Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; गोंयकारांच्या सुरक्षेचे काय?

Khari Kujbuj Political Satire: वीज विभागाने केबल ऑपरेटरना नोटीस पाठवली ‘पैसे भरा नाहीतर केबल कापू’. ऑपरेटरनी विचार केला, सरकारपर्यंत पोहोचूया.

Sameer Panditrao

गोंयकारांच्या सुरक्षेचे काय?

गोव्याच्या रस्त्यांवर गाड्या चालवणारे वाढले, पण जबाबदारी घेणारे कुठे दिसत नाहीत. मांद्रेत एका परप्रांतीयाने महिलेवर गाडी घालून हत्या केली, तर शिवोली येथे एका महिलेसोबत मुलगाही गंभीर जखमी. हा योगायोग म्हणायचा की नवा ट्रेंड? आता सरकार जागे होणार का झोपेचे सोंग घेणार, हाच प्रश्न आहे. लोकांना सुरक्षित वाटावे, हे सरकारचे काम, की लोकांनीच स्वतःचा बचाव करायचा? लोक आता ‘गोंयकारांच्या सुरक्षेसाठी’ जागे होणार, हे मात्र नक्की! ∙∙∙

नोटिसा आल्या, नोटिसा गेल्या!

वीज विभागाने केबल ऑपरेटरना नोटीस पाठवली ‘पैसे भरा नाहीतर केबल कापू’. ऑपरेटरनी विचार केला, सरकारपर्यंत पोहोचूया. आणि आता म्हणे हीच नोटीस रद्द करण्याचा विचार सुरू आहे. मुख्य सचिव यासंबंधीचा म्हणे आदेश देणार आहेत, पण तो केव्हा, याचा मात्र काही ठावठिकाणा नाही. हे खरंच होणार का फक्त अफवा? लोक वाट बघताहेत, पण इथे निर्णयांपेक्षा चर्चा जास्त होते, आणि चर्चा संपते, तोपर्यंत लोकांना नवीन विषय मिळतो. ∙∙∙

झोपडपट्टीच्या नावानं...!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढत्या झोपडपट्ट्यांपासून होणारा उपद्रव रोखण्याच्या उद्देशाने मास्टर प्लॅन जाहीर केला. मात्र, झोपडपट्टीला हात लावण्याचे धारिष्ट्य कुणी करू नये, असा जणू इशाराच मोती डोंगरबाबत आमदार दिगंबर कामत यांनी दिला. वास्तविक प्रत्येक मतदारसंघात झोपडपट्ट्या आहेत. याशिवाय झोपडपट्ट्यांच्या आधाराने भंगार अड्डेही येत असतात. एखाद्या दुर्घटनेनंतर ‘झोपडपट्टी हटाव’ ची घोषणा होते, ‘भंगार अड्डे हटाव’ची घोषणा होते. काही काळ निघून गेला की, घोषणा शीतपेटीतच दिसून येतात. झोपडपट्टी ही खरतरं प्रत्येक नेत्यासाठी ‘व्होट बॅंक’ असते. झोपडपट्टी हटावच्या घोषणेवरून राजकारण होऊ शकते, कृती नाही असा लोकांचा समज आहे. मुख्यमंत्री किती कठोर भूमिका या घोषणेवर घेतात, हे येणारा काळच दाखवेल. ∙∙∙

भाजपची भूमिका

नेवरा येथे रेल्वे स्टेशन बांधले जाणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर हा विषय नेवरा पंचायतीच्या ग्रामसभेत पोहोचला आणि लोकांनी एकमताने ठराव घेऊन रेल्वे स्टेशन आम्हाला नको, असा एकमताने विरोध केला. ग्रामसभेला लोकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावली, त्यात आमदार विरेश बोरकर, आपचे उपाध्यक्ष रामराव वाघ आणि इतर विचारवंत नागरिकांनी उपस्थिती लावली. सांतआंद्रेचील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी नोंदवली, परंतु या विषयावरून त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. या सगळ्यामुळे भाजपला काही पडून गेलेले नाही, ते बिनधास्त असल्याची चर्चा सांतआंद्रे मतदारसंघातून ऐकू येते. वर्षाच्या शेवटी जिल्हा पंचायत निवडणूक असल्याने हा विषय भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो; कदाचित हेच त्याचे कारण असावे. ∙∙∙

आरोग्यमंत्र्यांचे कौतुक!

