पणजी: लोकसभेसाठी 2024 साली निवडणूक होत असून यासाठी अजून बराच अवधी आहे. मात्र, भाजपच्या नव्या रणनीतीनुसार लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्यात ‘शत-प्रतिशत भाजप’ या घोषणेनुसार उत्तर व दक्षिणेतील दोन्हीही जागा जिंकण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने कंबर कसली आहे. मात्र, उत्तरेतील उमेदवारीवरून आतापासून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (Many Goa BJP leaders interested for Lok Sabha candidature)
यासाठी विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दयानंद सोपटे हे नेतेही प्रयत्नशील असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी भाजपपासून दुरावलेले उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाल्याने विद्यमान खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक अस्वस्थ झाले होते. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगत त्यांनी इतरांना कोणाला यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर ते करू शकतात, असे म्हटले होते. यावर प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी मंत्री नाईक पक्षाचे वरिष्ठ नेते असून उमेदवारीचा निर्णय केंद्रीय पातळीवर होतो. त्यामुळे श्रीपादभाऊंनी इतर वक्तव्ये टाळावीत, असे म्हटल्याने लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत संघर्ष वाढू लागला असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभेसाठी आपण इच्छुक नाही. श्रीपादभाऊच पक्षाचे पुन्हा उमेदवार असतील. पक्षाच्या रणनीतीनुसार आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. यासंदर्भात कोणीही कसल्याही अफवा उठवत असतील, तर ते चुकीचे आहे. भाजपमध्ये बेबनाव नाही.
- सदानंद शेट तानावडे
गेल्या पाच निवडणुका भाजपच्या तिकिटावर लढवत असून मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या खात्याचा देशाबरोबर राज्याच्या प्रगतीसाठी उपयोग होत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकही मी पक्षाच्या तिकिटावर लढवू इच्छितो.
- श्रीपाद नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.