Rice  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: आता पुरे! पावसामुळे शेतकरी हतबल; मोठ्या प्रमाणात भातशेती आडवी, झेंडूच्या फुलांचीही नासाडी

Rice Farming: राज्यात मान्सूनोत्तर पावसाचा मारा सुरू असल्याने भातशेती संकटात आली आहे. शेतात पाणी भरल्याने भातपीक आडवे झाले आहे. त्यामुळे मोठा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Continuous Rainfall Disrupts Rice Harvest in Goa, Leaving Farmers in Distress

पणजी: राज्यात मान्सूनोत्तर पावसाचा मारा सुरू असल्याने भातशेती संकटात आली आहे. शेतात पाणी भरल्याने भातपीक आडवे झाले आहे. त्यामुळे मोठा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. बहुतेक भागात भातशेती कापणीस आली आहे, परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल आहेत.

पाऊस कधी एकदाचा जातोय, त्याची सगळ्यांना प्रतीक्षा लागून राहिली असतानाच पावसाचा पुन्हा धुमाकूळ सुरु झाला आहे. दिवाळी दिवशी सायंकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

सलग तीन दिवस पाऊस हजेरी लावत असल्यामुळे विविध भागातील भातशेतीत पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी भाताची कणसे आडवी झाली आहेत, त्यामुळे बळीराजा अस्वस्थ आहे. डिचोलीतील बहुतांश भागात भातपीक कापणीसाठी तयार झाले असून बळीराजाने कापणीच्या कामाला हात घालण्याची तयारी केली होती. परंतु पावसाचा कहर सुरूच असल्याने कापणीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, भातशेतीत पाणी साचून भाताची कणसे आडवी झाल्याने या कणसांना कोंब येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आता पावसाने कृपा केली तरच थोडेफार भातपीक मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे.

डिचोली तालुक्यात संकटाचे ढग; पिकाची नासाडी अटळ

दहा-बारा दिवसांपूर्वी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यात बोर्डे, मये आदी भागात किरकोळ प्रमाणात भातपीक आडवे झाले होते. त्यानंतर अधूनमधून पाऊस पडूनही भातशेती सुरक्षित होती. मात्र गेल्या तीन दिवसांत पावसाने कहर केला, गुरुवारी तर जोरदार तडाखा दिला. त्यामुळे बहुतेक भागातील भातपीक आडवे झाले आहे. त्यात अजूनही ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने ''यलो अलर्ट'' जारी केला आहे, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाचा कहर चालूच राहिल्यास यंदा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची भीती बळीराजाला वाटत आहे.

यंदा पिकाला उशीर झाला असला तरी अजूनही भातपीक सुरक्षित होते. मात्र पावसाचा तडाखा कायम राहिल्यास भातपिकाची नासाडी अटळ आहे, अशी भीती मये येथील शेतकरी नागेश नाईक आणि प्रमोद घाडी यांनी व्यक्त केली.

उशिरा पेरणी केलेल्या भातशेतीवर परिणाम

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात भातशेती आडवी झाली असून तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिसकावून घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. सत्तरी, केपे, डिचोली, केपे, काणकोण आदी भागात अजूनही भात कापणी झालेली नाही. काहीचे भात पिकले आहे परंतु सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कापणीला सुरवात झालेली नाही.

शेतकऱ्यांना पडणाऱ्या पावसाचा परिणाम जाणवत आहे. परंतु या पावसामुळे भातशेती कुजण्याची शक्यता नाही. सासष्टी, बार्देश भागातील शेतकरी हे लवकर पेरणी करतात त्यामुळे त्यांची भात कापणी देखील लवकर होते. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणी करून मळणी करून भात घरी गेले आहे. परंतु डिचोली, काणकोण, केपे, धारबांदोडा आदी भागात अजूनही भात कापणी झालेली नसल्याने काही प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र भात कुजणे आदी प्रकार घडणार नसल्याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.

सत्तरीत भातशेती पाण्याखाली, कापणीचे काम लांबणीवर

सत्तरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आधीच सत्तरीत भात शेतीचे क्षेत्र घटले आहे. जी भातशेती टिकून आहे, तीही आता नष्ट होण्याची मार्गावर आहे. त्यामुळे पुढे भातशेती करण्यास कोणी पुढे येईल का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सत्तरीत गेले दोन दिवस धो धो पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतात पाणी भरून भातशेती आडवी झाली आहे.

येथील तुकाराम हळदणकर यांच्या भात शेती पाण्याखाली गेली आहे. भातपीक कापणीस तयार असले तरी पावसाचा जोर कायम असल्याने कापणीला सुरवात केलेली नाही. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये कापणी केली जायची. परंतु नोव्हेंबर आला तर पाऊस कमी होत नसल्याने हळदणकर यांची चिंता वाढली आहे.

या आठवड्यात भाताची कापणी झाली नाही जर शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. यंदा पीक चांगले आले आहे. परंतु या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्याशिवाय भात कापणी करता येणार नाही, असे हळदणकर यांनी सांगितले. सावर्डे येथील शेतकरी शिवाजी देसाई म्हणाले की, आपले भातपीक कापणीस तयार झाले आहे. येत्या आठवड्यात कापणी होणे गरजेचे आहे.

झेंडू फुलांची नासाडी, जागोजागी खच

दिवाळीच्या दिवशी गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्यात येथील बाजारातील विक्रेत्यांची अक्षरशः दाणादाण उडाली. पावसात भिजल्याने काही फूल विक्रेत्यांनी तर झेंडूची फुले रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे बाजारात झेंडू फुलांचा खच पडला होता. दरम्यान, पावसामुळे झेंडू फुलांचा भावही उतरला होता.

गुरुवारी सर्वत्र दिवाळीचा उत्साह संचारला असतानाच दुपारी विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह अचानक पावसाला सुरवात झाली. अचानक पाऊस आल्याने बाजारात उघड्यावर बसलेल्या विक्रेत्यांची अक्षरशः तारांबळ उडाली. काही विक्रेत्यांनी लगेच गाशा गुंडाळला तर काही फूल विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली झेंडूची फुले बसल्याजागीच सोडून दिली.

तुटवड्यामुळे यंदा दसऱ्यावेळी झेंडू फुलांना भाव आला होता. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तर २०० रुपये किलो या दराने झेंडू फुलांची विक्री झाली होती. दसऱ्याप्रमाणेच यंदा दिवाळीला झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण होऊन ही फुले महागणार, असा एक अंदाज होता. मात्र यंदा दिवाळीला डिचोलीत झेंडू फुलांची आवक वाढली होती. फुलांचे दरही समाधानकारक होते. गुरुवारी सकाळी १०० रुपये किलो असे झेंडू फुलांचे दर होते. मात्र दुपारी पावसाचा तडाखा बसताच, सायंकाळी झेंडूची फुले स्वस्त झाली. ४० ते ५० रुपये किलो या दराने झेंडूची फुले विकण्यात येत होती. पावसामुळे झेंडू फुलांची नासाडी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT