सासष्टी: ला फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटलपर्यंतचा उड्डाण पुलाला चालना मिळाली असून हल्लीच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी नवी दिल्लीत रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या कामाला गती देण्याची विनंती केली होती. कामत यांची ही भेट फलद्रुप ठरली असून शनिवारी रेल्वे अधिकारी तसेच सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागारांनी संयुक्तपणे या भागाची पाहणी करून आराखडा तयार करण्यासंदर्भात पहिले पाऊल टाकले आहे. हा उड्डाणपूल सिने लता जवळील झोपडपट्टी, गांधी मार्केट वरून जाणार आहे.
मडगाव शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी वेर्णा ते नावेलीपर्यंत पश्र्चिम बगल रस्ता तयार करण्यात आला. नंतर कोलवा सर्कल ते कोकण रेल्वे स्थानकाला जोडणारा बगल रस्त्याचा प्रस्ताव पुढे आला.
हा बगल रस्ता कोलवा सर्कल ते पेड, मडगाव येथील ला फ्लोअरपर्यंतच पूर्ण करण्यात आला व पुढील बगल रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक प्रशासकीय व राजकीय अडथळे निर्माण झाले. या दरम्यान हे अडथळे दूर करण्यासाठी ला-फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटलपर्यंत उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव कामत यांनी पुढे केला होता.
या बगल रस्त्याचा प्रस्तावानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे २०२३ साली मांडला. यात दोन उड्डाण पुलांचा समावेश होता. त्यातील एक ला फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटल व दुसरा पेड येथील रेल्वे फाटकावरुन.
पहिला उड्डाण पूल केंद्रीय पूल व साधन सुविधा योजनेअंतर्गत व दुसरा उड्डाण पूल सेतू बंधन योजनेअंतर्गत बांधण्याचा प्रस्ताव होता. ला फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटलपर्यंतचा उड्डाण पुलाला केंद्राने २०२४ साली मान्यता दिली पण नंतर काहीच पुढे गेले नव्हते.
ला फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटल दरम्यान उड्डाण पूल झाला नसता व जमिनीवरूनच रस्ता करण्याचे ठरले असते तर झोपडपट्टी स्थलांतरित करावी लागणार असती. त्याच प्रमाणे गांधी मार्केट, न्यू मार्केट, स्टेशन रोडवर त्याचा परिणाम झाला असता.
या संदर्भात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे चर्चा करून या ला फ्लोअर ते विक्टर हॉस्पिटलपर्यंतचा उड्डाण पूल उभारणीची समस्या दूर करण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन सुद्धा लागणार आहे. त्याबाबतही रेल्वे मंत्र्यांकडे चर्चा केली आहे, असे कामत यांनी सांगितले. ही जागा उड्डाणपुलासाठी हस्तांतरीत केली जाईल, असेही कामत म्हणाले.
हा उड्डाण पूल पूर्ण झाल्यावर कोलवा सर्कल ते आके पावर हाऊसपर्यंत हा रस्ता खुला होईल असे सांगण्यात आले. या प्रकल्पाला अंदाजे ९० ते १०० कोटी खर्च येण्याचा संभव व्यक्त केला जात आहे.
पेड येथील रेल्वे गेट वरून जाणाऱ्या उड्डाण पुलाला सुद्धा सरकारची मान्यता मिळाली असून हे कामही लवकरच सुरू कले जाईल, असे कामत यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर रेल्वे फाटक वाहतुकीसाठी कायमचे बंद केले जाईल. दोन्ही पुलांच्या संरेखनाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.