पणजी: गोव्यात अभूतपूर्वरीत्या वाढलेली उष्णता ही चिंतेची बाब आहे. एप्रिल-मे महिन्यात असे अतितीव्र उष्णतेचे दोन प्रसंग घडले, तेही गंभीर आहे असे मत एनआयओचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.
‘वातावरण बदलाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी गोवेकरांनीही आता सज्ज राहावे’ असे आवाहन त्यांनी आज गोमन्तक टीव्हीवरील सडेतोड नायक कार्यक्रमात केले. रमेशकुमार हे समुद्र विज्ञानावरील एक तज्ज्ञ असून, त्यांनी तापमानवाढीचा अभ्यास करण्यासाठी अंटार्क्टिकासह इतर देशांना भेट दिली आहे. त्यांची 80 वर संशोधन प्रकाशने आहेत.
‘बंगालच्या खाडीत वरचेवर येणारी वादळे आता अरबी समुद्राकडे वळली आहेत, ही धोक्याची चाहुल आहे. त्यामुळे गोव्याने अधिकच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पश्चिम किनारपट्टीवर पर्यटनासाठी चाललेला हव्यास आता थांबवण्याची वेळ आलेली आहे’, असा इशारा डॉ. रमेशकुमार यांनी दिला.
अरबी समुद्रात गेल्या काही वर्षांत वादळांमध्ये निश्चितच वाढ झाली आहे. समुद्राचे तापमान वाढत आहे, त्याचा परिणाम समुद्रपातळीवाढ हा आहेच; परंतु वरचेवर येणारी वादळे ही आता एक नित्याची बाब ठरू लागली आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी समुद्रकिनाऱ्यांचा आपण किती वापर करणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
तापमान वाढ हा आता वैज्ञानिकांमधील मतभेदाचा विषय राहिलेला नाही. तापमान वाढ निश्चितच गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. जे तापमान 2025 मध्ये उद्भवणार असल्याचे भाकित करण्यात आले होते, ते 2022 सालीच येऊन ठेपले आहे. त्यामुळे जो पाऊस तीन महिन्यांत विस्कळीत रूपात पडत असे, तो आता अगदी थोड्या काळात बरसतो आणि एवढा अतितीव्र पाऊस सहन करण्याची क्षमता शहरांमध्ये नाही. त्यामुळे पूर, शहरे पाण्याखाली जाणे, डोंगर कपारी कोसळणे आदी दुर्घटना घडू लागल्या आहेत, असे मत डॉ. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.