Hero Super Cup 2023 Dainik Gomantak
गोवा

Super Cup 2023: गोमंतकीय प्रशिक्षक क्लिफर्ड ओडिशाच्या विजयाचे ‘शिल्पकार’, ठरले पहिले भारतीय मार्गदर्शक

सुपर कप अंतिम लढतीत ओडिशाने बंगळूर एफसीला 2-1 फरकाने पराभूत केले.

किशोर पेटकर

ओडिशा एफसीसाठी सुपर कप फुटबॉल विजेतेपद जिंकून देण्यात गोमंतकीय प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांचे योगदान मौल्यवान ठरले. आयएसएल स्पर्धेतील संघातर्फे करंडक जिंकणारे ते पहिले भारतीय मार्गदर्शक ठरले आहेत.

केरळमधील कोझिकोड येथे मंगळवारी रात्री झालेल्या सुपर कप अंतिम लढतीत ओडिशाने बंगळूर एफसीला 2-1 फरकाने पराभूत केले. ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने ओडिशाचे दोन्ही गोल केले, तर बंगळूरची पिछाडी पेनल्टी फटक्यावर सुनील छेत्रीने कमी केली. भुवनेश्वरस्थित संघाचे हे पहिलेच मोठे यश ठरले.

देशांतर्गत फुटबॉलमध्ये २०२२-२३ मोसमापूर्वी क्लिफर्ड मिरांडा यांनी एफसी गोवा संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला व ते १ जुलै २०२२ पासून ओडिशाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी रुजू झाले. स्पॅनिश जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिशाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा प्ले-ऑफ फेरी गाठली, मात्र नंतर सुपर कप स्पर्धेपूर्वी गोम्बाऊ यांनी ओडिशाचे प्रशिक्षकपद सोडले व क्लिफर्ड यांच्याकडे सुपर कप स्पर्धेसाठी मार्गदर्शनाची जबाबदारी आली.

यशाचा आनंद अवर्णनीय

‘‘मी खूप आनंदी आहे. यशाची भावना अवर्णनीय असून व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. क्लबने जिंकलेली ही पहिलीच ट्रॉफी असून आम्ही आणखी करंडक जिंकू शकतो याचा विश्वास आहे,’’ असे क्लिफर्ड यांनी ओडिशाच्या जेतेपदानंतर सांगितले. ‘‘संघ उभारणीतय घेतलेली मेहनत पाहता, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी हा संघ लायक आहे. हा क्षण खरोखरच खास आहे,’’ असे भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षकाने नमूद केले. आपल्या मार्गदर्शनाखाली ओडिशाने सुपर कप जिंकला असला, तरी क्लिफर्ड यांनी सारे श्रेय खेळाडूंच्या परिश्रमाला दिले.

गोव्याचे माजी सफल फुटबॉलपटू

क्लिफर्ड यांनी गोव्यातील नावाजलेला फुटबॉल संघ धेंपो क्लबचे तब्बल १५ वर्षे प्रतिनिधित्व केले. या संघातर्फे त्यांनी राष्ट्रीय लीग, आय-लीग तसेच फेडरेशन करंडकही जिंकला. त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरवात सालसेत एफसीतर्फे झाली. चार वर्षांच्या कालावधीत जमशेदपूर येथील टाटा फुटबॉल अकादमीत त्यांची गुणवत्ता बहरली.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये क्लिफर्ड यांनी २००५ ते २०१४ कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व करताना ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६ गोल केले. या कालावधीत ते दोन वेळा सॅफ करंडक, तसेच २००८ मध्ये एएफसी चॅलेंज कपचे मानकरी ठरले. स्पर्धात्मक फुटबॉलमधून ते २०१७ मध्ये निवृत्त झाले.

२०१८ मध्ये ते एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. नंतर सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने २०१९-२० मोसमात ते एफसी गोवा मुख्य संघात रुजू झाले. त्याच मोसमातील अखेरच्या टप्प्यात त्यांनी आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे हंगामी प्रशिक्षकपदही सांभाळले होते.

‘‘एफसी गोवाच्या रिझर्व्ह संघातर्फे मी गोवा लीग विजेतेपद मिळविले. प्रशिक्षक या नात्याने माझा तो पहिला करंडक होता. मात्र राष्ट्रीय पातळीवरील हे माझे पहिलेच विजेतेपद आहे, त्यामुळे भावना अवर्णनीय आहेत. क्लब आणि चाहते, खेळाडू, कर्मचारी, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा एक अद्‍भूत क्षण आहे.’’ असे क्लिफर्ड मिरांडा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT