NIA Searches House At Usgao: अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींनी उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी एका घराचा वापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) कळले.
त्यानंतर त्यांनी गोव्यात दाखल होत फोंड्यातील उसगाव येथील एका अल्पवयीन विद्यार्थ्याची कसून चौकशी केली. या प्रकरणात हा विद्यार्थी संशयित असल्याने त्याचा मोबाईल, सीमकार्ड, पेनड्राईव्ह जप्त केले.
त्याचे इन्टाग्राम व इतर सोशल मीडिया खाती गोठवली आहेत. त्याला २२ रोजी झारखंड येथे चौकशीसाठी बोलावले आहे.
राज्यात यापूर्वी जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील डेव्हीड हेडली, यासीन भटकळ यांसारखे कुख्यात दहशतवादी राहून गेले आहेत. हुबळी येथे पकडलेले ‘सीमी’शी संबंधित दोन दहशतवादी पणजीतील एका हॉटेलात नोंदणी न करताच राहून गेल्याचे उघड झाले होते.
उजव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून गोव्यात कोण कोण राहतो, याची पडताळणी पोलिस व्यवस्थित करत नाहीत. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी गोव्यात आश्रय घेतल्याचा त्यांचा आरोप कायम आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवायांकडेही अधूनमधून अंगुलीनिर्देश केला जातो. या पार्श्वभूमीवर उसगाव येथे अल्पवयीन मुलाच्या शोधात एनआयए आल्याने त्याविषयीच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे.
देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विविध राज्यांमध्ये संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. या शोध मोहिमेवेळी त्यांना हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांमधून गोव्याशी कनेक्शन असल्याचे आढळल्याने एनआयएच्या पथकाने फोंडा पोलिसांच्या मदतीने उसगाव येथील एका अल्पवयीन मुलाची चौकशी केली.
त्याचा मोबाईल फोन, सीम कार्ड, पेनड्राईव्ह जप्त केला असून त्याची इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियाची खाती गोठवली आहेत.
या कारवाईनंतर एनआयएचे हे पथक माघारी परतले. देशातील विविध राज्यांमध्ये देशविरोधी कारवाया होत असल्याने सध्या एनआयएच्या पथकाने विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. तपासावेळी या अल्पवयीन मुलाने आवश्यक ते सहकार्य केले असल्याची माहिती मिळाली.
कमालीची गुप्तता
बुधवारी रात्री हे पथक गोव्यात दाखल झाले. संशयित मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी फोंडा पोलिसांची मदत घेतली. रात्रभर चौकशी केल्यानंतर ते तेथून निघाले. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी हे पथक आले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.
ज्या मुलाच्या चौकशीसाठी हे पथक गोव्यात आले आहे, त्या उसगावातील मुलाविषयी गोवा पोलिसांनी काहीच माहिती नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
‘अल कायदा’शी संबंध?
‘एनआयए’ने लखनौ येथील एक घर दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून घोषित केले आहे. या घराचा वापर अल कायदाशी संलग्न असलेल्या काही सदस्यांनी केल्याचे ‘एनआयए’ला आढळून आले. या घराशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून उसगाव येथील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलाचा त्याच्याशी संबंध असल्याचा संशय असल्याने चौकशीसाठी ते पथक गोव्यात आले होते.
माहिती डाऊनलोड करणे अंगलट
उसगावात ज्या अल्पवयीन मुलाची चौकशी ‘एनआयए’ने केली, तो गोव्यातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून तो कुटुंबीयांसह गोव्यात वास्तव्यास आहे.
त्याने काही दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या संघटनांची माहिती मोबाईलवरून डाऊनलोड केल्याचे ‘एनआयए’च्या चौकशीत उघडकीस आले आहे. २२ रोजी त्या मुलाच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा शक्य आहे.
घराभोवती पोलिस बंदोबस्त
तिस्क-उसगाव येथील या इमारतीवर बुधवारी रात्री अडीचच्या दरम्यान छापा टाकण्यात आला होता, त्यावेळी तिथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तपास यंत्रणेने मुलासह त्याच्या वडिलांचीही कसून चौकशी केली. पण या तपासाचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही, तरीपण दहशतवादी कारवायांशी निगडितच ही चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
उसगावातील हा मुलगा एकलकोंड्या स्वभावाचा असून तो जास्त कुणाजवळ बोलत नव्हता. मोबाईल हेच त्याचे विश्व होते. विद्यालयातही तो इतरांपासून अलिप्त राहात होता, असेही समजले.
मुलाची चौकशी झारखंडला
एनआयएचे चार अधिकारी या मुलाची चौकशी करण्यासाठी गोव्यात आले होते. फोंडा पोलिसांच्या मदतीने ते त्या मुलाच्या घरी गेले. त्यावेळी हा मुलगा घरातच सापडला. तिस्क - उसगाव येथे बाजार भागात एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा मुलगा कुटुंबासह राहतो.
त्याचे वडील मॅकेनिक असून आई घरीच असते. ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी या मुलाची कसून चौकशी केली असून तो वापरत असलेला मोबाईल आणि सीम कार्ड या तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. येत्या २२ तारखेला या मुलाला झारखंड येथे पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.
मूळ स्रोत लखनौमध्ये
लखनौ येथील एका घराचा वापर दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी केला जात असून उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट-कारस्थान या घरात शिजले असल्याचे ‘एनआयए’ला चौकशीवेळी आढळून आले होते.
पेट्रोल बॉम्ब बनवण्यासह बेकायदेशीर कामांसाठी या घराचा वापर केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. ही शोधमोहीम सुरू करून दहशतवादी कारवायांपूर्वीच दहशतवाद्यांना गजाआड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.