Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: ‘सीएसआर’बाबतीत रवी पात्रांव अग्रेसर!

Khari Kujbuj Political Satire: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, खासदार सदानंद शेट तानावडे तसेच भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी लावलेल्या हातभारामुळे महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळाले.

गोमन्तक डिजिटल टीम

‘सीएसआर’बाबतीत रवी पात्रांव अग्रेसर!

राज्यातील औद्योगिक वसाहतीत तसेच इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या बड्या कंपन्यांकडून ‘सीएसआर’ उपक्रमाखाली अनेक विकासकामे केली जातात. आता ही कामे अशा कंपन्यांकडून कशी करून घ्यायची हे आमदाराचे कौशल्य असते. फोंडा तालुक्यात किंबहुना राज्यात या बाबतीत फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक अग्रेसर आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोणत्या कंपनीकडून कोणते काम करून घ्यायचे हे रवी पात्रांवना चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच तर फोंडा पालिका आणि कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या क्षेत्रात ‘सीएसआर’ निधीखाली अनेक कामे झाली आहेत आणि होताहेत. रवी पात्रांवसोबत त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक यांनाही हे गणित चांगलेच अवगत झाले आहे. आपल्या नगराध्यक्षपदाखाली रितेशबाबने सीएसआर निधीखाली अनेक कामे केली आहेत. राज्यात कार्यरत असलेल्या बड्या कंपन्या मोठा नफा कमवतात, पण समाजाप्रती त्यांचे योगदान काय? हा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे अशा कंपन्यांकडून कसा फायदा करून घ्यायचा हे रवी पात्रांवकडून शिकायला हवे, हे मात्र खरे.∙∙∙

महाराष्ट्रातील प्रचारात गोव्याची बाजी!

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, खासदार सदानंद शेट तानावडे तसेच भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी लावलेल्या हातभारामुळे महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळाले. या नेत्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांचेही वजन केंद्रामध्ये वाढले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या सर्व नेत्यांनी महायुतीच्या निवडणुकीतील उमेदवारांबरोबर अहोरात्र घेतलेली मेहनत याचे फळ महाराष्ट्रात महायुतीला मिळाले. मुख्यमंत्र्यांनीही हे आवर्जून अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणा यशस्वी ठरली नाही. मात्र, महाराष्ट्रात महायुतीने २३२ जागा मिळवण्यात मजल मारली. मुख्यमंत्री म्हणून गोव्यात यशस्वी असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रातील प्रचारातही बाजी मारली. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी तर महाराष्ट्रात त्यांना पक्षाने ज्या मतदारसंघाची जबाबदारी दिली होती तेथेच बस्थान ठोकले होते. त्यामुळे त्यांनी प्रचार केलेल्या बहुतेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. या गोव्याच्या प्रचार फळीने केलेल्या कामगिरीची दखल केंद्राने घेतली आहे. ∙∙∙

पर्वरीतील न सुटणारे त्रांगडे

पर्वरीत उभारला जात असलेला उड्डाणपूल तेथील भविष्यातील वाहतुकीचा घोळ संपुष्टात आणण्यासाठी असला तरी सध्या या पुलाच्या कामामुळे दैनंदिन या मार्गाने प्रवास करणाऱ्यांची दैना उडत असून त्यावर उपाय योजण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. या मार्गावरून रोज हजारो सरकारी व खासगी आस्थापनात काम करणारे लोक प्रवास करत आहेत व या दिवसात ते कधीच कामावर वेळेवर पोचत नाहीत की घरी पोचत नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांचे एक वेळ ठीक आहे. कारण तेथे कधीच कोणी वेळेवर येत नसतो, पण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. ते वेळेवर पोचावे म्हणून घरून नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडतात खरे, पण तरीही पर्वरीत अडकून पडतात व त्यांना कामावर पोचायला उशीर होतो. बरे दुसऱ्या मार्गाने जावे म्हटले, तर दुसरा मार्गही नाही. हे काम तब्बल दोन वर्षे चालणार आहे. त्यामुळे त्यांना काय करावयाचे असे झाले आहे. काहीजण म्हणतात की कळंगुटकडे जाणारी सारी वाहने जर बेतीमार्गे वळविली तसेच चोगम मार्गावरून येणारी वाहने सोडली, तर पर्वरीतील समस्या सुसह्य होऊ शकेल, पण संबंधितांनी ते मनावर घ्यायला हवे ना. ∙∙∙

नेत्यांचा वायफळ खर्च

राज्यात अनेक नेते आणि आमदार उत्सव आणि कार्यक्रमांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत. यातून लोकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने जनतेमध्ये असंतोष पसरत आहे. नागरिकांचा असा विश्वास आहे की, या निधीचा उपयोग लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. या कार्यक्रमांचे औचित्य आणि त्यातून लोकांना मिळणारा प्रत्यक्ष फायदा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निधीचा उपयोग ग्रामीण भागात पाणीपुरवठा, रस्ते, शाळा यासारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. अनेक विभागांकडून निधीचा अभाव असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काही नेते मोठ्या प्रमाणात खर्च करून कार्यक्रम आयोजित करत असल्याने जनतेमध्ये असंतोष पसरत आहे. हे नेते आपल्या स्वार्थासाठी या कार्यक्रमांचा वापर करीत आहेत आणि त्यातून लोकांच्या समस्यांचे समाधान होत नाही अशी चर्चा सुरू आहे.∙∙∙

