Prostitution in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: वेश्‍‍याव्‍यवसायाची लिंक ग्रामीण गोव्यापर्यंत

गोव्‍यात (Goa) देशी-विदेशी पर्यटकांची (Tourism) संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी वेश्‍‍याव्‍यवसाय (Prostitution) व मुलींची तस्‍करीही वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनामुळे (Covid-19) अलीकडचे काही महिने सोडले तरी गोव्‍यात (Goa) देशी-विदेशी पर्यटकांची (Tourism) संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी वेश्‍‍याव्‍यवसाय (Prostitution) व मुलींची तस्‍करीही वाढली आहे. (Prostitution in Goa is spreading in rural areas)

याबाबत ‘अर्ज‘ (अन्‍यायरहित जिंदगी) या संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक अरुण पांडे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, पर्यटक येथे येतात ते ‘जिवाचा गोवा’ करण्‍यासाठी. परिणामी वेश्‍‍याव्‍यवसाय फोफावला आहे. किनारी भागात याचे प्रमाण जास्‍त असले तरी हळूहळू तो शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पोचला आहे. वेर्णा, वास्‍को, फोंडा, डिचोली, पर्वरी येथे अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश झालेला आहे. पूर्वी वेश्‍‍याव्‍यवसाय हॉटेलमध्‍येच चालायचा. आता हॉटेल्‍स पोलिसांच्‍या रडारवर आल्‍याने एजंट फ्‍लॅट किंवा घर भाड्याने घेऊन तेथे हा व्‍यवसाय चालवतात. कदाचित तो आपल्‍या घराच्‍या आसपासही सुरू असू शकतो.

या व्‍यवसायात ग्राहक मिळविताना खूप मोठी खबरदारी घेतली जाते. सर्व बाजूंनी चौकशी करून विश्‍‍वास पटल्‍यावरच सौदा पक्का केला जातो. एजंट एका दिवशी एका मुलीमागे ४० ते ५० हजार रुपये कमावतो. अशा अनेक मुली असतात. म्‍हणजे एजंटची एका दिवसाची कमाई लाखो रुपयांच्‍या घरात असते. मुलीच्‍या हातात मात्र केवळ दोन ते तीन हजार रुपये ठेवून बोळवण केली जाते. या तस्‍करीविरोधात आमची राज्‍यभर जागृती सुरू आहे. आतापर्यंत आम्‍ही सुमारे ४०० मुलींची या व्‍यवसायातून सुटका केलेली आहे. त्‍यातील ७ टक्के मुली या गोव्यातील आहेत, असे पांडे यांनी स्‍पष्‍ट केले.

वाढती मानवी तस्‍करी ही गोव्‍यासाठीही मोठी समस्‍या आणि डोकेदुखी ठरत चालली आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्‍थळ असल्‍यामुळे येथे या समस्‍येने शिखर गाठले आहे. देशातील तब्‍बल २३ राज्‍यांतून मुली आणून गोव्‍यात वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलल्‍या जातात. गेल्‍या पाच वर्षांत ‘अर्ज’ (अन्‍यायरहित जिंदगी) या संस्‍थेने ४०० मुलींची सुटका केली. पण अशी शेकडो प्रकरणे आहेत, जी उघडकीस येत नाहीत. त्‍यामुळे प्रत्‍यक्षात हा आकडा खूप मोठा असू शकतो. स्‍थानिक मुलीही या दलदलीत रुतत चालल्‍या आहेत. ही कीड वेळीच ठेचली नाही तर भविष्‍यात ती आपल्‍या घरापर्यंतही पोहोचू शकते.

जागतिक मानवी तस्‍करी विरोधी दिन

‘अर्ज’ आणि ‘इकॅप्‍ट’ (लक्‍झमबर्ग) यांनी‍ संयुक्तरित्‍या सर्वेक्षण करून 2014 ते 2019 या कालावधीचा एक अहवाल बनवला आहे. त्‍यानुसार गोव्‍यातील प्रकरणे आकडेवारीत खालीलप्रमाणे :

  • 400 मुली आणि महिलांची सुटका. 353 जणींनी मान्‍य केली की आपण या व्‍यवसायासाठी बळी पडलो आहोत.

