म्हापसा: संपूर्ण शहर दिवाळीच्या रोषणाईत आणि उत्सवाच्या आनंदात मग्न असताना म्हापसा शहरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोरील एका पडक्या इमारतीत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, संशयिताचे वय ३५ ते ४० वर्षे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. पीडित चिमुकली महाराष्ट्रातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेचे कुटुंब म्हापसा टॅक्सीस्थानक परिसरात फुगे विकून उदरनिर्वाह करते. दिवाळीच्या दिवशी रविवारी (ता. ८) रात्री ८ ते ९.३० च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बालिकेला सोबत नेले. त्यानंतर लोहिया उद्यानासमोरील पडक्या इमारतीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.
अत्याचारानंतर ही चिमुरडी विवस्त्र आणि रक्तबंबाळ अवस्थेत रडत इमारतीबाहेर आली. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही स्थानिक मोटारसायकल पायलट्सच्या ही बाब लक्षात आली.
मुलीची गंभीर अवस्था पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी तिला चादरीत गुंडाळून म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले.
या गंभीर घटनेची दखल घेत म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, घटनास्थळ आणि परिसरातील हालचालींची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणी काहींची चौकशी सुरू असल्याचेही समजते.
दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संशयिताला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
संशयित बालिकेला घेऊन जाताना दिसला, पण...
म्हापशातील सिंडिकेट बँक परिसरातील काही स्थानिक मोटारसायकल पायलट्सनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती या चिमुरडीचा हात धरून तिला जबरदस्तीने ओढत नेताना दिसली होती. सणासुदीच्या गर्दीत फुगे विकणाऱ्या कुटुंबातीलच कोणी नातेवाईक तिला घेऊन जात असावा, असा सुरुवातीला त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी त्यावेळी हस्तक्षेप केला नाही.
रडण्याचा आवाज ऐकताच धावले मदतीला
काही वेळाने एका मोटारसायकल चालकाला पडक्या इमारतीच्या गेटमागून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता चिमुरडी गंभीर जखमी अवस्थेत रडत बाहेर येताना दिसली. तिची अवस्था पाहून उपस्थितांनी तातडीने तिला कपड्यात गुंडाळले. पोलिसांना माहिती देऊन तिला रुग्णालयात दाखल केले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.
तपास जलदगतीने पूर्ण करा : युरी आलेमाव
या प्रकरणाचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी निषेध केला आहे. संशयिताला त्वरित अटक करून ठराविक मुदतीत तपास पूर्ण करावा आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे राज्यातील मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि कौटुंबिक आधार देतानाच तिची ओळख गुप्त ठेवावी, असे आवाहन आलेमाव यांनी केले.
जेव्हा पोलीस ठाण्याबाबतच सुरक्षेचे प्रश्न उपस्थित होऊ लागतात, तेव्हा नागरिकांनी नक्की कुठे जावे? जेव्हा रक्षकच भीतीचे कारण बनतात, तेव्हा नागरिकांचे रक्षण कोण करणार? या प्रश्नाचे उत्तर सरकार देणार काय, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
कायदा-सुव्यवस्थेचे पितळ उघडे : गोवा फॉरवर्ड
या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. गोव्यात महिला आणि बालिका सुरक्षित नसून, राज्याची स्थिती उत्तर प्रदेश व बिहारसारखी झाली आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डच्या महिला विभागाच्या अध्यक्ष ॲड. आश्मा सय्यद यांनी केली. पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सय्यद बोलत होत्या.
यावेळी रेणुका डिसिल्वा व पूजा नाईक यांची उपस्थिती होती. राज्यात मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढत असून, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षकालाही अशाच एका प्रकरणात अटक झाली आहे. पोलिसच भक्षक बनत असल्याने जनतेचा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास उडत आहे. महिला व बालिकांच्या सुरक्षेत सरकार अपयशी ठरत असल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालातूनही स्पष्ट होते. त्यामुळे पालकांनी मुलांचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे डिसिल्वा यांनी सांगितले.
दोषींना फाशी द्या : आवडा व्हिएगस
राज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल ‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्ष आवडा व्हिएगस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा अमानुष कृत्यांतील दोषींना कोणतीही दयामाया न दाखवता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.कोलवा आणि म्हापसा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करताना, आपण सुसंस्कृत समाजात जगत आहोत की रानटी युगाकडे वाटचाल करत आहोत, असा सवाल त्यांनी केला. आरोपींची जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती न पाहता अशा गंभीर गुन्ह्यांतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच अशा गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करावा, अशी मागणीही व्हिएगस यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.