Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मोती डोंगराचे काय होणार?

Khari Kujbuj Political Satire: शिरगाव जत्रेतील दुर्घटनेला आठवडा उलटून गेला तरी त्या दुर्घटनेची चर्चा जशी सुरु आहे, तशीच त्या दुर्घटनेच्या आघातांतून तेथील गावकरीही अजून सावरलेले नाहीत.

Sameer Panditrao

मोती डोंगराचे काय होणार?

सरकारी किंवा कोमुनिदादीच्‍या जागेत बेकायदेशीररित्‍या बांधलेल्‍या बांधकामावर कारवाई करा असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने जाहीर केल्‍यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. या आदेशानंतर सर्वांचेच लक्ष मडगावच्‍या माेती डोंगरावरील झोपडपट्टीकडे लागले आहे. ही झोपडपट्टी बेकायदेशीर असल्‍याचा दावा मडगावच्‍या कोमुनिदादीने करुन या संबंधात मुंबई उच्‍च न्‍यायालयात एक दावाही दाखल केलेला आहे. अशा स्‍थितीत मोती डोंगरावरील ही झोपडपट्टी पाडली जाईल, का तिला हात लावण्‍याची बिशाद कुणात तयार होईल की नाही, हे आता पहावे लागणार आहे. ∙∙∙

अहवालात दडलेय तरी काय?

शिरगाव जत्रेतील दुर्घटनेला आठवडा उलटून गेला तरी त्या दुर्घटनेची चर्चा जशी सुरु आहे, तशीच त्या दुर्घटनेच्या आघातांतून तेथील गावकरीही अजून सावरलेले नाहीत. काही जण तर दैवी कोप हेच या दुर्घटनेचे कारण असल्याचे सांगताहेत. शेवटी या जत्रेशी स्थानिकांच्याच नव्हे तर तमाम भाविकांच्या भावना निगडीत आहेत, हे खरेच आहे. पण मुद्दा तो नाही तर या दुर्घटनेनंतर सत्य शोधन समितीने सादर केलेल्या अहवालाचे आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील या समितीने आपला शंभर पानी अहवाल सादर केलेला आहे. पण सरकारने तो अद्याप जाहीर न केल्याने प्रत्येकजण या अहवालाबाबत तर्क लढवत असल्याने जत्रेशी संबंधित धोंड व अन्य मंडळी संभ्रमात पडले आहेत. काहीजण तर आपण अहवाल पाहिल्या प्रमाणे छातीठोकपणे बोलत आहेत. त्यामुळे या अहवालात नेमके काय आहे, ते जाहीर होणे गरजेचे बनलेय, असे जो तो म्हणत आहे. ∙∙∙

लोबोंना घेरले...

आसगाव-हणजूण येथील रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला काही स्थानिकांनी हरकत घेतली. यावेळी शिवोलीच्या स्थानिक आमदार दिलायला लोबो तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबो देखील घटनास्थळी हजर होते. संबंधित लोकांनी या कामाची वर्कऑर्डर दाखविण्यास लोकप्रतिनिधींना सांगितले. त्यावरुन काहीकाळ याठिकाणी गोंधळ व तणाव पाहायला मिळाला. लोकांनी लोकप्रतिनिधींवर प्रश्नांचा भडीमार केला, परंतु त्यांना लोकांचे निरसरण करता आले नाही. तसेच स्थानिक आमदार असताना, बाहेरील मतदारसंघाचा आमदार आमच्या गावात कशाला? असे म्हणत काहींनी मायकल लोबोंना सुनावले. जी व्यक्ती पक्षांतर करते, त्यांनी आम्हाला विकासकामांच्या वल्गना किंवा बाता मारू नयेत, अशा शब्दांत लोकांनी लोकप्रतिनिधींना खडसावले! एकप्रकारे लोबो दाम्पत्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे, आपला मतदारसंघ सोडून इतरत्र मतदारसंघात लुडबूड करणे मायकल यांना बरेच अंगाशी आले, अशी चर्चा गावात रंगलीय. ∙∙∙

‘त्या’ गूढ हॉटेलचे गुपित!

सुपारीच्या नावाने नागवेलीला पाणी, अशी एक म्हण आहे. कुंकळळी औद्योगिक वसाहतीतील मासळी प्रकल्पामुळे सगळ्या गावात घाण वास पसरत होता. मासळी प्रकल्पातील सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे ऐतिहासिक गावात प्रदूषण वाढले होते. मात्र, आता मासळीचा घाण वास येणे कमी झाला आहे.आता हे सगळे घडून आले जनतेच्या हितामुळे किंवा विरोधी पक्ष नेत्यांमुळे नव्हे तर याला कारण आहे एक गुप्त हॉटेल. औद्योगिक वसाहती जवळच एका मासळी प्रकल्प मालकाने. म्हणे छोटेसे तारांकित हॉटेल उभारलेले आहे. या हॉटेलात मोठमोठे लोक येतात.आपल्या गेस्टना मासळीचा घाण वास येईल, म्हणून त्या मालकाने प्रदूषण बंद केले आहे. काही का असेना घाण वासातून कुंकळ्ळीकराना तूर्त तरी मुक्ती मिळाली. मात्र, माडाच्या व सुपारीच्या झाडांत लपलेले ते हॉटेल कसे आहे, याचा मात्र पत्ता लागत नाही. म्हणून जनता म्हणतेय, येथे एक मिस्ट्री हॉटेल आहे. ∙∙∙

चलन देणारे पोलिस गायब!

