South Goa Election : फोंडा, : पुढील महिन्यात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पाच सहा महिन्यांत लोकसभा निवडणूक होईल. साधारण फेब्रुवारी- मार्चमध्ये लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून उत्तर गोवा भाजपकडे तर दक्षिण गोवा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. यावेळी दक्षिण गोव्यात झेंडा रोवण्याची भाजपची रणनिती आहे.
काँग्रेसही आपला बालेकिल्ला राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात यावेळी फोंडा तालुक्यातील मते निर्णायक ठरणार आहेत.
फोंडा तालुक्यात तीन विधानसभा मतदारसंघ मोडतात. मागच्या वेळी फोंडा तालुक्यातील मडकई मतदारसंघातून भाजपला फक्त २००० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दक्षिण गोव्याची जागा भाजपच्या हातातून ९००० मतांनी निसटली.
परंतु यावेळी मडकईचे आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर हे भाजप सरकारसोबत असल्याने मडकईतील मते यावेळी भाजपच्या बाजूने वळू शकतात. मात्र फोंडा व शिरोडा विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने राहणार आहे, याबाबत उत्सकता आहे.
फोंडा विधानसभा मतदारसंघ कॉग्रेसचा बालेकिल्ला गणला जात होता. परंतु रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे येथील समीकरणे बदली आहेत.
मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला अडीच हजार मते मिळाली होती. रवींमुळे भाजपच्या मतांत किती वाढ होते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. शिरोड्याचा कौलही यावेळी भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मंत्री सुभाष शिरोडकर यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागेल.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ कॉग्रेसचा बालेकिल्ला असला तरी यावेळी कॉग्रेसला हा बालेकिल्ला राखण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत. भाजप आपली सगळी शक्ती येथे खर्च करणार आहे.
वेरेकरांची भिस्त लोकसभा निवडणुकीवर
गेल्या विधानसभा निवडणुकीत फोंड्यातील कॉग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हे जरी तिसऱ्यास्थानी फेकले असले तरी त्यांनी जिद्द सोडलेली दिसत नाही.
अनेक सामाजिक कार्यक्रमांत ते दिसतात. फोंडा हा कॉग्रेसचा गड राहिला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला वेरेकर फोंड्यातून किती मते मिळवून देतात, यावर त्यांचे पुढील भविष्य अवलंबून असणार आहे. तसेच डॉ. भाटीकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
दक्षिणेत भाजपची उमेदवारी कोणाला...?
गेल्या वेळी भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा केवळ नऊ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी सावईकर यांना पक्ष उमेदवारी मिळेल, याबाबत अजून काही स्पष्टता नाही.
सावईकर यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. तालुक्यातील बहुतेक कार्यक्रमात त्यांचे दर्शन घडते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.