Premier League Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लढतीत साळगावकर क्रिकेट क्लबने जीनो स्पोर्टस क्लबविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद 382 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तीन दिवसीय सामन्याला गुरुवारपासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात झाली.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर जीनो क्लबने पहिल्या डावात 7 षटकांत बिनबाद 14 धावा केल्या. साळगावकर क्लबच्या डावात प्रथमेश गावसने 59, आदित्य सूर्यवंशीने 28, कर्णधार दीपराज गावकरने 57, गगनदीपने 59 धावा केल्यानंतरही त्यांचा संघ 8 बाद 251 धावा असा धापा टाकत होता. मात्र साईश कामत (49) व दहाव्या क्रमांकावरील शिवम सिंग (नाबाद 81 धावा, 82 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार) यांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करून संघाला साडेतीनशे धावांच्या जवळ नेले. नंतर अखेरचा फलंदाज सागर उदेशी (24) या साथीत शिवम याने साळगावकर क्लबला पावणेचारशे धावांचा टप्पा गाठून दिला.
दुसरीकडे, जीनो क्लबचा ऑफस्पिन गोलंदाज मोहित रेडकर (37-10-120-6) गडी बाद करण्यात सफल ठरला, मात्र झीशन अन्सारी (19-0-107-0) व कर्णधार दर्शन मिसाळ (29-4-100-2) हे महागडे ठरल्याने साळगावकर क्लबचे फावले. तुलनेत युवा वेगवान समर्थ राणे (7-1-28-1) व डावखुरा फिरकी अमूल्य पांड्रेकर (2-0-16-1) यांच्याकडे झालेले दुर्लक्ष प्रश्नांकित ठरले.
सांगे येथील जीसीए मैदानावर मडगाव क्रिकेट क्लबच्या समर दुभाषी याने नाबाद प्रेक्षणीय शतक (134 धावा, 193 चेंडू, 17 चौकार) झळकावले. त्याने यश कसवणकर (नाबाद 66) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 181 धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे मडगाव क्रिकेट क्लबला चौगुले स्पोर्टस क्लबविरुद्ध पहिल्या डावात दिवसअखेर 5 बाद 277 धावा करणे शक्य झाले. चौगुले क्लबच्या फरदिन खान याने 51 धावांत 4 गडी बाद केले.
कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर धेंपो क्रिकेट क्लबच्या सर्वबाद 265 धावांना उत्तर देताना पणजी जिमखान्याच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 96 अशी घसरगुंडी उडाली. धेंपो क्लबचा फिरकी गोलंदाज विकास सिंग याने 15 धावांत 4 गडी बाद केले. पणजी जिमखान्याच्या ईशान गडेकरने सर्वाधिक 45 धावा केल्या. धेंपो क्लबच्या डावात यश शर्मा (98), सोहम पानवलकर (59) व हेरंब परब (नाबाद 37) यांनी प्रमुख योगदान दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.