निवृत्ती शिरोडकर
गणेशभक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणीच केली नाही, तर अशा मूर्ती बाजारात उपलब्ध होणार नाहीत. तसेच भटजींनी अशा मूर्तींचे पूजन करण्यास विरोध केला तर यावर नियंत्रण येऊ शकते, असे प्रांजळ मत खारेबांध येथील १२३ वर्षांची परंपरा असलेल्या पालयेकर गणेश चित्रशाळेचे प्रमुख अरविंद ऊर्फ अरुण पालयेकर यांनी मांडले.
खारेबांध-गांधीतीर शेजारी असलेल्या पालयेकर गणेश चित्रशाळेत दरवर्षी १२५ पेक्षा जास्त पारंपरिक गणेश मूर्ती तयार करण्याचे काम आजही त्याच जोमाने सुरू आहे.
शिवाय मागच्या शतकापेक्षा जास्त कार्यकाळ शहरातील सार्वजनिक गणेश मंडळालाही याच चित्रशाळेमधून मूर्ती तयार करून दिली जाते. पूर्ण पालयेकर कुटुंब या गणेश चित्रशाळेच्या कामाला लागलेले असतात, असे चित्र दिसून येते.
मूर्तीकाम करण्यासाठी बंधू मोहन पालयेकर, विश्वास पालयेकर, प्रकाश पालयेकर, विजय पालयेकर आपणास मदत करत असतात. शिवाय उपनगराध्यक्ष असलेली आपली पत्नी अश्विनी पालयेकर यादेखील रंगकामात मदत करतात, असे पालयेकर म्हणाले.
मूर्तीकारांपुढे अनेक अडचणी
बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात आणि त्या पर्यावरणाला हानी पोहोचवत असूनही अधिकारी कधी त्यांची पाहणी करत नाहीत. चिकणमातीच्या मूर्तीला केवळ शंभर रुपये अनुदान देऊन काही साध्य होत नाही.
सध्या वाढलेल्या रंगांच्या किमती, मिळत नसलेली माती आणि कामगारांच्या कमतरतेमुळे मूर्तीकाराला मूर्ती तयार करताना खूप अडचणी येतात, असे पालयेकर म्हणाले.
कला जन्मताच अंगी असते. तिला योग्य वेळी जर वळण दिले आणि आकार दिला तरच त्यातून कलाकृती तयार होते. त्यावरच कलाकार मोठा होत असतो. साच्याचा वापर करून अनेकजण मूर्ती तयार बनवतात. परंतु हस्तकलेतून बनविलेली कोणतीही मूर्ती सुबक असते.
अरविंद पालयेकर, मूर्तीकार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.