Menkure Gram Sabha clash Dainik Gomantak
गोवा

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

Menkure Dhumase crematorium dispute: मेणकुरे-धुमासे पंचायतीच्या ग्रामसभेत स्मशानभूमीच्या धगधगत्या विषयावरून भडका उडाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: मेणकुरे-धुमासे पंचायतीच्या ग्रामसभेत स्मशानभूमीच्या धगधगत्या विषयावरून भडका उडाला. ग्रामसभा सुरळीत सुरू असतानाच अचानक स्मशानभूमीच्या मुद्यावरून ग्रामस्थ आक्रमक बनले. स्मशानभूमीच्या लोकार्पणावरून ग्रामस्थांमध्ये दोन गट निर्माण होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला.

आक्रमक झालेल्या काहीजणांनी तर एकमेकांवर खुर्च्याही उगारल्या. अखेर स्मशानभूमीचे पुन्हा रितसर उदघाटन करण्याची तयारी पंचायतीने दाखविल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. पंचायतीच्या इतिहासात आज प्रथमच मेणकुरेची ग्रामसभा वादळी झाली.

मेणकुरे-धुमासे पंचायतीची ग्रामसभा आज प्रभारी सरपंच संजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या ग्रामसभेला गुरुदास परब, उमेश शेट्ये आणि विश्वंभर नाईक हे पंचसदस्य उपस्थित होते. तर मावळत्या सरपंच कुमुदिनी नाईक अनुपस्थित होत्या.

संजना नाईक यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव नारायण सावंत यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. ग्रामसभेत अन्य विषयांवर चर्चा झाली. दुपारी साधारण दीड वाजता ग्रामसभा आटोपली. ग्रामसभेला शंभरच्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या सेवेसाठी उदघाटन : गुरुदास परब

यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य गुरुदास परब यांनी स्मशानभूमीच्या उदघाटनामागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कुठे करायचे, यावरून वारंवार प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे केवळ ग्रामस्थांच्या सेवेसाठी पूर्ण झालेल्या स्मशानभूमी प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. त्यामागे अन्य कोणतेही कारण अथवा राजकीय हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिष्टाचाराचे उल्लंघन : ग्रामस्थ अंधारात

सरकारी निधीतून मेणकुरे येथे बांधलेल्या सुसज्ज स्मशानभूमीचे आठवड्यापूर्वी लोकार्पण करण्यात आले. मात्र, कथित लोकार्पण सोहळा देवस्थानसह ग्रामस्थांना अंधारात ठेवून आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करून केल्याचा आरोप ग्रामस्थ प्रेमानंद नाईक आणि इतरांनी केला. त्यावेळी स्मशानभूमीचे लोकार्पण झाल्याने पुन्हा ते करता येणार नाही, अशी भूमिका पंचायत मंडळाने घेतली.

पुन्हा उदघाटनाचा ठराव: आजी-माजी आमदारांसह सर्व घटकांना विश्वासात घेऊनच स्मशानभूमीचे पुन्हा उदघाटन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी करताच देवस्थानचे माजी अध्यक्ष केशव नाईक आणि इतरांनी आक्षेप घेतला. दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एकमेकांना धक्काबुक्कीही करण्यात आली. आक्रमक झालेल्या एका ग्रामस्थाने मारण्यासाठी खुर्चीही उगारली होती. अखेर स्मशानभूमीचे पुन्हा उदघाटन करण्याचा ठराव घेतल्यानंतरच ग्रामस्थ शांत झाले.

सरकारी आस्थापनांचे भाडे थकले

पंचायत इमारतीत कार्यरत असलेले सरकारी वाचनालय वगळता काही सरकारी आस्थापनांकडून भाडे मिळत नाही, अशी माहिती ग्रामसभेत देण्यात आली. या मुद्यावर चर्चा होऊन संबंधित आस्थापनांकडून भाडे आकारून पंचायतीच्या महसुलात भर घालावी.

अन्यथा पर्यायी भाडेकरू शोधा, अशी मागणी ग्रामस्थांनी करून तसा ठरावही घेतला. सरकारी वाचनालयाकडून मिळणारे भाडेही तुटपुंजे आहे, असा दावा काही ग्रामस्थांनी केला. या विषयावर माजी सरपंच नलिता नाईक, केशव नाईक आदींनी सूचना केल्या.

गावात मेगा प्रकल्प नकोच : पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्पांना थारा देऊ नये. ग्रामसभेची मान्यता घेऊनच प्रकल्पांना मान्यता द्या, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. माजी सरपंच न्हानू नाईक आणि इतरांनी तसा ठरावही मांडला. प्रकल्पांच्या मुद्यावरूनही ग्रामस्थांनी पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT