आहे. याबाबत तक्रारीनंतर सरकारी अधिकारी आणि पंचायत सदस्यांनी या ठिकाणी भेट दिली होती. पंचायतीने पर्यटन विभाग, पोलिस आणि जीसीझेडएमए यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
या प्रकारामुळे समुद्राचे पाणी जवळच्या सखल भागातील भातशेतीत प्रवेश करण्याची चिंता रहिवाशांनी व्यक्त केली होती. सोमवारच्या पाहणीत उपसरपंच सोलोन फुर्तादो यांनी वाळूचा ढिगारा तातडीने पूर्ववत करण्याचे आवाहन केले आणि पुढील धूप रोखण्यासाठी समुद्राच्या बाजूने जिओ बॅग्ज ठेवण्याची सूचना केली.
समुद्राचे पाणी आत प्रवेश करणे थांबवण्यासाठी खोदलेला भाग भरणे तसेच मजबूत करणे आवश्यक आहे, असे फुर्तादो म्हणाले. स्थानिक रहिवासीही या पाहणीत सहभागी झाले होते. स्थानिक पंच बाप्तिस्त फर्नांडिस यांनी यासंदर्भात धोक्याची घंटा वाजवल्याबद्दल सहकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
माजी सरपंच लुईझा रॉड्रिग्ज यांनी हे नुकसान गंभीर असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समुदाय परिस्थितीचे निरीक्षण करत राहील, असे सांगितले. सरपंच बार्रेटो यांनी रहिवासी व विभाग अधिकाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. स्थिती पूर्ववत करण्याचे काम सीआरझेड नियम आणि प्रक्रियांनुसार होईल याची पंचायत खात्री करेल, असे त्यांनी सांगितले. पुढील कृतीची रूपरेषा आखण्याच्या दृष्टीने जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत पंचायत सदस्यांशी चर्चा केली.
माजी सरपंच सालेसियाना फर्नांडिस यांनी सांगितले की, योग्य परवानगीशिवाय वाळूच्या ढिगाऱ्यांवर कोणतीही जड यंत्रसामग्री वापरली जाऊ नये. ही हानी करण्याच्या प्रकारात अधिकृत मंजुरीशिवाय काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असू शकतो, याकडे लक्ष वेधले व या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.