Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज: मडगाव भाजप मंडळात बंड?

Khari Kujbuj Political Satire: गाेव्‍यातील प्रश्‍नांसंदर्भात आम्‍ही गंभीर आहाेत, असे जरी सरकार म्‍हणत असले तरी प्रत्‍यक्ष कृतीतून ते तसे जाणवत नाही.

Sameer Panditrao

मडगाव भाजप मंडळात बंड?

मंडळाचा अध्यक्ष नियुक्त करण्यावरून मडगाव भाजप मंडळात बंड होण्याची शक्यता आहे. आज अध्यक्षपदासाठी एकमत करावे या हेतूने बोलावलेल्या बैठकीत मंडळाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नाही, मडगावमधील ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. वयोमर्यादा, पक्षाच्या कामाचा अनुभव वगैरे अटी यावेळी घातलेल्या आहेत. असे असूनही जर या अटी धाब्यावर बसवून अध्यक्षांची नियुक्ती होत असेल तर मग आमदार नसतानाही मडगावात भाजपचे कार्य चालू ठेवले त्यांची किंमत ती काय? ‘हेची काय मम फळ तपाला’, अशी स्थिती मडगाव मधील मूळ भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे. विश्वासात न घेता अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली तर कार्यकर्ते थेट दिल्लीपर्यंत नियमांची पायमल्ली केली म्हणून वरिष्ठांपर्यंत ही बाब पोचवली जाईल, अशी कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

दोन दिवसांचेच अधिवेशन का?

गाेव्‍यातील प्रश्‍नांसंदर्भात आम्‍ही गंभीर आहाेत, असे जरी सरकार म्‍हणत असले तरी प्रत्‍यक्ष कृतीतून ते तसे जाणवत नाही. त्‍यामुळे विरोधक सरकारवर नेहमीच टीका करतात याच पार्श्‍वभूमीवर आता बोलावलेले विधानसभा अधिवेशन केवळ दोन दिवसांचे असल्‍याने पुन्‍हा एकदा विराेधी आमदारांनी सरकारवर टीका केली आहे. सध्‍या गोव्‍यात ‘कॅश फॉर जॉब’ आणि जमीन हडप प्रकरणे या दोन गोष्‍टींमुळे सरकारची प्रतिमा डागाळली गेली आहे. अशा परिस्‍थितीत मोठे विधानसभा अधिवेशन ठेवले तर सरकारची उरली सुरली लाजही वेशीला टांगली जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जातेय. त्‍यामुळेच हे अधिवेशन दोन दिवसात गुंडाळण्‍याचे सरकारने ठरविले तर नाही ना?, असेही बोलले जात आहे. ∙∙∙

एक अनार, सौ बिमार!

भाजपात संघनात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. यामध्ये माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांची नावे आघाडीचे दावेदार म्हणून समोर येताहेत. विशेष म्हणजे, परुळेकरांनी तर प्रदेशाध्यपदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार, असा आत्मविश्वास बोलून दाखविला. तर मांद्रेकर साहेबांनी आपल्या ठराविक शैलीत उदाहरण दिले की, प्रत्येकाला विजयी व्हायचे आहे. आम्ही सर्वजण मित्र असलो तरी ही स्पर्धा आहे. अशातच मांद्रेकर म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मला उत्तरेतून तिकिट मिळेल असे वाटत होते. कदाचित त्यावेळी तिकिट मला मिळाली असती तर मी अधिक मताधिक्क्यांनी जिंकून आलो असतो, असेही मांद्रेकर म्हणाले. अशातच, प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्यांनी बरीच फिल्डिंग लावली आहे, असेच दिसते. आता कोण बाजी मारतो, व कुणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडते, हे प्रसंगी समजेल. परंतु सध्या तरी ही स्थिती ‘एक अनार सौ बिमार... सारखीच म्हणण्यासारखी आहे. ∙∙∙

ढवळीकरांचे धोरण

विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांहून अधिक काळ असला तरी भाजपने संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. या संघटनात्मक बैठकीवेळी सरकारचे भागीदार असलेल्या मगोचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशीही पुढील निवडणुकीत युतीसंदर्भात चर्चा केली. युती करायची की नाही, याचा निर्णय हे मंत्री ढवळीकर यांचाच असतो. मात्र, नेहमी ते युतीचा निर्णय मगोचे केंद्रीय समिती घेईल, असे सांगून जबाबदारी झटकण्याची त्यांची ही नेहमीची पद्धत आहे. त्यांना सत्तेपासून दूर राहता येत नाही. त्यामुळेच तर जेथे सत्ता तेथे मगो पक्षाचे आमदार, असे समीकरण झाले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे गोव्यातही भाजप सरकारचाच वरचष्मा राहणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांचा भाजपबरोबरचा युतीचा कल असणार आहे, हे तितकेच सत्य आहे. ते भाजपबरोबर असतील, मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की, ज्या काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहे, त्यांचे काय झाले आहे हे त्यांना माहीत आहे. ∙∙∙

रसिक प्रेक्षकहो!!