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी इस्पितळात अचानक भेटी देऊन कामचुकार कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांनी सुरू केलेल्या कार्याचा सर्व थरातून कौतुक होत आहे. सरकारी इस्पितळे, कुटीर इस्पितळे तसेच आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य खात्याचे अधिकारी भेट देत नसल्याने डॉक्टरांसह अनेक कर्मचाऱ्यांचे फावले होते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर तसेच चांगली सेवा मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. मुजोर तसेच कामचोर कर्मचाऱ्यांवर झटपट कारवाईचा निर्णय याचीही लोकांकडून प्रशंसा होत आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर काही महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्यात अशा अचानक भेटी देण्यास सुरुवात केल्यावर काही मंत्र्यांनीही त्यांची री ओढली होती. मात्र, कालांतराने सर्व मंत्री विसरले. मात्र आरोग्यमंत्री राणे हे विसरले नाहीत. त्यांच्या या बेधडक कारवाईमुळे डॉक्टरांपासून काही अधिकारी दचकूनच असतात. इस्पितळातील व्यवस्थापनावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हाताखालील कर्मचारी मनमानी वागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वागणुकीला हे अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे. ∙∙∙

रवींची ‘आठवण’

सध्या राज्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. परवा पणजी इथे झालेला विनयभंगाचा प्रकार असो वा मांद्रे येथे झालेले वृद्ध महिलेचे खून प्रकरण असो पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, हेच दर्शवते. याची चर्चा फोंड्यात सध्या सुरू असून रवी नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळाची लोक आठवण काढू लागलेत. पात्रांव मुख्यमंत्री असताना गुन्हेगार कसे कायद्याला घाबरायचे याचे किस्से लोक रंगवून सांगताना दिसताहेत. अर्थात त्यांचेही बरोबर आहे म्हणा. रवी नाईक मुख्यमंत्री असताना कायदा सुव्यवस्था सुखाने नांदत होती हे कोणीही सांगू शकेल. आणि त्याची ‘आठवण’ आजही काढली जाते हेही तेवढेच खरे. पण दुर्दैव म्हणजे त्याचा आदर्श वस्तूपाठ मात्र, कोणीही गिरवताना दिसत नाही. म्हणून मग त्या काळाची आठवण काढत राहणे एवढेच लोकांच्या हाती उरते. लोक तरी बिचारे काय करणार, नाही का..? ∙∙∙

मडगाव आणि मोतीडोंगर

मी असेपर्यंत मोती डोंगराला कुणीही हात लावू शकत नाही, असे वक्‍तव्‍य दिगंबर कामत यांनी दोन दिवसांपूर्वी केल्‍यामुळे आता एका नव्या चर्चेने जोर धरला आहे आणि ती चर्चा म्‍हणजे मडगाव मोती डोंगरावर हाबी आहे की मोतीडोंगर मडगाववर. काही वर्षांपूर्वी दिगंबर कामत यांनी भाजपमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्‍यानंतर जी पोट निवडणूक झाली त्‍यावेळी भाजपच्‍या व्‍यासपीठावरून भाषण करताना बाबू आजगावकर यांनी, तुम्‍हाला मडगावातून मोतीडोंगर चालवायला पाहिजे की, मोती डोंगरावरून मडगाव? असा सवाल मडगावकरांना केला होता. त्‍यावेळी भाजपचे त्‍यावेळचे प्रमुख नेते मनोहर पर्रीकर उपस्‍थित होते. आता मडगाव पुन्‍हा एकदा भाजपकडे आले आहे. पण पूर्वी होते तेे गणित बदलले आहे का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT