St Estevam Tragedy|Bashudev Bhandari  Dainik Gomantak
गोवा

Saint Estevam Accident: सांतइस्तेव्‍ह प्रकरण! दुर्घटना की चित्रपटाची कथा? अनेक अनुत्तरीत प्रश्‍‍न

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Estevam Cumbarjua River Bashudev Bhandari Car Incident

अवित बगळे

साखळीतील गोवा इन्‍स्‍टिस्ट्यूट ऑफ मॅनेजमेंटपासून ५०० मीटरवर असलेले ‘व्हाईट हाऊस रेस्टॉरंट’... ३१ ऑगस्टच्या रात्री पावणेआठच्‍या सुमारास त्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी व तिचा मित्र जेवणासाठी तेथे जातात... तेथे आणखीन दोन विद्यार्थी येऊन त्यांना मिळतात... मध्यरात्रीनंतर मद्यपानासह साग्रसंगीत जेवण आटोपते आणि ती मुलगी व तिचा मित्र पणजीच्या दिशेने भाड्याने घेतलेल्या कारने निघतात... वाटेत त्या कारची किंचित धडक अन्य कारशी होते... त्या दुसऱ्या कारमधील व्यक्ती पाठलाग करतात... त्यांना चुकविण्याच्या नादात कार वेगाने चालवली जाते...चुकून ती सांतइस्तेव्‍ह फेरीधक्क्यावर जाते आणि पाण्यात बुडते... मुलगी पोहून बाहेर येते, मात्र तिचा मित्र बेपत्ता होतो. अजून तो किंवा त्‍याचा मृतदेह सापडलेला नाही. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही कथा आहे बाशुदेव भंडारी याच्या बेपत्ता होण्याची.

या साऱ्या कहाणीची सुरवात गुजरातेतील अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात होते. तेथे व्यवस्थापनशास्त्र पदवी अभ्यासक्रम शिकत असताना बाशुदेव व त्या मुलीची ओळख होते. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात होते. याची माहिती त्या मुलीचा कॅनडात असलेला भाऊ तसेच पोखरा-नेपाळ येथे असलेला बाशुदेवचा भाऊ यांना असते.

अहमदाबादहून २०० किलोमीटरवरील भडोच येथील बाशुदेवचे आईवडील मात्र याबाबत अनभिज्ञ असतात. पुढे पदवी मिळाल्यावर मुलगी पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी गोव्‍यात साखळी येथे येते. बाशुदेव स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवसायाकडे वळतो. मुलगी घरातून सात-आठ लाख रुपये आणून त्याला देते. आपण शिक्षण पूर्ण केल्यावर हाच व्यवसाय मोठा करण्याची स्वप्ने पाहते. मुलगी गोव्यात तर बाशुदेव गुजरातेत असा हा प्रकार जुलैपासून सुरू असतो.

बाशुदेवचे पालक गोव्यात

बाशुदेव बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचे वडील नारायण यांना बाशुदेव बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. ते पत्नीसह गोव्यात यायला निघाले. त्यांचा मोठा मुलगा बलराम हाही काठमांडूमार्गे गोव्यात पोचतो. ओल्‍ड गोवा पोलिसांत २ सप्टेंबर रोजी ते पोचल्यावर बाशुदेव कसा बुडाला हा त्यांना प्रश्‍‍न पडतो. बाशुदेव हा पोहणारा आहे. तो नदीतील तीन मीटर अंतर कापू शकणार नाही यावर त्यांचा विश्‍‍वास बसत नाही. त्या कारमध्ये बाशुदेव होता याचे पुरावे दाखवा असा त्यांचा घोषा तेव्हापासून आजवर कायम आहे. त्याचे पुरावे मिळणे शक्य होते. वाटेत एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही रस्‍त्‍याचे चित्रीकरण करत असतो. मात्र त्या सीसीटीव्हीचे फुटेज मागण्यास विलंब झाला आणि ते आता पुसलेही गेले आहे. त्यामुळे पोलिसांनी वाटेतील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ताब्यात घ्यायला हवे होते असे नारायण यांना आजही वाटते.

मोबाईल कोणी उचलला?

बाशुदेवचे वडील नारायण सातत्याने बाशुदेवच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मोबाईलची रिंग वाजत होती, मात्र कोणी प्रतिसाद देत नव्हता. ४ सप्टेंबर रोजी दुपारी २३ सेकंदांसाठी त्या मोबाईलवर कोणीतरी प्रतिसाद दिला, पण कोणी बोलले नाही. त्यानंतरसुद्धा एकदा सेकंदभरासाठी मोबाईलवर प्रतिसाद मिळाला होता. त्याचे पुरावे नारायण यांनी आपल्याजवळ ठेवले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी बाशुदेव बुडाला तर ४ सप्‍टेंबर रोजी त्याचा मोबाईल कोणी उचलला? असा प्रश्‍‍न त्यांना पडला आहे.

म्हणून बाशुदेव आला गोव्यात

२८ ऑगस्ट रोजी युवतीसोबतच्या प्रेमाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याचे बाशुदेव ठरवतो. एकाला त्याने अडीच लाख रुपये उचल म्हणून दिलेले असतात. त्यापैकी १ लाख रुपये तो मागून घेतो. विमानाने गोव्यात येतो. त्याचा व युवतीचा अत्यंत जवळचा असलेला अन्‍य एक मित्र कल्पराज हा सुरत येथून आपल्या प्रेयसीला घेऊन गोव्यात येतो. २७ ऑगस्टला हे तिघे गोव्यात पोचतात. २८च्या रात्री पणजीतील एका कॅसिनोवर जाऊन ते वर्धापनदिन साजराही करतात. त्यासाठी १८ हजार रुपये खर्च करतात. कल्पराज हा कांदोळी येथे राहत असतो. त्याच्याकडे बाशुदेव त्या युवतीसह एकवेळा जाऊन आलेला असतो. ३१ ऑगस्‍ट रोजी दुपारी कल्पराज आपल्या प्रेयसीसह परत जातो, परंतु त्याच रात्री बाशुदेव गोव्‍यात बेपत्ता होतो.