चलन देण्याचा अधिकार फक्त पोलिस उपनिरीक्षक आणि निरीक्षकांना असल्याचा फतवा मुख्यमंत्र्यांनी काढल्यानंतर जागोजागी थांबून वाहनचालकांना अडवून चलन काढणारे पोलिस सध्या गायब झाले आहेत. फोंड्यात तर नाक्यानाक्यावर पोलिस तैनात असायचे. बगल मार्गावर थांबून येणाऱ्याला पकडा, हे एकच ध्येय पोलिसांना असायचे. पण आता चलन देण्याचा अधिकार काढून घेतल्यामुळे पोलिस गायब झाले आहेत. चिरिमिरी गेल्यामुळे कदाचित पोलिस नाराज झाले असावेत, त्यातूनच आता वाहतूक व्यवस्था रामभरोसे सोडण्यात आली असावी, असा कयास सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire

नगरसेविकांची सहल!

पणजीतील महिला नगरसेवकांनी अखेर केरळची सहल केली आणि या सहलीची चर्चा सुरू झालीय. सहलीचा खर्च कोणी केला की सर्व नगरसेविकांनी एकत्रितरित्या केला, हाही चर्चेचाच विषय. असो मागील वर्षी त्यांची काश्मीरची सहल चुकली, त्यामुळे किमान केरळची सहल केल्याचा आनंद त्यांना मिळालेला असणार आहे. याशिवाय पुढील वर्षी महानगरपालिकेची निवडणूक असल्याने यापैकी कितीजणांना पुन्हा उमदेवारी मिळणार आहे, हे येणाऱ्या काळात दिसेलच. ज्या महिला नगरसेवक सहलीला गेल्या होत्या, त्यापैकी एकीने उत्साहाने फोटो समाजमाध्यमातील आपल्या एका अकाऊंटवर अपलोड केले. ही बाब कळताच गोव्यातून केरळकडे कॉल गेले. त्यामुळे ती सहलीची छायाचित्रे हटविण्यात आली. परंतु या सहलीची एवढी गुप्तता का पाळण्यात आली, हे अनेकांना न उलगडणारे कोडे ठरले आहे. ∙∙∙

वीज खात्याने पाजला कोरा चहा!

कालच्या शनिवारी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण पेडणे तालुक्यात वीज खंडित केली होती. या वीज खंडित करण्याची वेळ ही सकाळी सहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत होती. गोव्यात म्हणा किंवा पेडणे तालुक्यातील म्हणा दूध पुरवठा हा सकाळी वाहनांतून होतो. साधारणपणे पहाटे चार ते सहा पर्यंत या गाड्या दूध दुकानात पोहचवतात. ‘लोड शेडींग’ची वेळ सकाळी सहा वाजता होती. यामुळे झाले काय तर दुकानदाराने फ्रिजमध्ये ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या वीज खंडित झाल्यानंतर थंड राहू शकल्या नाहीत. सध्या तर तापमान बरेच वाढलेले. संध्याकाळी जेव्हा दूध गॅसवर ठेवले, तेव्हा काहींनी नेलेले दूध खराब झाले. मात्र, काहींचे दूध खराब झाले नव्हते, त्यांनी ते तसेच फ्रिजमध्ये ठेवले. सकाळी चहासाठी काढले, तर दूध नासल्याचे आढळले. परिणामी कोरा चहा पिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एकंदर काय तर वीज खात्याने अशा दुधाचा चहा पिणाऱ्या शौकिनांनाही सक्तीचा कोरा चहा पाजला. ∙∙∙

मडगावातील बांधकामे

गोव्यातील एकंदर बांधकामांबाबत गेली अनेक वर्षे नानाविध वृत्ते प्रसिध्द झाली आहेत. बेकायदा बांधकामांबाबत न्यायालयाने हल्ली दिलेले निवाडे, अनेक भागात अशा बांधकामांबाबत झालेली आंदोलने व हल्लीच मुख्य नगरनियोजकांचे निवृत्तीच्या दिवशीच झालेले निलंबन यामुळे या बेकायदा बांधकामांच्या आरोपांवर शिक्कामोर्तबच झाल्याचे संबंधित संघटना म्हणत आहेत. सदर निलंबित अधिकारी मागे ‘एसजीपीडीए’वर होते व त्या काळात मडगाव परिसरात उभ्या झालेल्या बांधकांबाबत आता अनेकजण प्रश्न करूं लागले आहेत, विशेषतः मडगावच्या बाह्य विकास आराखड्याकडे व त्यांतील गैरप्रकारांकडे बोट दाखवीत आहेत. सदर अधिकाऱ्यांच्या मर्जीतील काही बिल्डर म्हणे अजूनही त्याच आविर्भावत वावरतात. मडगावातील अनेक बांधकाम स्थळांवर म्हणे बांधकामाबाबतचा तपशिल दर्शवणारे फलक लावले जात नाहीत की त्यांना त्या बद्दल जाबही विचारला जात नाही. म्हणजे पूर्वींचाच गोंधळ सुरु आहे असे म्हणायचे का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT