पणजी: कृषी उत्पादन कमी वेळेत पिकविण्यासाठी इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणेच गोव्यातील शेतकऱ्यांनीही रासायनिक खते आणि इतर रसायनांचा अधिक वापर करून शेती करण्यास सुरुवात केली. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच जमिनीचा कसही कमी झाला.
त्यामुळे गोमंतकीय शेतकऱ्यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेतीकडे वळणे आणि त्यासाठी सरकारने त्यांना पूर्ण प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, असे कृषिविभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी उदय प्रभुदेसाई यांनी गुरुवारी ‘गोमन्तक’शी बोलताना स्पष्ट केले. १६ ऑक्टोबर रोजी जगभरात झालेल्या ‘जागतिक अन्न दिना’च्या पार्श्वभूमीवर प्रभुदेसाई यांच्याशी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीतून पिकणाऱ्या धान्याबाबत चर्चा केली असता, गोव्यातील शेतकरी पूर्वी सेंद्रिय पद्धतीनेच शेती करीत होते, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शिल्लक राहिलेली रसायने भारतात आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचा शेतात वापर सुरू केला. तेव्हापासून गोव्यातही शेती उत्पादनासाठी रसायनांचा वापर वाढत गेला. सेंद्रिय शेतीच्या तुलनेत रासायनिक शेतीतून कमी वेळेत अधिक उत्पादन मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीत रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली. अशा शेतीतून पिकणाऱ्या धान्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजार वाढू लागले. दुसरीकडे, रसायनांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकताही कमी होऊ लागली.
...तरच कृषी जमिनी लागवडीखाली!
राज्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार केले जाते. त्यासाठी विविध धोरणेही राबवली जात आहेत. मात्र, या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होणे आणि त्यासाठी आवश्यक तेवढे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास राज्यातील कृषी जमिनींवर इमारती उभ्या राहण्याऐवजी त्या पुन्हा कृषी लागवडीखाली येतील, असेही उदय प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.
दहा टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही
सध्या राज्यात एकूण शेतीक्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रावरही सेंद्रिय पद्धतीने शेती केली जात नाही. बहुतांश शेतकरी रासायनिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावर रासायनिक पद्धतीने शेती केली जात आहे. त्याचे दुष्परिणामही वारंवार दिसून येत आहेत, असे प्रभुदेसाई यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.