MLA Carlos Ferreira: म्हापसा : म्हापसा-तार जंक्शन रस्त्यावरील बस्तोडा बाजूने रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या कायदेशीरपणाची पडताळणी प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाईल.
तसेच, येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूने गटार बांधण्याचे निर्देशही दिले असून, संबंधित दुकानदारांनी गटार बांधताना अडसर आणल्यास परिणामी दुकाने सील केली जाणार आहेत.
बुधवारी (ता.४) हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी बार्देश उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी., मामलेदार प्रवीण गावस, सहाय्यक अभियंता सुभाष बेळगावकर, वाहतूक पोलीस निरीक्षक मार्लन डिसोझा व इतर पंचसदस्यांच्या उपस्थित बस्तोडा जंक्शनची संयुक्त पाहणी केली.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे नसल्याने संपूर्ण परिसर जलमय होतो. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर आमदारांनी अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी केली.
या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांच्या पार्किंगबाबत बोलताना फेरेरा म्हणाले की, हा परिसर नो-पार्किंग झोन आहे आणि बस्तोडा पंचायतीला फलक लावण्याची विनंती केली आहे. मात्र ते काम करणे अद्याप बाकी आहे.
गरज पडल्यास फलक प्रायोजित करीन. यासाठी उपजिल्हाधिकारी व वाहतूक पोलिसांची मान्यता हवी.
सध्या परिसर जलमय होऊ नये यासाठी तातडीने गटार बांधण्याचे काम हाती घेतले जाईल. तशी सूचना मी साबांखा विभागास केली आहे. दुकानांसमोरील काही भागात गटारे काढावी लागतील आणि या कामावेळी कुणी अडवणूक केल्यास ती दुकाने सील करण्याची मी संबंधित अधिकाऱ्यांना मोकळीक दिली आहे.
कारण, सार्वजनिक हिताकडे कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे अॅड. फेरेरा म्हणाले.
रस्त्यालगत असलेल्या दुकानांची कायदेशीरता तापसण्यासाठी तयार केलेल्या यादीच्या आधारे कारवाई केली जाईल. या रस्त्यालगत असलेल्या दुकानांमुळे पाण्याच्या मुक्त प्रवाहात अडथळा येतोय. उपजिल्हाधिकारी व मामलेदार हे बांधकामांची कायदेशीरता पडताळण्याचे काम करताहेत.अॅड. कार्लुस फेरेरा, आमदार
मामलेदार व तलाठी यांनी यापूर्वीच या भागाची पाहणी केली आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे आम्ही सुनावणी घेऊ शकलो नव्हतो. मात्र, आता आम्ही सुनावणी जलदगतीने घेऊ. काही प्रकरणे माझ्यासमोर न्यायप्रविष्ट आहेत. आम्ही दुकाने व गाड्यांची तपासणी केली आहे. तसेच पार्किंगमुळे लोकांची गैरसोय लक्षात घेऊन या भागातील समस्यांबाबत बस्तोडा पंचायत व बीडीओला कळवू.यशस्विनी बी., उपजिल्हाधिकारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.