Mahadayi Water Issue: कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाचा सर्वात मोठा फटका सत्तरी तालुक्याला बसणार आहे. कारण म्हादई कर्नाटकच्या थेट देगवहून गोव्यात येताना सत्तरी तालुक्यात सुरवातीला प्रवेश करते.
गोव्याच्या जनतेला अगदी सुरुवातीला कर्नाटकच्या मनसुब्यांची जाणीव सत्तरी तालुक्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्याकडूनच झाली आणि आता हळूहळू जनता जागृत व्हायला लागली आहे. सत्तरी तालुक्यातून म्हादईसाठी जनआंदोलन होऊन म्हादईचा लढा तीव्र होणे काळाची गरज आहे.
सत्तरीत याची सुरुवात काही तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यात ॲड शिवाजी देसाई, राजेश सावंत, गौरिश गावस, ॲड हर्षदा हळदणकर,अर्जुन गुरव, कृष्णा नेने ही मंडळी होती. या युवकांनी अभ्यासपूर्णरित्या मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा परिणाम नंतर चांगलाच जाणवला. लोकांच्या छोट्या बैठका होण्यास प्रारंभ झाला.
आमदार ॲड कार्लुस फरेरा, राजेंद्र केरकर यांची सत्तरीत मार्गदर्शनपर भाषणे झाली. वकील संघटनाही पुढे सरसावली. पत्रकार दशरथ मांद्रेकर हे देखील म्हादईच्या लढ्यात पुढे आले. अनुसूचित जमातीचा समाजानेही उघड पाठिंबा या म्हादई बचाव आंदोलनास दिलेला आहे. प्राप्त माहितीनुसार सेव्ह गोवा सेव्ह म्हादई च्या सभेसाठी सत्तरी तालुक्यातून जवळपास पाचशे जणांची उपस्थिती होती.
म्हादई नदीची गोव्यातील सुरुवातच सत्तरी तालुक्यातून होत असल्याने म्हादईच्या तीरावर मोठ्या प्रमाणात गोव्यातील आंदोलक येऊ शकतात आणि त्याला त्याप्रमाणे प्रसिद्धीदेखील मिळू शकते. मागील काही वर्षांच्या कालावधीत सत्तरी तालुक्यात अनेक आंदोलने यशस्वी ठरली आहेत. म्हादईसाठीही आता जनआंदोलन करणे गरजेचे आहे.
गोव्यातील बहुतांश नागरिक खरेदी करण्यासाठी कर्नाटकात जातात. कर्नाटक जर म्हादईविषयी आपली भूमिका बदलत नसेल तर येथील नागरिकांनी बेळगावात जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करणे बंद केल्यास याचा फटका कर्नाटकाला बसेल.
जनआंदोलनाची गरज
म्हादईसंबंधी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर तसेच गोव्याचे ॲडव्होकेट जनरल ॲड. देविदास पांगम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, म्हादईला आता फक्त लोकलढ्यानेच वाचवू शकतो. मात्र अजूनपर्यंत सत्तरीत नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही.
हा प्रतिसाद कशामुळे लाभत नाही याचीच चर्चा सर्वत्र आहे. घराघरांतून जनआंदोलन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हा लढा एकट्याने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सत्तरीच्या जनतेने कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता एकत्र येऊन हा लढा लढण्याची गरज आहे.
नागरिकांनी गांभीर्याने घ्यावे
सुर्ला, साट्रे, कोदाळ, नानोडा, दरोडे, उस्ते यांचा संगम म्हादईमुळे होतो. जर म्हादई नदीच आटली गेली तर या गावांतील लोकांनी कोणावर अवलंबुन राहायचे. अजूनपर्यंत या गावांतील नागरिकांना म्हादई प्रश्नावर कोणीही गांभीर्याने घेतलेले नाही.
त्यामुळे आताच वेळ आली आहे ती नागरिकांनी जागे होऊन म्हादई नदीचे उरले सुरले अस्तित्व वाचविण्याची. म्हादईचे रक्षण करण्यासाठी कर्नाटकाचा डाव हाणून पाडला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.