पणजी: पर्वरी आणि चोडणला जोणाऱ्या पुलाच्या बांधणीसाठी गोवा सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या (GSIDC) वतीने साल्वादोर द मुंद ते माडेल चर्च (चोडण) पुलासाठी पात्र कंत्राटदाराकडून निविदा मागविल्या आहेत. या पुलासाठी सरकारने २७४.८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने (GSIDC) तीन वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे, असे टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. गोव्यात असणाऱ्या १७ बेटांपैकी चोडण हे सर्वात मोठे बेट आहे. राजधानी पणजीपासून हे बेट पाच किमीच्या अंतरावर आहे. याच बेटावर प्रसिद्ध सलीम अली पक्षी अभयारण्य आहे.
चोडणला पणजी जोडण्यासाठी सध्या केवळी फेरीची मदत घ्यावी लागते. रायबंदर येथून ही फेरी चोडणला जोडते. पर्वरीतून होणारा पुल साल्वादोर द मुंद ते चोडणमधील माडेल यांना जोडणारा मुख्य रस्ता असेल. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण सुरु करण्यात आले होते.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आणि आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यासाठी अनेक बैठका घेतल्या. पुलाचे काम सुरु होण्यापूर्वी जमीन गमावलेल्यांना मोबदला मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती.
मार्च २०२३ मध्ये साल्वादोर द मुंद येथील अनेकांनी या पुलाला विरोध दर्शवला होता. पुलासाठी अनेक घरं, संरक्षक भिंती पाडव्या लागतील अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. अरुंद मार्गामुळे वाहतूक कोंडीची भितीही स्थानिकांनी व्यक्त केली होती.
निविदेमधील अटी
- दोनपदरी पूल किंवा ९०० मीटर लांबींचा उड्डाणपूल बांधकामाचा कंत्राटदाराला अनुभव असावा.
- धुळीची समस्या असल्याने कंत्राटदाराने वारंवार पाणी फवारण्याची जबाबदारी घ्यावी.
- कामात विलंब झाल्यास दिवसाला १३.७४ लाखांची भरपाई द्यावी लागेल.
अखेर सरकारने या पुलासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या असून, निविदाही मागविल्या आहेत. या पुलामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही चोडण बेटावर जाण्यासाठी फेरीसह रस्त्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, अलिकडे सरकारने रायबंदर – चोडण फेरींची संख्या वाढवली आहे. यामुळे या प्रवासाचा वेळ कमी झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.