म्हापसा: पीर्ण येथील पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोलवाळ पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. मृताचे नाव कपिल चौधरी (वय १९ वर्षे, मूळ उत्तर प्रदेश) असे असून, पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हा युवक गुरुवारी रात्री कान्सा-थिवी येथे दारूच्या नशेत पीर्णच्या बाजूने जाताना अनेकांना दिसला होता. त्यानंतर घटनास्थळी कोणासोबत तरी त्याची झटापट झाली असावी आणि या झटापटीतून त्याला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पठारावर तो निपचित पडलेला दिसून आला.
त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेतून म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा मारहाणीचा प्रकार कोणत्या उद्देशाने झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. युवकाच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळल्याने पोलिस खुनाच्या दिशेनेही तपास करीत आहेत. असे असले तरी शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास कोलवाळ पोलिस करीत आहेत.
या रहस्यमय मृत्युमुळे पीर्ण आणि आसपासच्या भागात चर्चेला उधाण आले आहे. पठाराजवळ मद्यपींची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांनी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. राज्याबाहेरील मजूर लोक येथे मोठ्या संख्येने मद्यधुंद अवस्थेत आढळून येतात. त्यामुळे या परिसरात गैरप्रकार वाढत असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मृतदेहाच्या चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीच्या गंभीर जखमा आहेत. मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निखिल पालेकर आणि सहकारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.