सध्या फोंड्याचे पात्राव ‘लोकनायक’ रवी नाईक हे हरवळेहून निघालेल्या रथयात्रेचे आयोजन करण्यात मश्गुल आहेत. ही रथयात्रा गोव्यातील सर्व तालुक्यांत फिरणार असून त्यातून भंडारी समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा रवी यांचा म्हणे प्रयत्न आहे. ही रथयात्रेची कल्पना म्हणे त्यांचीच. भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक व त्यांचे साथीदार यांच्यामुळे समाजात पडलेली फूट सांधण्याचा हा रवींचा प्रयास असल्याचे फोंड्यातील भंडारी समाजाकडून बोलले जात आहे. रथयात्रेच्या समितीत भंडारी समाजातील मोठी मोठी नावे असल्यामुळे हे खरेही वाटायला लागले आहे. आता बघूया या समितीचे अध्यक्ष असलेल्या रवी बाबांचे ‘मिशन’ भंडारी समाज सफल होते, का ते?∙∙∙
मंत्री बाबूश मोन्सेरात हे अलिकडे उद्विग्न होताना दिसत आहेत, असे ते यापूर्वी झालेच नाहीत. परवा त्यांना पणजीत सापडलेल्या गांजाच्या रोपांविषयी विचारणा केली असता ती काय आपण लावली काय, अशी विचारणाच केली. आता स्मार्ट सिटीच्या कामांविषयी विचारणा केली की, त्यांची कपाळावर पहिल्यांदाचा आठी पडते आणि ताडकन ते संतप्त होतात. त्यामुळेच परवाही त्यांना असाच प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी इमॅजिन पणजीच्या अध्यक्षांना किंवा व्यवस्थापकीय संचालकांना विचारा, असे सांगितले. मात्र, आपण या शहराचे आमदार आहोत किंवा स्मार्ट सिटी इमॅजिनच्या मंडळावर आहोत, याचे भान त्यांना असायला हवे. मंडळावर असल्यानेच त्यांना विचारले तर बिघडले कुठे?. वारंवार प्रश्न उपस्थित होताहेत, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी मंडळातून बाहेर पडायला हवे आणि आपला स्मार्ट सिटीच्या कामांविषयी संबंध नसल्याचे दाखवून द्यायला हवे होते, ते धारिष्ट्य त्यांच्यातही नाही आणि त्यांच्या सुपूत्रातही. ∙∙∙
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात मध्यंतरी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आढावा बैठकांना उपस्थित राहत असत. कोणते काम कधी पूर्ण होईल याची माहितीही ते माध्यमांच्या प्रतिनिधींना देत असत. शहरातील कामाची पाहणी करतानाचे त्यांचे व्हिडिओही व्हायरल होत असत. तेच मोन्सेरात आता स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भातील प्रकल्पाच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. ते सरळ इमॅजीन स्मार्ट सिटी कंपनीचे प्रमुख असलेल्या मुख्य सचिवांकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. सध्या पणजीत पुन्हा खुदाईने जोर धरला आहे. कुठे कधी रस्ते खुदाई केली जाईल, याचा नेम नाही. काही भागात पार्क करून ठेवलेल्या कार रस्त्याच्या बाजूला असतानाच केलेल्या खुदाईमुळे गाड्या तेथे अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे हेच काय ते ‘स्मार्ट’ काम असा प्रश्न पणजीवासीयांना पडला आहे. ∙∙∙
मत्स्य महोत्सवाच्या आयोजनाकडे सरकारी यंत्रणेची नजर असणे साहजिक कारण तो सरकारी महोत्सव असतो. वार्षिक पद्धतीने मत्स्योद्योग खाते त्याचे आयोजन करते. मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी अधिक सक्रियता दर्शवत गुरुवारी रात्री या महोत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे हळर्णकर महोत्सवाच्या ठिकाणी पोचले. त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. परप्रांतीय मच्छीमारी ट्रॉलर पकडण्याच्या कामी त्यांनी अशी सक्रियता दर्शवावी, अशी पारंपरिक मच्छिमारांनी अपेक्षा आता व्यक्त केली तर नवल ते कोणते. हळर्णकर यांची सक्रियता आता बरेच काही सांगून जाणारी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.∙∙∙
