पणजी: मांडवी पुलावर सोमवारी पहाटे टॅक्सी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कुशाग्र पटाळे (२३, मुंबई) आणि यश मलिक (२३, रोहतक) या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी टॅक्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातातील जखमी पर्यटकांना गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला.
पर्यटक टॅक्सी पणजीहून पर्वरीच्या दिशेने, तर दुचाकीस्वार पर्वरीहून पणजीच्या दिशेने प्रवास करत होते. मांडवी पुलावर पोहोचताच टॅक्सीचालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेच्या मार्गावर प्रवेश केला असावा. दुचाकीचा वेगही अधिक असण्याची शक्यता तपासली जात आहे.
अपघातानंतर (Accident) टॅक्सी चुकीच्या मार्गिकेत आढळली. दुचाकीचा पार चक्काचूर होऊन ती पुलाच्या कठड्यावर पडली होती, तर टॅक्सी रस्त्याच्या मध्यभागी उभी होती. यावरून दोन्ही वाहनांचा वेग आणि धडकेची तीव्रता लक्षात येते. दुसरीकडे, गोवा वेल्हा येथे लष्करी वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गिरी येथील २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
दोन्ही मांडवी पुलांवर दिवसा वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहने सावकाश पुढे सरकतात. मात्र, रात्री किंवा मध्यरात्री वाहतूक कमी झाल्यानंतर वाहने वेगाने धावतात. जुन्या मांडवी पुलावर रात्रीच्या वेळी बॅरिकेडिंग केले जाते. त्यामुळे पुलाच्या सुरुवातीलाच वाहनांचा वेग कमी होतो. मात्र, नवीन मांडवी पुलावर अशी खबरदारी घेतली जात नाही. अपघातांचा धोका टाळण्यासाठी नवीन मांडवी पुलावरही रात्रीच्या वेळी पणजी बसस्थानक आणि पर्वरी या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग उभारणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.