हरमल: जूनसवाडा, मांद्रे येथील सर्वे क्र. २७२/३ या रिव्हा रिसॉर्ट्ससाठी रेंडारवुड कंपनीने खरेदी केलेल्या जागेत लोखंडी खांब घालून कुंपण घालण्याचे काम बाऊन्सरच्या साहाय्याने सुरू केल्याने सरपंच व पंचायत मंडळाने तिथे धाव घेत काम बंद करण्याची नोटीस बजावली. यावेळी स्थानिक मुंडकार व रिव्हा रिसॉर्ट्स अधिकाऱ्यांत वादावादी झाली. दरम्यान, मांद्रेचे पोलिस निरीक्षक गीरेंद्र नाईक यांनी दोन्ही गटांना बोलावून घेत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास कंपनीने कुंपण घालण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ४० पेक्षा जास्त बाऊनसर या ठिकाणी उपस्थित होते. या कामाला अँथनी फर्नांडिस यांनी आक्षेप घेतला. व याबाबत स्थानिक पंच रॉबर्ट फर्नांडिस यांना कळवले. त्यानंतर सरपंच, इतर पंच व सचिव अमित प्रभू घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अँथनी फर्नांडिस यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी सरपंच राजेश मांद्रेकर यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी का कंपनीने परवानगी मागितली होती, परंतु या जागेत मुंडकार राहत असल्याने व या जागेचा वाद न्यायलयात असल्याने पंचायतीने परवानगी नाकारली होती. दरम्यान, संचालनालयाने या कामाला परवानगी दिल्याने कंपनीने काम सुरू केले. पंचायत ग्रामस्थांसोबत आहे, त्यामुळे काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
जूनसवाड्यावर जागेत बाऊन्सर मुंडकार व स्थानिक लोकांना मारहाण करण्यासाठी आले असावेत, त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी युवक अँथनी फर्नांडिस यांनी केली. यावेळी पंच मिगेल फर्नांडिस, किरण सावंत, महेश कोनाडकर, संपदा आजगावकर व चेतना पेडणेकर उपस्थित होते.
दरम्यान, खासगी जागेत प्रवेश केल्याबद्दल पोलिसांकडे सचित्र तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी, अशी पंच रॉबर्ट फर्नांडिस व प्रशांत नाईक यांनी केली. पोलिस निरीक्षक नाईक यांनी, या विरोधात २४ तासांत कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
पंचायतीने फाईल नाकारली असतानाही पंचायत संचालनालयाने तीन दिवसांत या कामाला परवानगी देण्याचे आदेश पंचायत सचिवास दिले, असे पंच प्रशांत नाईक यांनी सांगितले. कूळ मुंडकारवरील अन्याय खपवून घेणार नाही. तसेच बाऊन्सर कल्चरलाही थारा देणार नाही. मुंडकारांना न्यायालयात न नेता, न्याय द्यावा, अशी मागणी नाईक यांनी केली.
पंचायतीचे कायदा सल्लागार अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले की, कंपनीने सीआरझेडकडून बेकायदा परवाना मिळवताना या जागेत असलेली मुंडकरांची घरे दाखवली नाहीत. पंचायतीचा विरोध डावलून पंचायत संचालनालयाने त्यांना परवाना दिल्याचे सांगण्यात येते. या विरोधात पंचायतने जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. कंपनी बाऊन्सर घेऊन अवैधरीत्या ही जागा बळकावू पाहत आहे, असे ते म्हणाले.
या ठिकाणी बेकायदा रस्ता केला आहे. वन खात्याची परवानगी न घेता झाडे तोडली आहेत. तसेच मुंडकारांच्या घरांभोवती जागा न सोडता पायऱ्यापर्यंत कुंपण घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी लोखंडी खांब आणून टाकलेले आहेत. या जागेत कंपनी ४० रूम व स्वीमिंग पूल बांधण्याच्या तयारीत आहे. या विरोधात मुंडकारांनी न्यायालयात दाद मागितली आहे, असे पंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.