Mandrem News : मोरजी, जुनसवाडा-मांद्रे येथील आम्रपाली परिसरातील सर्व्हे क्र. ३६५/१ मधील बेकायदा कामे थांबवण्याचा आदेश ग्रामपंचायतीने दिला आहे.
‘स्वराज’ संस्थेचे सदस्य अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी याप्रकरणी नगरनियोजन खात्यासह मामलेदार, पंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील करारी पथकाकडे तक्रारी केल्या होत्या. पंचायत मंडळाने दोनवेळा पाहणी केली होती.
मात्र, नगर नियोजन खात्याने बांधकामांना परवानगी दिल्याने कोणतीही कारवाई केली नव्हती. याप्रकरणी ॲड. शहापूरकर यांनी उपोषण करण्याचे जाहीर केले होते.
भरारी पथकाने पाहणी केल्यावर या जागेत साडेतीन हजार चौरस मीटर लांब आणि ७ मीटर खोल क्षेत्रफळात डोंगर कापणी करून जमिनीची रचनाच बदलून टाकण्यात आल्याचे या पथकाला आढळले होते.
या अहवालानंतर अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी सतत पाठपुरावा केला तरी नगरनियोजन खात्याने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, पाहणी अहवालानुसार डोंगर कापणीसाठी कोणत्याही यंत्रणेने परवानगी दिली नसल्याचे उघड झाले होते.
तरीसुद्धा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याकरिता न कळवता केवळ तिथे लक्ष ठेवण्याच्या सूचना नगर नियोजन खात्याने केल्या होत्या.
या बेकायदा प्रकरणात कारवाई होत नसल्याने शहापूरकर यांनी १४ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मांद्रेतील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजवळ करण्याचे जाहीर केले होते.
त्या दिवशी उपोषणस्थळी पंचायत मंडळ तसेच स्वराज संस्थेचे पदाधिकारी शहापूरकर यांना पाठिंबा दिला होता.
मात्र, नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी या उपोषणाची दखल घेत शहापूरकर यांच्याशी संपर्क साधून लवकरच अहवाल मागवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच शहापूरकर यांनी सरपंच अमित सावंत यांनी त्वरित कारवाईसाठी पावले उचलण्याची मागणी उपोषणावेळी केली होती.
त्यासाठी एक आठवड्याचा अवधी देत उपोषण स्थगित केले होते. याप्रकरणी सरपंच अमित सावंत यांनी सोमवारी दखल घेत इस्प्रावा लक्झरी रिअल्टी थ्री एलएलपी लिमिटेड या कंपनीला नगरनियोजन खाते संयुक्त पाहणी करेपर्यंत काम बंद करण्याचा आदेश दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.