पणजी: पूर्ववैमनस्यातून २३ वर्षीय टॅक्सीचालक अल्ताफ छप्परबंद याला अडवून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पणजी येथे घडली. या हल्ल्यात अल्ताफच्या दोन्ही हातांसह डावा खांदा आणि पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन शर्मा (२४, नेपाळ) याला अटक केली असून, मुख्य हल्लेखोर रमेश बहादूर (नेपाळ) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
अल्ताफने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास त्याचा मित्र अर्जुन याने काही कामानिमित्त त्याला पणजीतील आपल्या खोलीवर बोलावून घेतले. अर्जुन त्या ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करतो. अल्ताफ सुमारे साडेचार वाजता तेथे पोहोचला असता अर्जुन खोलीत नव्हता. मात्र त्याचा मित्र अंकित तेथे उपस्थित होता.
संध्याकाळी पाचच्या सुमारास अर्जुन आणि रमेश बहादूर खोलीत आले. दोघेही टीव्ही पाहत असताना अर्जुनने एक कोयता रमेशकडे दिला. हा प्रकार लक्षात येताच अल्ताफने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रमेशने त्याला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि कोयत्याने त्याच्यावर वार केले.
जीवे मारण्याच्या उद्देशाने अडवून हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५२, १२६(२), १०९(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरज मडगावकर पुढील तपास करत आहेत.
पळून जाताना अल्ताफ जखमी
हल्ल्यातून बचाव करण्यासाठी अल्ताफने घटनास्थळावरून पळ काढला. त्याच्या दोन्ही हातांना, डाव्या खांद्याला आणि पायाला कोयत्याचे वार लागले. जखमी अवस्थेत तो पणजी चर्चच्या दिशेने धावत गेला. तेथे एका व्यक्तीने पोलिसांना आणि १०८ रुग्णवाहिकेला माहिती दिल्यानंतर त्याला जीएमसीत दाखल करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.