पर्यटकांना वाईट वागणूक दिल्या प्रकरणी शॅक चालकांनी माफी मागितली आहे. आमदार मायकल लोबो यांनी या प्रकरणात लक्ष घातले. राज्यातील पर्यटनाची बदनामी करण्यात मोठे हात गुंतल्याचा आरोप होत असतानाच लोबो यांनी या प्रकरणी शॅक चालकांना माफी मागण्यासाठी प्रवृत्त केले ही मोठी बाब मानली जात आहे. लोबो दाम्पत्याने किनारी भागातील अवैध कृत्यांविरोधात आवाज उठवणे सुरू ठेवले आहे. शॅक परिसरात पर्यटकांना झालेली मारहाण राष्ट्रीय स्तरावर पोचली होती. त्यातून गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित नाही असा संदेश गेला असता तर त्याचा फटका पर्यटन क्षेत्राला बसला असता. याची जाणीव झाल्याने लोबोंनी शॅक चालकांना बोलावून घेऊन त्यांना पर्यटकांची जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. सरकार या घटनेकडे केवळ बघत राहिले असताना लोबो यांनी कृतीतून कोणाला योग्य तो संदेश दिल्याची चर्चा किनारी भागात ऐकू येतेय. ∙∙∙
राजधानीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे म्हणजे केवळ पणजीकरांसाठीच नव्हे तर सरकारसाठीही अवघड जागेचे दुखणे ठरलेले आहे, अशी एकंदर स्थिती आहे. या प्रकल्पाची कामे पूर्णही करता येत नाहीत व सोडून देताही येत नाहीत असे एकंदर चित्र आहे. या कामांमुळे त्रासलेले लोक आता न्यायालयात जात असल्याने न्यायालयही उठता बसता सरकारी यंत्रणेला जाब विचारताना दिसत आहे. गेल्या पावसाळ्यापूर्वी तर स्वतः न्यायाधीश मंडळाने रस्त्यावर उतरून पहाणी केली होती, पण तरीही संबंधित यंत्रणा त्यातून धडा शिकलेली नाही असेच आजची पणजीतील अवस्था पाहून दिसते.गतवर्षी तयार केलेले बहुतेक रस्ते पुन्हा खोदून ठेवल्याने लोकांना कुठून जावे तेच कळेनासे झालेले आहे, बरे एकंदर कामे कधी पूर्ण होतील तेही कळायला मार्ग नाही, कारण गेली पाच साडेपाच वर्षे ही कामे अशाच पध्दतीने सुरू आहेत. सरकार वेगवेगळी आश्वासने कामाच्या पूर्तीबाबत देते. पण सरकारने त्याऐवजी या योजनेतील किती व कोणती कामे पूर्ण झाली ते स्पष्ट करावे, अशी मागणी आता होऊ लागलीय. ∙∙∙
पोलिस खात्यात नव्या सहा पोलिस अधीक्षकांची पदे निर्माण करण्यात आली आहेत व तसेच सहा पोलिस उपअधीक्षकांची पदे थेट भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांत थोडी खुशी थोडी गम, अशी अवस्था आहे. जी पोलिस उपअधीक्षक ज्येष्ठता यादीत पहिल्या सहा क्रमांकावर आहेत त्यांना अधीक्षकपदी बढती मिळण्याची शक्यता असल्याने त्यांच्यात आनंद आहे तर जे पोलिस निरीक्षक बढतीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना थेट उपअधीक्षक पदे भरल्यास बढती मिळण्याची संधी हुकणार आहे. पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेले अनेकजणांनी पोलिस अधीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे मात्र यापुढे थेट भरतीद्वारे उपअधीक्षकांची नियुक्ती झाल्यास उपनिरीक्षकांना निरीक्षक म्हणून एक बढती मिळूनच सेवा निवृत्त होण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे निरीक्षक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. जी स्थिती आयआरबी पोलिसांच्या बाबतीत सध्या होत आहे ती गोवा पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत होणार आहे. आय आयआरबी पोलिस उपनिरीक्षकांना दोन दशके होत आली तरी काहीजण अजूनही त्याच पदावर आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.