Margao Dainik Gomantak
गोवा

Margao: तोतया पोलीस, ट्रॅफिक समस्या, वाढते परप्रांतीय; मडगावचे वैभव लुप्त होत चालले आहे का?

Margao Problems: मडगाव शहराने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. मडगावमध्ये 100 वर्षे पूर्ण केलेल्या सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आहेत.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव शहराने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. मडगावमध्ये 100 वर्षे पूर्ण केलेल्या सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आहेत. त्यांत गोमंत विद्या निकेतन, मठग्रामस्थ हिंदू सभा, श्री दामोदर विद्याभुवन, समाज सेवा संघ तसेच महिला व नूतन, पॉप्युलर, श्री दामोदर, आदर्श वनिता, न्यू ईरा. मल्टिपर्पज, लॉयला, फातिमा कॉन्व्हेंट यासारख्या पोर्तुगीज काळात सुरू झालेल्या शैक्षणिक संस्था आहेत.

मडगावची नगरपालिका, कोमुनिदाद इमारती, डॉ. राम मनोहर लोहिया मैदान, नगरपालिका बाग, पोस्ट ऑफिस, जुना बस स्टॅंड, आना फॉंत गार्डन्स, हॉस्पिसियो इस्पितळ, पिंपळकट्टा या मडगावच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तु आहेत. पण त्यांची देखभाल व्यवस्थित न केल्याने त्यातील काही मोडकळीस आलेल्या आहेत.

तर काही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. नगरपालिका बाग व आना फोंत गार्डन केवळ शोभेसाठीच आहे असे वाटते. कारण या दोन्ही ठिकाणाकडे लोक दुर्लक्षित करीत असल्याचे दिसत आहे.

धार्मिक विचार केला तर श्री दामोदर साल, श्री हरिमंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री साईबाबा मंदिर, श्री कृष्ण मंदिर यांनी शहराची धार्मिकतेत वाढ केली आहे. मडगावच्या दिंडी उत्सवाला तर राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

मडगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे की काय मडगावच्या गतवैभवाला सुद्धा काही प्रमाणात ग्रहण लागले आहे. शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मूळ गोमंतकीयांपेक्षा परप्रांतीय जास्त आहेत. मडगावचा जास्त व्यापार परप्रांतीयांच्या हातात गेला आहे. बेकायदेशीर गाडेवाले, रस्त्यावरील अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिक त्रस्त होताना दिसत आहेत.

मडगाव शहरातील आके, नावेलीच्या भागाचा विकास होत आहे. जर पूर्वीचे मडगाव पहायचे असेल तर कोंबवाडा हे उत्तम उदाहरण आहे. जशी इतर भागांत उत्तुंग इमारती व काँक्रीटची जंगले उभारली जात आहेत तशी कोंबवाड्यात या क्षणाला तरी तशी शक्यता दिसत नाही. इथे सर्व मूळ गोमंतकीयच वास करीत आहेत.

आपली जुनी घरे तशीच ठेवली आहे. काही जणांनी आपल्या जुन्या घरांचा नमुना तसाच ठेवताना दुरुस्ती केली आहे. मात्र काही घरे मोडकळीस आली आहेत पण कौटुंबिक प्रश्न उपस्थित होत असल्याने त्यांची दुरुस्ती करण्यास पुढे कोणीही सरसावत नाहीत. मात्र कोंबवाड्यावर जास्तीत जास्त वडिलधारी माणसेच जास्त आहेत. घरातील युवक मंडळी काम धंदा, नोकरीच्या निमित्ताने दुसरीकडे वळली असली तरी त्यांनी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे.

वाहतूक कोंडी, पार्किंगची डोकेदुखी

मडगाव शहराच्या परिसरात आर्ले ते पावरहाऊस, कोलवा सर्कल ते फोमेंतो कचेरी व आता सुरावली ते बाणावली व पुढे पश्र्चिम बगल रस्ता असूनही मडगावात वाहतूक व पार्किंगची डोकेदुखी सतावत आहे. याचे कारण मडगावात वाहनांची संख्या वाढली आहे.

मडगाव हे व्यापारी शहर असल्याने तालुक्यातील इतर गावातील लाखो लोक दररोज येतात. शिवाय मडगाव शहरातच आठ शाळा व दोन महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची व पालकांना शहरात यावे लागते. काही रस्त्यांचे रुंदीकरण झालेले असले तरी शहरातील काही रस्ते रुंद करण्यासाठी आता वाव नाही. शहरात वाहतूक व्यवस्थापन योग्य प्रकारे हाताळले जात नाही. वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. तसेच रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग ही वाहतूक कोंडीची मुख्य कारणे आहेत. शिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे वाढलेली आहेत.

प. बगल रस्ता होतोय खराब

मडगाव, नावेली या भागात वाहतुकीची होत असलेल्या कोंडीवर उपाययोजना म्हणून वेर्णा ते नावेलीपर्यंत सुमारे ११ कि.मी.चा पश्चिम बगल रस्ता उभारण्यात आला. सुरवातीला २०० कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक निश्र्चित करण्यात आले होते. पण शेवटी या रस्त्याचा एकूण खर्च ४८२ कोटी रुपयांवर पोहोचला. या रस्त्याचा सुरावली ते बाणावलीपर्यंतचा २.७५ कि.मी.चा रस्ता खांबावर बांधण्यात आलेला आहे. या रस्त्याचे उद्‍घाटन होऊन केवळ सहा महिने होत असले तरी आताच या रस्त्याची दुर्दशा होत असलेली पाहून नागरिक चिंता व्यक्त करू लागले आहेत.

