Bhoma Bypass Highway Road Widening Issue
फोंडा: भोम - अडकोण पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत भोम बगलमार्गाचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला. सरकारने भोम पंचायतीचा पर्यावरणीय अहवाल पुन्हा तयार करावा तसेच मंत्री गोविंद गावडे यांनी अधिकाऱ्यांसह भोम पंचायतीत येऊन महामार्ग रुंदीकरणप्रश्नी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
महिन्याभरापूर्वी मंत्री गोविंद गावडे यांनी याच प्रश्नावर प्रियोळ पंचायत सभागृहात सरकारी अधिकारी व ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे भोम सोडून इतर ठिकाणी बैठका घेण्यापेक्षा थेट भोम येथे येऊन अधिकाऱ्यांनी रस्त्यासंबंधी थेट ग्रामस्थांबरोबर संवाद साधून स्पष्टीकरण द्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
भोमवासीयांनी यापूर्वीच बगलरस्त्याचा पुरस्कार केला आहे. मात्र, सरकार गावातूनच रस्ता करण्यास आग्रही असल्याने हे स्पष्टीकरण महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भोम पंचायतीच्या या ग्रामसभेला सरपंच दामोदर नाईक तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते. सुरवातीला पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला, त्यानंतर ग्रामसभेला सुरवात झाली.
यावेळी सरपंच दामोदर नाईक यांनी आपण ग्रामस्थांचे म्हणणे संबंधितांना कळवतो, असे सांगितले. संजय नाईक व इतर ग्रामस्थांनी हा विषय लावून धरला.
दरम्यान, या चौपदरी महामार्ग रुंदीकरणाचा भोम येथील आराखडा नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले, की लोकांसमोर येताना ठोस आणि नेमकी माहिती द्यावी. यावेळी इतर काही विषयांवरही चर्चा झाली.
भोम येथील नियोजित महामार्ग रुंदीकरण कामासाठी येथील पर्यावरणीय अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, या अहवालात अनेक त्रुटी आहेत. येथील शेती बागायतींसाठी उपयुक्त असलेली नारायणदेव तळीचा या अहवालात मागमूसही नाही. तसेच इतर त्रुटी असल्याने यासंबंधी रस्ते महामार्ग खाते तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना व संबंधित पर्यावरण खात्याला कळवावे आणि नव्याने अहवाल तयार करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.