Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : सुरक्षेअभावी औद्योगिक अपघात; नवीन औद्योगिक धोरणामध्ये घातक प्रकल्‍पांना थारा न देण्‍याकडे कल

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, डिचोली येथे स्‍टील कारखान्‍यात झालेले सलग चार स्‍फोट आणि कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील ग्‍लोबल इस्‍पात या कारखान्‍यात एका कामगाराच्‍या गळ्यात लोखंडी सळी घुसल्‍याने झालेला मृत्‍यू, या दोन्‍ही प्रकारांकडे स्‍थानिक गंभीरपणे पाहात आहेत.

गोव्‍यात औद्योगिक प्रकल्‍पात कामगार तसेच इतरांच्‍या सुरक्षेकडे गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच असे अपघात वारंवार घडतात, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

डिचोलीतील कारखान्‍यामध्‍ये सुमारे ८०० डिग्री सेल्सिअस तापमानावर लोखंड वितळविले जाते. अशा गरम वातावरणात साध्‍या पाण्‍याचाही स्‍पर्श झाल्‍यास मोठा स्‍फाेट होऊ शकतो. कित्‍येकवेळा हे भंगार वितळविताना त्‍यात गॅस सिलिंडरही टाकतात. या सिलिंडरमध्‍ये गॅसचा अंश बाकी राहिल्‍यास स्‍फोट होऊ शकतो, अशी माहिती गोवा लहान व मध्‍यम उद्योजक संघटनेचे माजी अध्‍यक्ष दामोदर कोचकर यांनी दिली.

त्‍यामुळे आता राज्‍याच्‍या नवीन औद्योगिक धोरणात अशा घातक प्रकल्‍पांना मान्‍यता न देण्‍याकडे कल वाढला असून सुरक्षित प्रकल्‍पांनाच मान्‍यता देण्‍याचे प्रमाण वाढले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

कुंकळ्‍ळी येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्‍या विरोधात आवाज उठविणारे समाजसेवक डाॅ. जॉर्सन फर्नांडिस म्हणाले, या कारखानदारांना कामगारांच्‍या जीवाची पर्वा नसते. त्‍यामुळेच ते आवश्‍‍यक ते सुरक्षेचे उपाय योजत नाहीत. त्‍यामुळेच वारंवार असे अपघात घडतात. कुंकळ्‍ळीच्‍या ज्‍या ग्‍लोबल इस्‍पात फॅक्‍टरीमध्‍ये दोन दिवसांपूर्वी कामगाराचा मृत्‍यू झाला, त्‍याच कारखान्‍यात यापूर्वी मशीनमध्‍ये सापडून असाच कामगार ठार झाला होता, याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

वास्‍तविक औद्याेगिक वसाहतीतील हे कारखाने आवश्‍‍यक ते सुरक्षात्मक उपाय अमलात आणतात की नाही, याची तपासणी कारखाने व बाष्‍पक खात्‍याने करायची असते. दुर्दैवाने ज्‍या गंभीरतेने ही तपासणी व्‍हायला हवी तशी कधी केली जातच नाही.

कुंकळ्‍ळी उद्योगिक वसाहतीतील ९० टक्‍के कारखान्‍यात आवश्‍‍यक असलेले सुरक्षेचे उपाय योजले जातच नाहीत. पण सरकारी अधिकारी त्‍याकडे काणाडोळा करतात, असे ते म्‍हणाले.

यापूर्वीही कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत अशा अपघातात कित्‍येक कामगारांचा जीव गेला आहे. ज्‍या कारखान्‍यात असे अपघात होतात, त्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करण्‍याची गरज असते. पण पोलिसही याच कारखानदारांच्‍या ओंजळीने पाणी पितात. त्‍यामुळे एकदाही कडक कारवाई झालेली नाही, असे फर्नांडिस म्‍हणाले.

आवश्‍यक परवानेच नाहीत

डिचोली येथील कैराव स्‍टील रोलिंग मिलमध्‍ये हा अपघात घडला. रात्रीच्‍यावेळी एकापाठोपाठ चार मोठे स्फोट झाल्याने परिसरातील लाेकवस्‍तीलाही हादरा बसला. या स्‍फोटांनी लोकांच्‍या कानठळ्‍या बसल्‍या. आता चौकशी सुरू झाली असता, या कारखान्‍याने आवश्‍‍यक ते परवानेही घेतले नव्‍हते, असे उघडकीस आले आहे.

घातक स्‍वरूपाच्‍या कारखान्‍यात सुरक्षेचे उपाय असणे बंधनकारक असते. या कामावर नवख्‍या कामगारांना न घेता अनुभवींना घेणे गरजेचे असते. मात्र, कित्‍येकदा अनुभव नसलेल्‍यांना जोखमीचे काम दिले जाते. त्‍यांच्‍याकडून किरकोळ चूक झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो.

- दामाेदर कोचकर, माजी अध्‍यक्ष, उद्योजक संघटना.

नियम धाब्यावर बसविले जातात! :

‘फॅक्टरीज ॲण्ड बॉयलर’च्या एका निवृत्त अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, चुकार कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकारच आम्हाला नाहीत. त्यांनी नियमानुसार कारखाना चालवला नाही, सुरक्षाविषयक उपाय योजले नाहीत, तर आम्हाला त्यांच्यावर तालुक्यातील कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करावा लागतो आणि तेथील सरकारी वकीलांच्या मर्जीनुसार ते प्रकरण ठरते.

गोव्यातील बहुतांश पोलाद कारखान्यांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. कारण तेथे कंत्राटी कामगार आहेत आणि त्यांची फिकीर कोणालाच नाही. राजकीय हस्तक्षेप तर सततच असतो. उद्योग संघटनाही नियम काटेकोर बनविण्यावर गंभीर नाहीत, असे तो अधिकारी म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT