गोव्यात शनिवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. राजधानी पणजीसह सत्तरी, डिचोली, सांगे, कुडचडे या भागात जोरदार पाऊस झाला. पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने मुसळधार पावसाचा जोरदार फटका या कामांना बसला.
शहरात खोदण्यात आलेल्या खड्यांमध्ये तसेच मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यासह काही ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या.
पणजी सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून वाहने मार्ग काढताना दिसून, काहीकाळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, अनेकांच्या दुकानात देखील पाणी शिरल्याने दुकानमालकांची धावपळ झाली. स्मार्ट सिटीच्या सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले तसेच, मातीच्या ढिगाऱ्यांजवळ चिखल झाला आहे. रस्ता खचल्याने काही ठिकाणी वाहने रुतली.
स्मार्ट सिटीची कामे अगोदरच खोळंबली असताना पावसाने त्यात नव्याने व्यत्यय निर्माण केला आहे.
पावसामुळे झालेल्या पणजीच्या अवस्थेवर विरोधकांनी सडकून टीका केली. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप यांनी याप्रकरणी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री सावंत यांना जबाबदार धरले.
पणजी शहरात आज पहिल्याच पावसात सगळीकडे भाजप, नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतचे चिखलमय दर्शन घडले. गोवा भाजपच्या स्मार्ट सिटीचे अभिनंदन! हाच तो कोटी कोटींची उढळपट्टी करुन केलेला भाजपचा विकास, अशी टीका रमाकांत खलप यांनी केली.
तर, विकसित भारत योजनेंतर्गत निर्माण होत असलेल्या स्मार्ट सिटीचे काम पाहण्यासाठी कंदब बसच्या मदतीने काणकोण, पेडणे, मुरगाव आणि मोले येथील नागरिकांना पणजीत घेऊन या, अशी खोचक टीका अमित पाटकर यांनी गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर केली आहे.
गोव्यात उद्या देखील (रविवारी) हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पणजीत अवकाळीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा महापौर रोहित मोन्सेरात यांनी घेतला. महानगपालिकेच्या अभियंत्याला सोबत घेऊन मोन्सेरात यांनी शहरातील स्थितीची पाहणी केली. शहरात विविध ठिकाणी पाणी साचले असून, पालिका कर्मचारी पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ड्रेनेज झाकण खुले करण्यासह इतर अडथळे दूर करण्याचे काम करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.