गोव्यात लोकसभेच्या दोनच जागा असल्यातरी मागील काळात झालेल्या वेगवान राजकीय हालचालींमुळे येथील दोन्ही जागेवरील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. भाजपने उत्तरेतील उमेदवाराची घोषणा केल्यानंतर दक्षिणेत उमेदवारासाठी पक्ष अजून वेळ घेत आहे. दुसरीकडे काँग्रेसने एकही उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.
पण, लोकसभेत नशीब आजमविण्यासाठी उतरलेल्या आरजीने सर्वात पहिल्यांदा उमेदवारांची घोषणाही केली अन् जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला. दरम्यान, इंडिया आघाडीबाबत मोठी घोषणा पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाने लोकसभा लढविण्याचा निर्धार केला, त्यासाठी त्यांनी लोकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन देखील केले. पक्षाकडे लोकसभा लढविण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याची खंत मनोज परब यांनी बोलून दाखवली होती.
दरम्यान, लोकसभेसाठी हालचाली सुरु झाल्यानंतर आरजी इंडिया आघाडीसोबत जाण्याची चर्चा राज्यात रंगली होती. पण, परब यांनी असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले.
परब यांनी त्यानंतर स्वत:ची उत्तरेसाठी तर रुबर्ट परेरा यांची दक्षिणेसाठी उमेदवारी जाहीर केली. गोव्यात सर्वात अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध केला. आरजीने म्हादई नदीचा मुद्दा, कोळसा हबच्या स्थापनेला विरोध, गोमन्तकीयांसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळवून देणे यासारख्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
आरजीचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी इंडिया आघाडीबाबत घोषणा करत, निवडून आलेले खासदार इंडिया आघाडीला पाठिंबा देतील असे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यातून गोवा फॉरवर्ड, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीसोबत आहेत. लोकसभेसाठी समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आरजी भाजपची बी - टीम असल्यचा उल्लेख केला होता. तसेच, आरजी येत्या निवडणुकीत मत फोडण्याचे काम करेल असे, ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आघाडीसोबत न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या आरजीने खासदार निवडून आल्यास इंडिया आघाडीला पाठिंबा देईल अशी घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.