पणजी: सरकार हे जनतेच्या सेवेसाठी असते. त्यामुळे तुम्ही सरकारकडे आपल्या कामासाठी भीक मागायची नाही. हक्कांसाठी झगडायचे असते. गोव्यातील सरकार भ्रष्टाचार करते असे वाटत असेल, तर तो चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी तुमची आहे, असा कानमंत्र आज नाम फाउंडेशनचे विश्वस्त तथा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात गोवा बिजनेस स्कूल अध्यासनाद्वारे ‘नाम फाउंडेशन केस स्टडी’ या विषयावर नाना बिनधास्तपणे बोलत होते. नाना म्हणाले, राजकारण ही वाईट गोष्ट आहे असे माझे मत नाही, परंतु तरुणांनी राजकारणात येण्याचा आपला उद्देश काय हे निश्चित करावे. तुम्ही जर राजकारणात लंगोटावर आला असाल, तर राजकारणातून निवृत्त होतानाही आपल्याकडे अधिकचे काहीही असता कामा नये. समाजकार्याद्वारे खिसा रिकामा झालेला असावा, असेही नानांनी सांगितले.
आजकाल आम्ही चाकोरीतील जीवन जगत आहोत, आपली नोकरी आणि ठरावीक काम करत आहोत. आपण आयुष्य हे आनंद घेत जगले पाहिजे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. शक्य नसेल तर आपल्या सभोवताली झाडे लावून निसर्ग निर्माण केला पाहिजे. झाडाने जर फळे, फुले दिली नाहीत, तर किमान सावली तरी निश्चितपणे देईल. स्वतःला वेळ द्या, मोबाईलचा वापर जेवढा कमी करणे शक्य आहे तेवढा करा, असे नाना म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.