रात्रीच्या वेळी खांबावरील वीज गुल्ल झालेली असते, त्यामुळे अंधारात अनेक बेकायदेशीर कामांना ऊत आल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. कचरा टाकणाऱ्यांसाठी तर हा एक हॉटस्पॉट झाला आहे.

कंत्राटदाराला जबाबदार धरा

१.कॉंग्रेसचे सावियो कुतिन्हो व लिंकन गोम्स यांनी रस्त्याची झालेली दुर्दशेवर प्रकाशझोत टाकलेला आहे. रस्त्याला भेगा पडल्याने रस्ता ओबडधोबड झाल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. या प्रकारामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

२.दुचाकी वाहन चालकांना यापासून जास्त धोका संभवतो असे लिंकन गोम्स यांनी सांगितले.

३.या संपूर्ण रस्त्याचे काम कमी दर्जाचे झाले आहे. त्यासाठी सरकार कंत्राटदाराला का जबाबदार धरीत नाही. त्याच्याकडून दुरुस्ती का करून घेत नाही, असा प्रश्न कुतिन्हो याने उपस्थित केला आहे.

मजुरांचा बाजार ठरतोय डोकेदुखी

राज्यात बांधकाम उद्योगाची वाढ होत गेली तशी बांधकाम क्षेत्राशी संबंधित गवंडी, प्लंबर, सुतार आदी कामे करणाऱ्या मजुरांची कमी जाणवू लागली. या क्षेत्रात आता मूळ गोमंतकीय कामगार कमी झाले असून इतर राज्यांतील स्थलांतरित मजुरांनी आता ती जागा घेतली आहे. इतर शहराप्रमाणे मडगावातही रोज नगरपालिका इमारतीच्या मागे मजुरांचा बाजार भरतो.

या मजुरांमध्ये सर्वच प्रामाणिक असतात असे नाही. काही दारुडे व इतर व्यसनाधीन झालेले असतात. हे मजूर रस्त्याच्या बाजूला जरी एकत्र होत असले तरी त्यामुळे वाहतुकीला तसेच वाहने खास करून दुचाकी पार्क करण्यासाठी त्रासदायक ठरतात. या मजुरांना स्वच्छता म्हणजे काय हे माहीत नाही, त्यामुळे नगरपालिका इमारतीच्या मागील रस्ता पिचकारींनी रंगलेला दिसतो. हे मजूर शांतही बसत नाहीत. त्यांच्यात सतत भांडणे, मारामारीचे प्रकार घडतात. काही बेकार मजूर तिथेच बसून पत्त्याचा डाव मांडतात.

तोतया पोलिसांची लूटमार, सराफावरील हल्ले...गुन्हेगारी वाढतेय

बड्डे येथील एका सराफावर प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने या व्यावसायिक राजधानीतील व्यापारी लोक भयभीत झाले आहेत. घटना घडून आता पाच दिवस लोटले, हल्लेखोराची छबी सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, पोलिसांनाही ती मिळाली आहे, मात्र हल्लेखोर सापडत नाही.

दुसऱ्या बाजूने पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटण्याच्या घटना वाढल्यात आहेत. मडगाव व लगतच्या परिसरात गुन्हे वाढत आहेत. पोलिस तपास मात्र शीघ्रतेने होत नाही, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून नागरिक भीतीच्या वातावरणाखाली आहे. 

तोतया पोलिसांचा धुमाकूळ

तोतया  पोलिसांनी खऱ्या पोलिसांच्या नाकीदम आणला आहे. पोलिस असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिकांना फिरविणारे हे भामटे पोलिसांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे नागरिकही भीतीच्या वातावरणाखाली वावरत आहे.

मंगळवारी (ता.१५) रोजी भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांने सीआयडी  पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका ७१ वर्षीय वृद्धाच्या हातातील अंगुठी पळवून नेण्याची खळबळजनक घटना घडली. फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रवाडा येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदा नाईक यांना हा भामट्यानें हातोहात फसविताना त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीची अंगुठी लंपास करून पळ काढला.

बायोमेथानेशन प्रकल्प, कोट्यवधींचा खर्च व्यर्थ

एसजीपीडीए किरकोळ मासळी व भाजी मार्केटमधील कचऱ्याची समस्या सर्वांना सतावत आहे. एसजीपीडीए व पालिकेतील वादविवादांमुळे हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. तरी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वाद विकोपाला गेला नाही व पालिकेने कचरा उचलण्यास सुरवात केली आहे.

एसजीपीडीएचे चेअरमन तथा वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना कडक समज दिली. पण प्रश्न राहतो तो या मार्केटमध्ये ४ नोव्हेंबर २०२१ साली मोठा गाजावाजा करून पालिकेतर्फे उभारण्यात आलेला ५ टीपीडी बायोमेथानेशन प्लांट पांढरा हत्ती का ठरला? गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे.

रेल्वे स्थानकावरील फूडकोर्ट ठरतेय आकर्षण

मडगाव रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून या स्थानकात प्रवाशांसाठी अनेक सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानकावरील व बाहेरच्या जागेवर असलेले फूड कोर्ट हे एक खास आकर्षण बनले आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्यांना या फूड कोर्टमध्ये त्यांची पोटाची भूक भागविता येते. विविध पदार्थ येथे खवय्यांसाठी उपलब्ध असून पर्यटक तसेच स्थानिक लोकांसाठीही ही सुविधा पोट तृप्त करणारी ठरली आहे.अमृत भारत योजनेअंतर्गत या रेल्वे स्थानकाचा कायापालट केला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT