Kolamba Lake Pollution
डिचोली: लाल कमळांसाठी प्रसिद्ध असलेले कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कोळमवाडा येथील दुर्लक्षित ‘तळे’ प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून,या तळ्याचे संवर्धनं करतानाच, या नैसर्गिक जलस्रोताचा ‘हिंटरलँड’ पर्यटनाखाली विकास करावा, अशी मागणी स्थानिकांतून पुढे येत आहे.
या तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास बराच वाव असून, तळ्याचा विकास झाल्यास गावच्या सौंदर्यात भर पडणारच आहे. त्याशिवाय गावचा आर्थिक विकास होण्यासही हातभार लागणार आहे. या तळ्याचा विकास करावा. असा प्रस्तावही स्थानिक पंचायतीने बारा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांना सादर केला होता. अशी माहिती मिळाली आहे.
कोळमवाडा-कारापूर येथे रस्त्याच्या बाजूलाच असलेले नैसर्गिक तळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करत असते. या तळ्यात जेव्हा लाल रंगाची कमळे फुलतात, त्यावेळी तळ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. उन्हाळ्यात या तळ्याचा बांध घालून पाणी अडविण्यात येते. या तळ्यातील पाणी वायंगण शेती आणि बागायती पिकासाठी वरदान ठरत आहे.
या तळ्याचा विकास करण्यास दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस हे तळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकत आहे. सध्या या तळ्यात पालापाचोळा साचला असून, जलपर्णीचेही आक्रमण वाढले आहे. या तळ्यात गुरांचाही अधूनमधून वावर असतो. दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर या तळ्याचा बांध फोडून तळ्यातील पाण्याबरोबर गाळही बाहेर सोडण्यात येतो. तरीही हे तळे समस्यांच्या विळख्यात आहे. या तळ्याचा विकास झाला नाही, तर त्याचे अस्तित्व संकटात येण्याचा धोका आहे. तशी भीतीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नैसर्गिक जलस्रोत असलेल्या कारापूरच्या कोळम तळ्याचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे. या तळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात कारापूर येथे एका विकासकामाची पायाभरणी करण्यासाठी आले असता,आमदार शेट यांनी या तळ्याचा विकास करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोळम तळ्याचा विकास होणे काळाची गरज आहे. २०१२ साली सरपंच असताना या तळ्याचे सौंदर्यीकरण करावे, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना सादर केला होता. मात्र त्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकडे सरकारने लक्ष घालावे.आर्यन गावकर, माजी सरपंच, कारापूर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.