पर्ये: पेळावदा-मोर्ले येथील ‘उभो गुणो’ या वाळवंटी नदीच्या डोह परिसरात अस्वच्छतेमुळे पर्यटकांना आंघोळ करण्यास तसेच सहलीसाठी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, त्याची प्रत केरी आणि मोर्ले ग्रामपंचायतींसह वाळपई मामलेदारांनाही देण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी गोव्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तरुणांचे गट दिवसभर नदीत आंघोळ करून मौजमजा करतात. ते अन्नपदार्थ घेऊन येतात, नदीकिनारी चूल पेटवून जेवण करतात आणि कचरा तसाच टाकून निघून जातात.
त्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून येथे दुर्गंधी निर्माण झाली आहे. काही जण तर दारूच्या नशेतच आंघोळ करतात. त्यामुळे अपघातही घडत आहेत. अलीकडेच अशाच प्रकारात एका युवकाचा मृत्यू झाला होता. स्थानिक जनतेच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
पर्यटकांनी आणलेले अन्नपदार्थ, प्लास्टिक बाटल्या यांचा कचरा नदीकिनारी साचतो. यामुळे पर्यावरणासह परिसराचे मोठे नुकसान होत आहे. पेळावदा आणि मोर्ले केसरकरवाडा येथील नागरिकांनी अनुक्रमे केरी आणि मोर्ले ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करून ‘उभो गुणो’ येथे उपद्रवी लोकांना प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे.
अनेक पर्यटक गटा-गटाने येऊन नदीकिनारी दारू पिऊन मोठ्या आवाजात संगीत लावून नाचतात, तसेच गोंधळ घालतात. त्यामुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी येणारे शांतताप्रिय पर्यटकही त्रस्त झाले आहेत. मद्य प्राशन केल्यानंतर जागोजागी काचेच्या बाटल्या फोडल्याने हे ठिकाण धोकादायक बनले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.