सांगे: दक्षिण गोव्यातील कुंभारवाडा परिसरातील घनदाट जंगलात एका वृद्धेचा मानवी सांगाडा सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा १६ नोव्हेंबर २०२५ पासून बेपत्ता असलेल्या ८५ वर्षीय लीलावती वाडकर यांचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ही नैसर्गिक दुर्घटना आहे की घातपात, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लीलावती वाडकर या १६ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या मिळून आल्या नव्हत्या, ज्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, नुकताच कुंभारवाडा येथील एका दुर्गम आणि घनदाट जंगलात काही हाडे विखुरलेल्या अवस्थेत सापडली.
घटनास्थळी पोलिसांना मानवी हाडांसोबतच एक साडी आणि ब्लाउज देखील आढळून आला आहे. कपड्यांच्या वर्णनावरून हा सांगाडा लीलावती वाडकर यांचाच असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे.
मिळाल्या हाडांची आणि कपड्यांची पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्ती केली आहे. हा सांगाडा नक्की कोणाचा आहे आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट करण्यासाठी सर्व अवशेष मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (SGDH) मेडिको-लीगल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
शवविच्छेदन आणि डीएनए चाचणीच्या अहवालानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ८५ वर्षांच्या लीलावती जंगलाच्या इतक्या दुर्गम भागात कशा पोहोचल्या? त्यांचा तिथे मृत्यू झाला की त्यांच्यासोबत काही अघटित घडले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत.
स्थानिक रहिवाशांची चौकशी केली जात असून सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला जात आहे. वृद्धेच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.