  • 353 पैकी 298 भारतीय तर 55 विदेशी मुली.

  • शेजारच्‍या महाराष्‍ट्र राज्‍यातून व बांगलादेशातून सर्वांत जास्‍त तस्‍करी.

  • ऑफलाईन 64 टक्के तर ऑनलाईन 36 टक्के तस्‍करी.

  • हॉटेल/लॉजमध्‍ये 77.7 टक्के, मसाज पार्लरमध्‍ये 12.4 टक्के तर फ्‍लॅट/बंगल्‍यात 9.8 टक्के व्‍यवसाय.

  • वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलण्‍याचे प्रमाण : मित्रांकडून 34.5 टक्के, ओळखीच्‍या माणसांकडून 22.1 टक्के तर अनोळखी व्‍यक्तींकडून 23.3 टक्के. त्‍यात पालक आणि जोडीदाराचे प्रमाण अत्‍यल्‍प म्‍हणजे जवळपास 6 टक्के आहे.

  • पोलिसांकडून सुटका झालेली प्रकरणे : क्राईम ब्रँच 33.6 टक्के, कळंगुट पोलिस 21.8 टक्के, हणजूण पोलिस 12.4 टक्के, पणजी पोलिस 9.5 टक्के.

  • सुटका करण्‍यात आलेल्‍या मुलींचे वय : 25 ते 35 वयोगटातील 43.22 टक्के, 21 ते 25 वयोगटातील 35.87 टक्के, 18 ते 21 वयोगटातील 12.99 टक्के.

"मानवी तस्‍करी रोखण्‍यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे. तसेच राज्‍याच्‍या सीमेवर कडक तपासणी होणे गरजेचे आहे. कारण महाराष्‍ट्रातून गोव्‍यात तस्‍करी मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्‍ही तीन सदस्‍यीय समिती स्‍थापन केली असून, लवकरच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. या समस्‍येवर काय तोडगा काढता येईल, या उद्देशाने पुढील दोन महिन्‍यांत विविध उपाययोजना करण्‍यात येतील. कारण आमच्‍या पोरीबाळींचे भविष्‍य महत्त्‍वाचे आहे."

- विद्या गावडे, अध्‍यक्षा (गोवा महिला आयोग)

"गोव्‍यात मुलींची तस्‍करी होतेय ही बाब आता लपून राहिलेली नाही. महाराष्‍ट्र, प. बंगाल आणि दिल्ली या राज्‍यानंतर गोव्‍यात मोठ्या संख्‍येने मुली आणल्‍या जातात. आमच्‍या ‘अर्ज’ संस्‍थेने आतापर्यंत सुमारे 400 मुलींची वेश्‍‍याव्‍यवसायातून सुटका केलेली आहे. पण याविरोधात आवाज उठवायचा असेल तर समाजात एकजूट पाहिजे. अशा गैरव्‍यवस्‍थेविरोधात दबाव निर्माण केला पाहिजे. तो जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अशा अनैतिक गोष्‍टींना रान मोकळेच असेल."

- अरुण पांडे, संस्‍थापक (‘अर्ज’, अन्‍यायरहित जिंदगी)

"पर्यटनाला प्रोत्‍साहन देत असताना दुसऱ्या बाजूने दारू, जुगार याबरोबरच अप्रत्यक्षरीत्या वेश्‍‍याव्‍यवसायही फोफावत चालला आहे. मागे एकदा एका मुलीला पाटो-पणजी येथील कार्यालयाचा पत्ता देऊन नोकरीच्‍या उद्देशाने वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. लागलीच तिने आमच्‍याशी संपर्क साधला. आम्‍ही त्‍या फोनवर पुन्‍हा संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो लागला नाही. मुलींनी सावध राहिले पाहिजे."

- सबिना मार्टिन्‍स, संयोजक (बायलांचो साद)

-संतोष कुबल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT