Cashew Harvest Season
वाळपई: सत्तरी तालुक्यात सध्या काजू उत्पादन घेणारे बागायतदार काजू बागायतीत वाढलेले नैसर्गिक तण म्हणजेच काजू बेणणी करण्याच्या कामात व्यस्त आहेत.
साधारणत: तुळशीविवाहानंतर लोकांना काजू पीक हंगामाचे वेध लागतात. फेब्रुवारी-मार्चपासून काजू हंगामाला सुरवात होत असते. पण त्याआधी बागायतीत मोठ्या प्रमाणात वाढलेले तण काढणे आवश्यक असते.
हे तण काढले तरच काजू हंगामात जागेत फिरून बोंडू गोळा करण्यास मिळतात. सत्तरी तालुक्यात काजू पीक बागायतदार वर्गाचे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. येथील काजू बियांना चांगली चव आहे. पण ती चव प्राप्त करायची असेल तर गावठी काजूंची लागवड करणे गरजेचे आहे. हे करत असताना काजू पीक व्यवस्थापन महत्त्वाचे असते.
त्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तणांवर नियंत्रण करणे. मात्र ते व्यवस्थापन करत असताना सध्याच्या घडीला काजू बागायतदारांना खूप अडचणी येत आहेत. काजू हंगाम मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो. साधारणत: मार्च महिन्यापासून काजू बियांचे उत्पादन मिळण्यास सुरू होते. पण त्याआधी काजू बागायतीत वाढलेले नैसर्गिक मोठे झालेले तण काढणे आवश्यक असते. ती कामे सध्या सुरु आहेत.
या कामासाठी स्थानिक कामगार कमी प्रमाणात मिळतात. नवीन पिढी अशी कामे करण्यास रस दाखवत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रसंगी शेजारच्या कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून कामगार आणावे लागतात. त्यांना चांगला रोजगार द्यावा लागतो. त्यामुळे बेणकटीची कामे ही बागायतदारांच्या अंगलट आलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती बनलेली आहे. परिणामी दरवर्षी काजू बागायतदारांना तोटाच सहन करावा लागतो. पण तरीही काजू बागायतीतील उत्पादन सुरळीत राहण्यासाठी दरवर्षी बागायतदारांना बेणकटीची कामे करावी लागतातच. सध्याच्या घडीला रोजंदारी ५०० ते ७०० रुपयांपर्यंत गेलेली आहे.
काजू पीक सत्तरीतील लोकांचे शेकडो वर्षांपासूनचे उपजीविकेचे साधन आहे. पूर्वी लोक याच पिकावर अवलंबून होते. ‘काजू’ हा एक आधार होता. पण बदलत्या काळानुसार काजू पीक घेणे खूप कठीण होऊन बसले आहे. बागायतीत प्रचंड प्रमाणात तणांची वाढ होते. कामगारांची कमतरता जाणवते. मिळालेच तर त्यांना रोजंदारीही मोठी द्यावी लागते. मात्र अलीकडे उत्पादनही घटले आहे. काजूची झाडे रोगामुळे तग धरू शकत नाहीत. परिणामी बेणणी खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही.विष्णू गावकर, काजू बागायतदार (वाळपई)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.