Damu Naik, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Ponda By Election: भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की दिल्लीत पक्षीय पातळीवर विविध विषयांवर चर्चा होईल. त्यात या विषयाचाही समावेश असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असावा, याविषयी भाजपने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी कुठलेही संकेत देणे टाळले असून १०-११ रोजी दिल्लीत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत त्याविषयी चर्चा होणार आहे.

फोंडा येथे आज सकाळी ‘माझे घर’ योजनेच्या अर्जवाटप कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले असता, पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले. त्यावर त्यांनी, ‘उमेदवारीचा निर्णय पक्ष घेतो, मी नव्हे’, असे सांगत या विषयापासून फारकत घेतली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की दिल्लीत पक्षीय पातळीवर विविध विषयांवर चर्चा होईल. त्यात या विषयाचाही समावेश असेल. पक्षीय संकेतानुसार संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाते. तसेच याही बाबतीत होईल.

कृषिमंत्री पदावर असताना रवी नाईक यांचे निधन झाल्याने तेथे आता एप्रिलपूर्वी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. २०२२ मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी युती केलेल्या मगोपने या पोटनिवडणुकीत भाजपने रवींचे पुत्र रितेश यांना उमेदवारी द्यावी, असे सुचविले आहे. मगोपने युती धर्म निभावण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे.

भाटीकरांच्या भूमिकेमुळे भाजपसमोर पेच

या मतदारसंघात मागील निवडणुकीत मगोपकडून लढलेले डॉ. केतन भाटीकर हे अवघ्या ७७ मतांनी पराभूत झाले होते. त्यांनी यंदाची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने भाजपसमोर पेच वाढला आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी डॉ. भाटीकर यांच्याशी चर्चा करू, असे म्हटले असले तरी त्यांनी भाटीकर रिंगणात नसतीलच, असे ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळे या घडामोडींकडे भाजपचे लक्ष आहे.

...म्हणून उमेदवारी लांबणीवर

या पोटनिवडणुकीसाठी एप्रिलपर्यंत वेळ असल्याने भाजपकडून उमेदवारी जाहीर करणे लांबणीवर टाकण्याची खेळी खेळली जाईल, असे मानले जात आहे. सध्या रवींचे निधन हा विषय ताजा असल्याने भाजपच्या निर्णयाची चिकित्सा भावनिक पातळीवर होऊ शकते, याचा अंदाज भाजपला आहे. त्यामुळे वेळकाढूपणातून बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील, असे भाजपच्या धुरिणांना वाटते.

दळवींच्या हालचालींवर बारीक नजर

फोंड्याचे नगरसेवक अपूर्व दळवी यांनी आपल्याला पक्षाने २०२२ मध्ये पुढील खेपेला फोंड्याची उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रवी यांच्या कामाचा वारसा तेच सक्षमपणे पुढे नेऊ शकतात. ते लोकप्रिय असल्यानेच नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे दळवी यांच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष लागून राहिले आहे.

रॉयच्या निर्णयामुळे गुंता वाढला

रवी यांचे द्वितीय पुत्र रॉय यांनीही उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे, असे वक्तव्य करून राजकीय गुंता आणखी वाढवला आहे. त्यामुळे रितेश आणि रॉय यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात भाजप अनेक गोष्टींचा अभ्यास करत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

प्रदेश काँग्रेसचा सावध पवित्रा

फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्‍याबाबत विरोधी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला असून, भाजपने उमेदवार जाहीर केल्‍यानंतरच उमेदवाराची निवड करण्‍याचे निश्‍चित केले आहे. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स या पक्षांची युती झाली तरच फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत काँग्रेस या पक्षांशी चर्चा करेल. अन्‍यथा वैयक्तिक पातळीवर निर्णय घेईल, अशी माहिती काँग्रेसच्‍या वरिष्‍ठ सूत्रांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

फोंडा मतदारसंघात सहा महिन्‍यांत पोटनिवडणूक घ्‍यावी लागणार आहे. या निवडणुकीत रवी नाईक यांचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून देण्‍याचे आवाहन मगोपने इतर सर्व पक्षांना केले आहे.

भाजपचा निर्णय भावनिक, की वस्तुनिष्ठ?

रवींच्या निधनानंतर झालेल्या शोकसभा, त्याला लाभलेली उपस्थिती यांचेही विश्लेषण करण्यात येत आहे. ही उमेदवारी भावनिक पातळीवर ठरवली जावी, की जिंकून येण्याची क्षमता हा निकष लावावा, याबाबतही भाजप निर्णय घेणार आहे.

युतीनंतरच फॉरवर्ड, आरजीशी चर्चा

फोंडा पोटनिवडणूक जिल्‍हा पंचायत निवडणुकीनंतर होणार असून या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीसोबत युती करायची की नाही, हे अद्याप ठरले नसल्‍यामुळे काँग्रेसने फोंडा पोटनिवडणुकीबाबत या दोन्‍ही पक्षांशी संपर्क साधलेला नाही. युतीबाबतचा निर्णय अंतिम झाल्‍यानंतर या दोन्‍ही पक्षांशी चर्चा करून काँग्रेस उमेदवाराची निवड करणार असल्‍याचेही सूत्रांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘माझे घर’ योजनेच्या अर्ज वितरण कार्यक्रमात ‘आज पात्रांव नाहीत; पण मी आहे’ असे सांगितले आहे. यातून त्यांनी वेगळाच संदेश दिल्याची चर्चा फोंडा परिसरात आहे. त्यांच्या विधानाचे राजकीय विश्लेषण करत भाजप धाडसी निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

संघटनात्मक चर्चेसाठी १०-११ नोव्हेंबर रोजी मी दिल्लीत असेन. त्यावेळी राजकीय चर्चाही होईल. जि. पं. तसेच फोंडा उमेदवारी याबाबत प्रदेश पातळीवरचे आकलन पक्षश्रेष्ठींसमोर सादर करेन.
दामू नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT