पणजी: पेडणे तालुक्यातील चोपडे ते केरी पूल आणि केरी-तेरेखोल फेरी मांद्रे रस्त्याच्या कामाची मागील सप्टेंबर २०२५ मध्ये ३७.४२ कोटींची निविदा निघाली होती. परंतु एक महिनाही ओलांडत नाहीत तोच या कामाचा दुसरी निविदा ८२.५५ कोटींची निविदा निघाली आहे.
साधारण एका महिन्यात दीडपटीने वाढलेल्या या कामाच्या निविदेचा घोळ सपंत नसतानाच आणखी एक म्हणजे १४६.५१ कोटींची निविदा काढण्यात आली. तब्बल तीन पट वाढलेल्या १४६.५१ कोटींच्या निविदेमुळे सार्वजनिक बांधकाम खात्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
साबांखाच्या म्हापसा येथील कार्यालयातून पेडणे, बार्देश तालुक्यांतील विविध कामांच्या निविदा काढल्या जातात. त्यानुसार पेडणे तालुक्यातील चोपडे ते केरी पूल आणि केरी-तेरेखोल फेरी या रस्त्याच्या कामाच्या निविदांचा प्रकार म्हणजे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय येण्यासारखा आहे.
याविषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये वरील कामासाठी ३७ कोटी ४२ लाख ८९ हजार ८४७ रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये याच कामाची पुन्हा निविदा काढण्यात आली आणि ही रक्कम दीडपटीने वाढल्याचे दिसून येते. या कामासाठी पुन्हा ८२ कोटी ५५ लाख ५६ हजार ४०६ रुपयांसाठीची निविदा १६ ऑक्टोबर रोजी काढली गेली.
केवळ एक ते दीड महिन्यांच्या फरकाने निघालेल्या निवदांमध्ये अशाप्रकारे कामांची निविदा रक्कम वाढविली आहे की ती खरोखरच चक्रावणारी आहे. वाढून-वाढून ही निविदा रक्कम अगदीच काही प्रमाणात वाढली असती, पण ज्याप्रमाणे ती वाढविण्यात आली आहे, त्यावरून या कामात काहीतरी काळेबेरे दडलेले आहे, असा संशय घेण्यास पुरता वाव आहे. त्याशिवाय अभियंत्यांच्या व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या २२२ कोटींच्या रकमेचे नक्की गुढ काय हाही प्रश्न अनेकांना सतावत आहे.
राज्यातील अभियंत्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. त्या ग्रुपमधून सध्या एक संदेश व्हायरला झाला आहे. या कामाची निविदा सध्याच्या तारखेला २२२ कोटींवर पोहोचली आहे. परंतु त्याचवेळी या ग्रुपमध्ये याच कामाची फाईलचे पहिल्या पृष्ठाचे छायाचित्र व्हायरला झाले आहे. आणि त्या कामासाठीची निविदा फाईलवर जी निविदा रक्कम टाकण्यात आली किंवा माहितीसाठीची जो कागद चिकटवला आहे, त्यावरून या कामाची अंदाजित रक्कम १४६ कोटी ५१ लाख १५ हजार ९९९ रुपये लिहिली असल्याचे दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.