कारचा पाठलाग आणि दुर्घटना

दुर्घटनेतून बचावलेल्‍या त्‍या युवतीने पोलिसांना दिलेल्‍या जबानीनुसार, बाशुदेव व ती पणजीच्या दिशेने जाताना त्यांच्‍या कारच्या एका बाजूची धडक समोरून येणाऱ्या कारला बसली. त्या कारमधील लोकांनी कार फिरवून या कारचा पाठलाग सुरू केला. कार पाण्‍यात गेली तेव्‍हा तिने पोहत किनारा गाठला. बाशुदेवही मागून येत होता, पण नंतर तो बेपत्ता झाला. दरम्‍यान, सांतइस्तेव येथे ही कार पोचली तेव्हा फेरीबोटीतून पलीकडे जाण्यासाठी एक क्रेटा कार तेथे आली होती. त्याच्या मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागील कारमधील व्यक्ती उतरून पुढील कारच्‍या काचा ठोठावून ‘तू अगोदर बाहेर ये’ असे सांगत होत्या. तर, कारमधील व्यक्ती ‘नुकसान किती झाले ते सांगा, पैसे देतो’ असे म्हणत होती. ही पाठलाग करणारी कार नंतर पोलिसांनी हुबळी येथे शोधून काढली.

कार बुडाल्‍यानंतर युवतीने काय केले?

फेरीधक्क्‍यावरून कार पाण्यात गेल्यानंतर ती युवती तेथून ५०० मीटरवर असलेल्या घरात मदत मागण्यासाठी गेली खरी. पण त्यासाठी तिला लागलेला अतिरिक्त वेळ संशयास्पद असल्याचे बाशुदेवचे वडील नारायण यांना वाटते. ती युवती त्या घरातील मोबाईल घेते आणि आपल्‍या आईशी संपर्क साधून जेवणावेळी उपस्थित असलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा मोबाईल क्रमांक मागून घेते. त्‍यानंतर त्‍या विद्यार्थ्याला फोन करून सर्व कल्‍पना दिली. यादरम्यान स्थानिकांनी पोलिसांना कल्पना दिली आणि नंतर मध्‍यरात्रीच मदतकार्याला सुरवात झाली. तरी प्रत्यक्षात कार पाण्याबाहेर काढण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. कारण बुडालेल्या ठिकाणाहून कार वाहून दुसऱ्या ठिकाणी गेली होती.

अजूनही काही अनुत्तरीत प्रश्‍‍न

१) बाशुदेव व ती युवती प्रियकर-प्रेयसी मानली जात असताना रात्रीच्‍या जेवणावेळी अन्‍य दोन मित्रांना तिने आमंत्रित का केले?

२) आपण मद्यपान करते पण ‘त्‍या’ रात्री केले नव्‍हते, असे युवतीने सांगितले. पण सीसीटीव्‍हीत ती त्‍या रात्री मद्यप्राशन करत असल्‍याचे दिसून येत आहे. तिने जबानी का बदलली?

३) कार बुडाल्‍यानंतर मदत मागण्‍यासाठी गेलेल्‍या घरातून आईशी संपर्क साधल्‍यावर त्‍या युवतीने आपण वसतिगृहात आहे आणि आपला मोबाईल बिघडल्‍याचे खोटे का सांगितले?

४) केवळ महिना-दोन महिन्‍याच्‍या ओळखीतून जेवणावेळी आलेल्‍या दोनपैकी एका मित्राचा मोबाईल क्रमांक गुजरातेत राहणाऱ्या आईकडे कसा?

५) युवतीने सुरवातीला दिलेल्‍या जबानीनुसार बाशुदेवने तिला कारबाहेर काढले व अर्ध्या अंतरापर्यंत ती दोघे सोबत पोहत आली. पोहता येणाऱ्या बाशुदेवला उर्वरित दीड मीटरचे अंतर कापता येणार नाही का?

६) कल्‍पराज या बाशुदेवच्‍या मित्राने दुर्घटनेनंतर युवतीशी मोबाईलवर संपर्क साधल्‍यावर तिने तुटक उत्तरे का दिली?

७) कल्‍पराजसोबतच्‍या संभाषणानंतर तिने मोबाईल क्रमांक का बदलला?

८) बाशुदेवचा शोध घेण्‍यासाठी गोव्‍यात थांबण्‍याऐवजी तिने गुजरातेत परत जाणे का पसंत केले?

९) बाशुदेव नदीत बुडाला असे मानले तर त्‍याचा मृतदेह अजून का नाही मिळाला?

१०) नदीत‍ मगरींची संख्‍या खूप आहे. त्‍यांनी बाशुदेववर हल्ला केला असावा का?

११) समजा बाशुदेव बुडालाच नाही, तर तो एवढ्या मध्‍यरात्री कोठे गेला?

१२) कारसह बाशुदेव व त्‍याचा मोबाईल पाण्‍यात बुडाला, तर मग चार दिवसांनी त्‍याचा मोबाईल कोणी उचलला?

१३) युवतीच्या प्रेमप्रकरणाला तिच्‍या कुटुंबीयांकडून होणारा विरोध तर बाशुदेव बेपत्ता होण्यामागे नसावा ना?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

SCROLL FOR NEXT