कला अकादमीच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी एक व्हॉट्सएप गट केलेला आहे. रसिक प्रेक्षकहो, हे त्याचं नाव. रस नाही. त्यावर ते पत्रकं, स्पर्धेची वेळापत्रकं वगैरे देतात. काल यांनी आपलं अचाट इंग्रजी ज्ञान प्रदर्शित करताना इंग्रजीतून कविता केल्यासारखा एक नववर्ष संदेश दिला. चार वेळा वाचूनही त्याचा अर्थ आकळला नाही. कोकणीतून एमए केलेल्यांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या, काही हरकत नाही. पण शुद्धलेखन, व्याकरण यांचा वध नको. औकात माहीत असली पाहिजे. ही लाल इंग्रजी दुरूस्त करण्याचा प्रयत्नही कुणी करू शकला नाही. कारण गटावर फक्त प्रशासकांना लिहिता येतं. तात्पर्य हिंदी म्हण ‘अंधेर नगरी चौपट राजा!’ ∙∙∙

मांद्रेकर उवाच

लोकसभेची आपणाला उमेदवारी दिली असती तर आपण श्रीपाद नाईक यांच्यापेक्षा मते मिळवून विजयी झालो असतो, असे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना वाटत आहे. त्यांनी तसे गुरुवारी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. आपण भाजपशी ३० वर्षे एकनिष्ठ असल्याचे फळ प्रदेशाध्यक्षपदाच्या रुपाने मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. राजकारण हा एख खेळ आहे, जो तो आपल्या परीने तो खेळत असतो असे सांगून त्यांनी बरेच काही सुचवले आहे. दिल्लीतील वरिष्ठ प्रदेशाध्यक्षपदाविषयी अंतिम निर्णय घेतात. प्रदेश पातळीवरून काही नावे सुचवली जातात अशी प्रक्रीया सांगून त्यांनी सुचवल्या जाणाऱ्या नावांत आपलाही समावेश असेल असे संकेत दिले आहेत. मांद्रेकर यांचे चिरंजीव सध्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे एकाच घरात भाजप दोन पदे देणार काय हाही प्रश्न आहे. शिवोलीत दिलायला लोबो यांनी आपला जम बसवला असताना आता मांद्रेकर यांची घुस्मट होत असल्याने ते प्रदेश पातळीवर येऊन राजकारणावरील आपली पकड घट्ट करत समीर यांचा राजकीय मार्ग सुकर करण्याची संधी शोधत असावेत अशी चर्चा भाजपच्याच वर्तुळात आहे. ∙∙∙

ज्योशुआंची इच्छा

उपसभापती ज्योशुआ डिसोझा मध्यंतरी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले होते. आता त्याना मंत्री व्हावेसे वाटू लागले आहे. त्यांचे वडिल स्व. फ्रान्सिस डिसोझा हे स्व. मनोहर पर्रीकर यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. पर्रीकर हे संरक्षणमंत्री झाले तेव्हा मात्र डिसोझा यांचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी न होता भाजपने संघाच्या मुशीतून पुढे आलेले प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना संधी दिली होती. डिसोझा यांच्या निधनानंतर ज्योशुआ यांना भाजपने उमेदवारी दिली. ते दोन वेळा आमदार झाले आहेत. साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि उपसभापती अशा दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. त्यांना आता मंत्रिपद मिळाले तर हवे आहे. आजवर ते भाष्य करत नव्हते, मात्र गुरुवारी त्यांना कंठ फुटला आणि त्यांनी मंत्रिपद मिळाले तर हवेच आहे, असे सांगून टाकले आहे. मंत्रिमंडळ फेरबदल झाला तर आपली वर्णी लागली जावी, यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचे दडून राहत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यात कार्यक्षम मंत्र्यांची गरज आहे. त्यामुळे फेरबदलात तेथील आमदारांनाच संधी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT