गेल्या एक वर्षाहून अधिक काळ राज्यात किरकोळ कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र, काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.
कोरोना चाचणी गोमेकॉसह प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा व उपजिल्हा इस्पितळांमध्ये करण्याची सोय आहे. ज्या रुग्णांची चाचणी सकारात्मक आढळते, त्यांना घरात विलगीकरण किंवा इस्पितळात उपचार घेण्याचा पर्याय ठेवला आहे.
कोरोना बाधितांना विलगीकरणासाठी किमान सात दिवस घरातच वेगळे राहणे सक्तीचे आहे. या काळात त्यांनी कोरोना प्रतिबंधक औषधे घेण्याबरोबरच स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
अशी दक्षता घ्यावी
गर्दीच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियम पाळावेत.
संशय आल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी.
घरात स्वच्छता ठेवण्याबरोबरच वेळोवेळी हात धुवावेत.
तोंडाला मास्क लावावा.
कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी.
10, 11 एप्रिलला मॉकड्रिल
एका वर्षानंतर राज्यात कोविडचा पहिला बळी गेला आहे. यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. 10, 11 एप्रिलला राज्यात कोरोनासंदर्भात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.
कोविड चाचणी आरोग्य केंद्रासह सर्व सरकारी इस्पितळांत उपलब्ध आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आढळून येणारे कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची वेळ आली आहे.
सरकारकडे गांभीर्याचा अभाव
कोविड संसर्गावर नियंत्रण व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी गोमेकॉ इस्पितळाच्या डीनच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश होता. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती होती.
राज्यात कोरोनाने शिरकाव करण्यास सुरुवात करून दिवसाला सुमारे 100 हून कोविड बाधित सापडत असले तरी उपाययोजनेसाठी या दोन्हीपैकी एकाही समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे सरकार लोकांना आवाहन करत असले तरी या वाढत्या संसर्गाबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते.
सावधगिरीच्या उपाययोजना
गोमेकॉ तसेच इतर जिल्हा इस्पितळांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. काही रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त असतात. त्यामुळे सावधगिरी म्हणून इस्पितळात जाणाऱ्या रुग्णांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे.
सावधगिरी म्हणून गोमेकॉत विशेष कोविड वॉर्ड सर्व साधनसुविधा तसेच प्राणवायू मुबलक प्रमाणात ठेवला आहे. या वॉर्डसाठी विशेष कर्मचारी वर्ग नेमला आहे. त्यांच्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक कीट उपलब्ध केले आहे. कोविड रुग्णाजवळ एकाच व्यक्तीला परवानगी दिली जाते.
लसीकरण डोस अनुपलब्ध
राज्यातील 99 टक्के लोकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, तिसरा बुस्टर डोस अनेकांनी घेतलेला नाही. त्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या बुस्टर डोसमुळे काहीजणांना विशेषतः वृद्धांना अडचणी आल्याने अनेकांनी त्याकडे काणाडोळा केला.
सरकारने जागृती करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी सरकारने लसीकरणाची मोहीम ठराविक दिवसांपुरतीच राबविली. तेव्हा लसीकरणाचे डोस संपले होते. सध्या आरोग्य खात्याकडे लसीकरणासाठी डोस नाहीत. त्यांनी केंद्राकडे डोसची मागणी करून आठवडा उलटला तरी अजून ते उपलब्ध झालेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.