Nitin Nabin  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2027: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये! नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली 'महा बैठक'; विजयाचा ठरणार रोडमॅप

goa bjp state executive meeting 2026: विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने भाजपने आणखी एक पाऊल टाकताना आज (ता. २७) दिवसभर राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने भाजपने आणखी एक पाऊल टाकताना आज (ता. २७) दिवसभर राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली अटल भवन या पक्षाच्या मुख्यालयात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ही बैठक होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येंकर व सर्वानंद भगत उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्षांच्या या दौऱ्यादरम्यान काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात दामू नाईक म्हणाले की, भाजपच्या (BJP) विचारधारेवर विश्वास असलेल्या आणि पक्षापासून दुरावलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पक्षात यावे. मात्र, पक्षात पुनर्प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मिळेल, याची शाश्वती देता येणार नाही. पक्षप्रवेश आणि उमेदवारी या दोन वेगळ्या बाबी आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर हे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या दोघांनी भाजपचे सहसंघटन सचिव शिवप्रकाश यांची भेट घेतली होती. याबाबत दामू नाईक यांनी मात्र थेट भाष्य करणे टाळले.

साडेचार लाख कार्यकर्त्यांचे जाळे

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असून, राज्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे, असा दावा नाईक यांनी केला. भाजपकडे सुमारे साडेचार लाख कार्यकर्ते आहेत. राज्यातील १,६३७ मतदान केंद्रांच्या पातळीवर शक्तिकेंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय विविध प्रकोष्ठ, मोर्चे, मंडळे, जिल्हा समित्या, भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वापरलेल्या भाषेवरही नाईक यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान मोदी हे दिवसातील १८ ते २० तास जनतेसाठी काम करतात आणि त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतो, हे काँग्रेसला खटकत असल्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ पासून काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली जात असल्याचे सांगत नाईक म्हणाले की, ‘मौत का सौदागर’ आणि ‘नीच’ यांसारख्या शब्दांचा वापर करण्यापासून ते त्यांच्या आई-वडिलांचा उल्लेख करून टीका करण्यापर्यंत काँग्रेसने राजकीय मर्यादा ओलांडल्या आहेत. राजकारणात टीका करताना काही संकेत आणि मर्यादा पाळणे आवश्यक असते. मात्र, काँग्रेसकडून वारंवार त्यांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसमधील व्यवहार उघड करण्याचा दावा

काँग्रेसमध्ये सध्या भाटकार भरले असून, ते गावेच्या गावे विकत असल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला. वार्का, करमणे आणि कुडतरी येथील व्यवहार योग्य वेळी पुराव्यांसह जनतेसमोर आणले जातील, असे त्यांनी सांगितले. या आरोपांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत अधिक तपशील दिला नाही.

आरजीपीच्या गटावरून बोरकरांना प्रत्युत्तर

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या दुसऱ्या गटाला भाजप बळ देत असल्याचा आमदार वीरेश बोरकर यांनी केलेला आरोप नाईक यांनी फेटाळून लावला. भाजपच्या नावाने गळा काढण्याची बोरकर यांची जुनी सवय असून, त्यांच्या वक्तव्यातून भाजपविषयीचा आकस दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा

१. नितीन नवीन हे मंगळवारी अटल भवन येथील भाजप मुख्यालयात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत राज्य कार्यकारिणी समितीची बैठक घेतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील कामांची दिशा या बैठकीत निश्चित केली जाईल.

२. बैठकीचा समारोप राजकीय आणि सामाजिक ठरावांनी होईल. सहसंघटन सचिव शिवप्रकाश, निवडणूक प्रभारी डॉ. भारती पवार आणि निवडणूक सहप्रभारी अनिल ॲंथनी हेही उपस्थित राहणार आहेत.

३. नितीन नवीन हे मंगळवारी आमदार, मंत्री आणि पक्षाच्या गाभा समितीच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर युवा कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधतील.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: वास्कोतील शिवपुतळा हटवण्याचा अंतरिम आदेश कायम, उच्च न्यायालयाकडून अर्जदारांची याचिका नामंजूर; ठोठावला 4 लाखांचा दंड!

Mandovi Bridge Accident: ओव्हरटेक बेतलं जिवावर! मांडवी पुलावर टॅक्सी आणि दुचाकीचा भीषण अपघात; मुंबई आणि रोहतकच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

SCROLL FOR NEXT