मडगाव पार्किंग प्रकल्पाचे स्वप्न

मडगावात २०१५ मध्ये बहुमजली पार्किंग प्रकल्पासाठी नगरपालिकेने शिलान्यास केला होता. तो कोणाच्या हस्ते झाला होता ते सगळेच विसरून गेले आहेत. मुहूर्तालाच कुजका नारळ निघावा तशी गत या प्रकल्पाची झाली आहे. कारण आता आठ नऊ वर्षे उलटली तरी हा प्रकल्प काही मार्गी लागत नाही. त्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. अगोदर जीएसटीचा अडथळा आला तर आता तो मोकळा करून निविदा काढली, तर त्यासाठी निविदा दाखल करायला कोणी पुढे येत नाहीत. त्यामागील कारण शोधण्याऐवजी नगरपालिकेने हायड्रॉलिक मेकॅनिकल पार्किंगचा विचार चालविला आहे. ही कल्पना नेमकी कोणाच्या डोक्यातून निपजली त्याचा शोध आता मडगावकर घेत आहेत. कारण पूर्वीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने अनेक दौरे झाले, आता या नव्या कल्पनेच्या अभ्यासासाठी दौरे निघाले नाहीत म्हणजे मिळविले असे ते म्हणत आहेत. मुद्दा अशा पार्किंग प्रकल्पाचा व त्यावर खर्च होणाऱ्या निधीचा नाही, तर यदाकदाचित असा प्रकल्प झालाच तर तेथे वाहने पार्क करण्याची सक्ती करण्याची धमक पालिकेमध्ये आहे की अन्य योजनांचे झाले तसे प्रकल्प पूर्ण झाला तरी आत्ताच्याप्रमाणे वाटेल तेथे वाहने उभी करण्याचे प्रकार चालूच राहतील असे प्रश्न केले जात आहेत. ∙∙∙

महाराष्ट्रामुळे भाजपवाले फॉर्मात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे तेथील भाजपवाल्यांना स्वर्ग दोन बोटे उरला आहे, पण त्याहून अधिक विजयोत्सव गोव्यातील भाजपवाले साजरा करताना दिसत आहेत. कदाचित त्यामागील कारण गोव्यातील भाजप नेते तसेच मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री व आमदार महाराष्ट्रात प्रचाराला गेले होते हे असेल. ते खरे असले तरी अनेक भाजपवाले हा विजय आपल्यामुळेच तेथे मिळाला अशा आविर्भावात वावरत आहेत. भाजपाच्या या विजयाची मीमांसा प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करताना दिसत आहे, पण त्या विजयातून गोवा भाजपने कोणता बोध घ्यायला हवा व आपल्या कारभारात सुधारणा करायला हवी ते कोणी करताना दिसत नाही व निष्ठावान भाजपावाल्यांना तीच चिंता सतावत आहे. अन्य पक्षांतून आलेल्यांमुळे आपणाला कोणी विचारत नाही अशी खंतही ते व्यक्त करतात. आमदार असो, जिल्हा पंचायत सदस्य असो वा नगराध्यक्ष - नगरसेवक असो. ते आपल्याच तोऱ्यांत वावरतात, कोणाचे ऐकून घेण्याच्या स्थितीत नसतात. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचा लोकसंपर्क घटत चालला आहे. आता तर महाराष्ट्रातील विजयामुळे २०२७ मध्ये पुन्हा भाजपच असे चित्र ते रंगवू लागले आहेत, पण महाराष्ट्रातील विजय नेमका का झाला याचा ते विचार करत नाहीत. तो जेव्हा ते करतील, तेव्हाच २०२७ मधील आव्हान त्यांच्या लक्षात येईल असे भाजपाचे हितचिंतकच म्हणत आहेत.∙∙∙

सूत्रसंचालकही बाहेरचे?

इफ्फीच्या उद्‍घाटन सोहळ्यात बाहेरचे लोकच जास्त दिसत होते. कलाकारांचे सोडा, कार्यक्रमाचे सूत्रसंचालकसुद्धा बाहेरचे म्हणजे टू मचच! लाखो रुपये देऊन आणलेल्या या सूत्रसंचालकांच्या पद्धतीत तसे काही नावीन्य होते असेही नाही. त्यापेक्षा गोमंतकीय निवेदकांना सूत्रसंचालन करण्याची संधी दिल्यास ते गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य ठरू शकेल अशी चर्चा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरू होती. एकीकडे मुख्यमंत्री इफ्फी आणि गोवा एकरूप झाले आहेत असे म्हणतात आणि दुसरीकडे सगळ्या सोहळ्यात बाहेरचे लोकच जास्त दिसतात. या विरोधाभासाला काय म्हणावे हेच कळत नाही. हे आम्ही नाही बोलत हो, या सोहळ्याला उपस्थित असलेले लोकच बोलत होते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT