Porvorim Giri Road Issue  Dainik Gomantak
गोवा

Porvorim: पर्वरीत समस्यांचा बकासूर! उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी, पोलिसांची कमतरता; भरीत भर म्हणून मलनिस्सारण कामाचा अडसर

Porvorim Flyover: पर्वरीतील गौरी पेट्रोल पंप ते गिरीपर्यंतच्या सुमारे ५ किलोमीटर अंतरावर उड्डाण पुलाच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी समस्या दिवसेंदिवस जटील होत असून वाहतूक पोलिसांची अपुऱ्या मनुष्यबळामुळे तारांबळ उडत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Flyover Traffic Jam Road Issue

पणजी: पर्वरीतील गौरी पेट्रोल पंप ते गिरीपर्यंतच्या सुमारे ५ किलोमीटर अंतरावर उड्डाण पुलाच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी समस्या दिवसेंदिवस जटील होत असून वाहतूक पोलिसांची अपुऱ्या मनुष्यबळामुळे तारांबळ उडत आहे. दरम्यान, मंगळवारपासून सेवा रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण व सुरळीत ठेवण्यास आवश्‍यक असलेला वाहतूक पोलिस फौजफाटा कमी आहे. पुलाच्या कामाच्या ठिकाणी असलेली बांधकाम यंत्रणा यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये सुमारे दीडशे पोलिसांची आवश्‍यकता आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिथे रस्ता अरुंद आहे व जंक्शन आहे तसेच वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्यात आली आहे, तेथे चोवीस तास पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या रस्त्याच्या बाजूला काहीजण वाहने उभी करून ठेवत असल्याने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यावर वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त स्थानिक पोलिस स्थानकातून पोलिस कर्मचारी पुरवले जात नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूची रुंदी वाढवण्याची मतप्रदर्शन केले होते. मात्र, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. रस्त्याच्या मधोमध उड्डाण पुलाच्या खांबांचे काम सुरू आहे तसेच तेथे पत्रे लावण्यात आले असल्याने एकाचवेळी समान दोन वाहने शक्य नाही. तरीही काही वाहन चालक एकमेकाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात वाहतुकीची कोंडी करत आहेत, असे मत वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

इफ्फी, शवप्रदर्शन; पोलिसांवर ताण

वाहतूक पोलिस विभागात कर्मचाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. मोटार वाहन नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांना विविध भागात पाठवले जाते. याव्यतिरिक्त काही ठिकणी जंक्शनवर पोलिसांना तैनात केले जाते. सेंट झेव्हियर शवप्रदर्शन सोहळा व इफ्फी हे एकाचवेळी सुरू होत आहे. त्यामुळे तिथेही वाहतुकीवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पर्वरीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली पोलिसांची संख्या कमी आहे. चोवीस तास पर्वरीत पोलिसांची नेमणूक असणे आवश्‍यक आहे. दोन पाळ्यामध्ये पोलिसांची वर्णी लावण्यासाठी किमान १५० पोलिस हवेत मात्र सध्या ते शक्य नाही. आयआरबी पोलिसांची मदत देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

आणखी काही वर्षे राहणार समस्या

या उड्डाण पुलाचे बांधकाम पुढील काही वर्षे सुरूच राहणार असल्याने ही वाहतुकीची समस्या राहणार आहे. गौरी पेट्रोल पंप ते गिरीपर्यंत या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असल्याने तेथे काही मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या रस्त्यावर सकाळी कार्यालयात जाण्यासाठी व संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. प्रत्येकजण एकमेकाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असल्याने वाहतुकीची कोंडी होते. एकामागोमाग वाहने न जाता प्रत्येकजण वाहने पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतो. परिणामी वाहतूक कोंडी होते.

पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता!

सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पणजी शहरातील इफ्फीसाठी तसेच जुने गोवे येथेल सेंट झेव्हियर शवप्रदर्शन सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी व महाराष्‍ट्रातील निवडणुकीसाठी गोव्यातून पोलिस पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी असलेला कर्मचारी वर्ग खूपच कमी आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर आयआरबीचे पोलिस गोव्यात परतल्यावर त्यांची मदत घेतली जाणार आहे.

वाहतूक वळवण्याला ‘सिव्हरेज’ कामाचा अडसर!

पर्वरीत उड्डाण पुलाचे काम सुरू होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी उद्‍भवणार, याची कल्‍पना होती. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्याचा पर्याय म्हणून सांगोल्डा मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु, सांगोल्डा येथील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम (मलनिस्सारण प्रकल्प) अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहतूक वळविण्यात उशीर होत आहे. मलनिस्सारण काम पूर्ण झाल्यावर आणि रस्ते पूर्णपणे दुरुस्त झाल्यावरच वाहतूक वळविण्याची प्रक्रिया सुरू होईल,असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

उड्डाणपुलाचे काम सुरू होताच सांगोल्डा येथून वाहतूक वळविण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला होता. अजून वाहतूक वळविण्यात उशीर का होत आहे, असे विचारले असता ‘साबांखा’चे कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हालो यांनी सांगितले की, सांगोल्डा येथील अंतर्गत रस्त्यांवर मलनिस्सारणाचे काम सुरू आहे. ते काम संपल्यावर अंतर्गत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करून वाहतूक वळविण्यात येईल.

गिरी आणि पर्वरी मॉल द गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वाहतूक कोंडी इतकी जटिल झाली होती की, एक रुग्णवाहिका तब्बल पाच मिनिटे अडकून पडली.

नियोजन कुठे गेले?

या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे सरकारचे नियोजन होते, पण सर्व्हिस रोड का बांधला गेला नाही, हा प्रश्न वाहनचालक करत आहेत. विकासकामे करणे एवढेच पुरेसे नाही, तर ती नियोजनबद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे, असा टोला नागरिक सरकारला हाणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT